आजच्या निकालाने त्यांना सणसणीत चपराक, न्याय उशिरा मिळाला; मालेगाव बॉम्बब्लास्टवर उपमुख्यमंत्री शिंदेंची मोठी प्रतिक्रिया

आजच्या निकालाने त्यांना सणसणीत चपराक, न्याय उशिरा मिळाला; मालेगाव बॉम्बब्लास्टवर उपमुख्यमंत्री शिंदेंची मोठी प्रतिक्रिया

| Updated on: Jul 31, 2025 | 1:27 PM

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात १७ वर्षांनंतर सर्व सात आरोपींना पुराव्याच्या अभावामुळे विशेष एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. यात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचाही समावेश आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, काँग्रेसच्या यूपीए सरकारवर 'भगवा दहशतवाद'चा आरोप लावून लक्ष विचलित करण्याचा आरोप केला आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे १७ वर्षांपासून न्यायाची वाट पाहणाऱ्या आरोपींना न्याय मिळाला आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “काँग्रेसच्या यूपीए सरकारने भगव्या रंगाला आणि हिंदुत्वाला बदनाम करण्याचे काम केले. आजच्या निकालाने सर्वोच्च न्यायालयाने त्यांना चांगलीच चपराक लगावली आहे.” 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावच्या भिक्कू चौकात झालेल्या बॉम्बस्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता आणि 100 हून अधिक नागरिक जखमी झाले होते. या प्रकरणाचा निकाल 17 वर्षांनंतर लागला असून, विशेष एनआयए न्यायालयाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) या आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली होती, परंतु न्यायालयाने सर्वांना निर्दोष ठरवले.

शिंदे पुढे म्हणाले, मी सर्वप्रथम न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करतो. उशिरा का होईना, या लोकांना न्याय मिळाला. यूपीए सरकारच्या काळात मुंबईसह देशभरात सातत्याने बॉम्बस्फोट होत होते, ज्यात हजारो निरपराध लोकांचा बळी गेला. त्या वेळी यूपीए सरकार दहशतवादाला कोणताही रंग नसतो असे म्हणायचे, पण मालेगाव बॉम्बस्फोटानंतर त्यांनीच ‘भगवा दहशतवाद’ हा शब्द आणला. या शब्दाचा वापर करून त्यांनी लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. हिंदू समाज सहिष्णू आहे आणि तो देशविघातक कृत्य करत नाही, हे आजच्या निकालाने स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील आरोपींना न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागली, पण अखेर त्यांना न्याय मिळाला.

Published on: Jul 31, 2025 01:26 PM