राज ठाकरे अन् काँग्रेस युती! राऊतांच्या ‘त्या’ दाव्याने राजकीय चर्चांना उधाण तर उदय सामंत नेमकं काय म्हणाले?
राज ठाकरे काँग्रेसला सोबत घेण्याच्या भूमिकेत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मनसेने यावर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली, तर उदय सामंतांनी सावरकरांवरून राज ठाकरेंना घेरले.
ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबत चर्चा सुरू असताना, संजय राऊत यांनी एक मोठा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसलाही सोबत घेण्याची राज ठाकरे यांची भूमिका आहे, असे राऊत म्हणाले. या वक्तव्यावर मनसेकडून लगेचच अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त करण्यात आली.
मनसेचे संदीप देशपांडे यांनी पक्षाची भूमिका राज ठाकरे किंवा मनसेचे अधिकृत प्रवक्तेच मांडतील, असे स्पष्ट केले. यानंतर राऊत यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले. आपण भूमिका म्हटले होते, निर्णय नाही, असे राऊत यांनी सांगितले. काँग्रेससोबत जाण्याबाबत निर्णय झाला नसला तरी, राज ठाकरे यांची काँग्रेसला सोबत घेण्याची भूमिका आहे, असे राऊतांनी पुनरुच्चारले. त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन चर्चांना सुरुवात झाली आहे.
Published on: Oct 13, 2025 10:47 PM
