Saamana Editorial : हे विजयी कसे झाले? भाजप अन् त्यांचे दोन बगलबच्चे…. महायुतीच्या विजयानंतर ‘समाना’तून जोरदार टीकास्त्र
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महायुतीच्या विजयावर सामनाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जनतेला भाजपच्या कारभाराला कंटाळा आला असताना, हे कसे जिंकले, असा सवाल अग्रलेखातून करण्यात आला आहे. ही निवडणूक पैसा आणि सत्तेच्या जोरजबरदस्तीने जिंकल्याचा आरोपही सामनाने केला आहे.
सामनाच्या अग्रलेखातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील महायुतीच्या विजयावर जोरदार टीका करण्यात आली आहे. भाजपने असे काय दिवे लावले की जनतेने त्यांना भरभरून मतदान करून विजयी केले, असा थेट सवाल सामना या अग्रलेखात विचारण्यात आला आहे. जनतेला भाजपच्या कारभाराचा त्रास झाला आहे, असे स्वतः जनताच सांगत असल्याचेही सामनाने म्हटले आहे. हे कसे जिंकले? हाच प्रश्न विधानसभेच्या वेळीही जनतेने विचारला होता आणि आता नगरपालिका निवडणुकीतही जनता याच प्रश्नाचे उत्तर शोधत असल्याचे सामनातून म्हटले गेले आहे.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या दोन सहयोगी पक्षांना मोठे यश मिळाले. निवडणुकीचे निकाल हे एका पॅटर्ननुसार ठरवले गेले होते, असे अग्रलेखात नमूद केले आहे. हा निकाल सेटिंगनुसार लागला असल्याचे सामनाने सूचित केले आहे. या निवडणुकीत खरी लढत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नव्हती, तर सत्ताधारी तीन पक्षांमध्येच स्पर्धा सुरू होती, असेही सामनातून म्हटले आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतील हे यश पैसा आणि सत्तेच्या बळावर मिळवले असल्याचा पुरावा आता समोर आला आहे, असा दावा सामनाने केला आहे.