लोकशाहीच्या रक्षणासाठी इन्साफ के सिपाही पुढे, आधी देश घडवू मग…; सामनातून ‘त्या’ पत्रावर भाष्य
Saamana Editorial : काही मुद्दे अधोरेखित करत विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून या पत्रावर भाष्य करण्यात आलं आहे.पाहा...
मुंबई : सामनाच्या आजच्या अग्रलेखातून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिण्यात आलेल्या पत्रावर भाष्य करण्यात आलं आहे. “अरविंद केजरीवाल, चंद्रशेखर राव, ममता बॅनर्जी, भगवंत मान, तेजस्वी यादव, फारुख अब्दुल्ला, शरद पवार, उद्धव ठाकरे व अखिलेश यादव अशा नेत्यांच्या सहीचे पंतप्रधान मोदींना लिहिलेले पत्र देशाच्या हुकूमशाहीवर प्रकाश टाकणारे आहे. या पत्रातील एक भाग अत्यंत चमकदार आहे, तो म्हणजे 2014 मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर देशातील विरोधी पक्षांतील नेत्यांवर कारवाईचे प्रमाण वाढले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विरोधी पक्षांतील ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यापैकी ज्या राजकीय नेत्यांनी भाजपात प्रवेश केला त्यांच्यावर पुढे कोणतीही कारवाई झाली नाही. महाराष्ट्रासह देशात भाजपच्या ‘भ्रष्टाचार वॉशिंग मशीन’च्या विरोधात ठामपणे उभे राहायची हीच वेळ आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी ‘इन्साफ’च्या शिपायांना हातात हात घालून काम करावे लागेल. राजकारणासाठी उभा जन्म पडला आहे. देश आधी वाचवू या!”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
