Sanjay Raut : सत्ताधाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आहे का? संजय राऊतांचा खोचक सवाल
Sanjay Raut News : खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर सूचक वक्तव्य केलं असून सत्ताधाऱ्यांवर देखील टीकास्त्र डागलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर भाष्य करताना सांगितले की, जास्त चर्चा न करता योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्याची ग्वाही दिली आहे, तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण होईल, असे म्हटले आहे.
पुढे बोलताना राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, सत्ताधाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहे का? त्यांनी मुंबईला दिल्लीच्या ताटाखाली पायपुसणी बनवले आहे. मुंबई ही मराठी माणसाची आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे. आम्हाला मुंबा देवीविषयी कोणी शिकवण्याची गरज नाही.
राऊत यांनी पुढे आरोप केला की, गुजरातमधील काही सधन उद्योजक मुंबईला आपली मालमत्ता बनवू पाहत आहेत. माझ्या शब्दांवर न जाता परिस्थितीवर लक्ष द्या. धारावीच्या नावाखाली अदानींना भूखंडांचे वाटप होत आहे, यावर बोला. मुंबईतील मराठी माणसाला हद्दपार केले जात आहे, यावर चर्चा व्हायला हवी. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात काय सांगितले गेले, हा इतिहास समजून घ्या, असे खोचकपणे सांगत राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला.
