Sanjay Raut : चोरबाजाराचं नाव मोदी बाजार.. ढोंगी म्हणत राऊतांचे भर पावसात दमदार भाषण, विरोधकांवर कडाडले
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात संजय राऊत यांनी मुसळधार पावसातही जोरदार भाषण केले. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा सांगत, एकनाथ शिंदे सरकारवर वोटचोरीचा आरोप केला.
मुंबईतील ऐतिहासिक शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दसरा मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी भर पावसात उपस्थितांना संबोधित केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याला मोठ्या संख्येने निष्ठावान शिवसैनिक उपस्थित होते. संजय राऊत यांनी आपल्या भाषणात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा आणि शिवसेनेची ५६ वर्षांची परंपरा अधोरेखित केली.
मुसळधार पावसातही शिवसैनिकांची उपस्थिती हा शिवसेनेचा पेटलेला वनवा असल्याचे त्यांनी म्हटले. राऊत यांनी राज्यातील सध्याच्या सरकारवर ढोंगी आणि वोटचोरी करून सत्तेत आल्याचा आरोप केला. त्यांनी शिवसेना आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या चिन्हांच्या कथित चोरीचा उल्लेख करत, मुंबईतील चोरबाजाराचे नाव मोदी बाजार करावे, अशी उपरोधिक सूचना केली.
रावणादहनाचा संदर्भ देत, मुंबईतील रावणाला बुडवून दिल्लीतील रावणाला जाळायचे आहे, असे राऊत यांनी नमूद केले. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या शस्त्रपूजेचे महत्त्व सांगत, विरोधकांवर अमित शहा यांच्या पादुकांची पूजा करत असल्याची टीका केली. त्यांनी निष्ठावान शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, असे आश्वासन दिले.
