… म्हणून भाजपने शिवसेनेवर दरोडा टाकला; सामनातून शिंदेगटाच्या बंडखोरीवर निशाणा
सामनाच्या आजच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. तसंच शिंदेंना शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळण्याचं कारणही सांगण्यात आलं आहे. पाहा...
मुंबई : सामनाच्या आजच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या बंडखोरीवर भाष्य करण्यात आलं आहे. तसंच शिंदेंना शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळण्याचं कारणही सांगण्यात आलं आहे. “निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे नाव आणि निवडणूक चिन्हाबाबतचा निकाल मिंध्यांच्या बाजूने दिला तरी शिवसेना ही ठाकऱ्यांचीच होती , आहे व राहील . महाराष्ट्रात किमान दोन हजार कोटींचा सौदा करून आधी सरकार विकत घेतले व आता धनुष्यबाणाचा , शिवसेना नावाचा सौदा करण्यात आला . ही कसली लोकशाही ? मोदी युग संपले आणि बाळासाहेब ठाकरे व त्यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेशिवाय महाराष्ट्रात भाजपला कुत्रेही विचारणार नसल्यानेच त्यांनी शिवसेनेवर दरोडा टाकला व आपले तळवे चाटणाऱ्या मिंध्यांना मुख्यमंत्री केले . हिंदुत्वरक्षक , मराठी माणसाचा मानबिंदू असलेल्या शिवसेनेचे अस्तित्वच नष्ट करणारा हा निकाल महाराष्ट्राला मान्य नाही . न्याय झाला नाही व निकाल विकत घेतला . व्यापाऱ्यांच्या राज्यात दुसरे काय होणार ? लढाई सुरूच राहील!”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
