‘मग हे बुलडोजर बदलापूरला का नाही गेले?’, संजय राऊत यांचा नाव न घेता कोणावर निशाणा?
देवेंद्र फडणवीस यांनी SIT स्थापन केली आहे. त्याची गरज काय? आरोपी पकडलेला आहे. पोलिसांकडून तपासही सुरु आहे. SIT हा शब्द त्यांच्या तोंडात शोभत नाही. ठाकरे सरकारने अनेक गुन्ह्यात ज्या SIT स्थापन केल्या होत्या, त्या गृहमंत्री झाल्यावर पहिल्या २४ तासात फडणवीसांनी रद्द केल्या. उद्धव ठाकरेंनी स्थापन केलेल्या SIT फार गंभीर गुन्ह्यातील होत्या, असेही संजय राऊतांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपूर्वी मधल्या काळात योगींचं जे बुलडोझर राज्य सुरु आहे. तसे काही ठिकाणी बुलडोझर चालवण्याचे काम शिंदे सरकारकडून केले जात आहे. हे बुलडोझर बदलापूरला का गेले नाही? असा थेट सवाल संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. याआधी अशाप्रकारच्या गुन्ह्यात जरब बसावी म्हणून बुलडोझर चालवण्यात आले आहेत. जनतेचा काल उद्रेक पाहायला मिळाला. याला कायदेशीर भाषेत पब्लिक क्राय असं म्हटलं जातं. जेव्हा जेव्हा अशाप्रकारे पब्लिक क्राय होतो, तेव्हा न्यायालयाने या घटनांची दखल घेतली आहे. मग कालच्या पब्लिक क्रायची दखल सर्वोच्च न्यायालयाने का घेतली नाही? असा सवाल करत संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला. कोलकात्यामध्ये घडलेल्या घटनेची दखल सर्वोच्च न्यायालय घेतं, कारण तिथे ममता बॅनर्जींचं सरकार आहे, बदलापुरात कोलकत्यापेक्षा जास्त पब्लिक क्राय होता पण तरीही चिमुकल्यांचा आक्रोश न्यायालयाच्या कानाचे पडदे फाडू शकला नाही, असा आरोपही संजय राऊतांनी केला.
