Santosh Deshmukh Case : संतोष देशमुखांची हत्या कोण लाईव्ह बघत होतं? बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप, पाहा Video
Bajrang Sonawne News : बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांनी आज पोलिसांच्या कारवाईवर संशय उपस्थित करत मारहाण आणि हत्या होताना लाईव्ह बघितली जात होती, असा गंभीर आरोप केला आहे.
संतोष देशमुख यांची हत्या होत असताना लाईव्ह बघितली जात होती, असा गंभीर आरोप बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे. आज मस्साजोग येथे सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनात त्यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बजरंग सोनवणे यांनी आरोपींच्या फोनची सिडिआर चौकशी व्हावी अशी देखील मागणी केली आहे.
मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 78 दिवस उलटून गेलेले आहेत. अद्यापही या प्रकरणी पोलिसांकडून तपासाला गती मिळालेली नाही. त्यामुळे प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याला तत्काळ अटक व्हावी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख, भाऊ धनंजय देशमुख आणि मस्साजोगचे ग्रामस्थ कालपासून अन्नत्याग आंदोलनाला बसले आहे. या आंदोलनाला आज खासदार बजरंग सोनवणे यांनी भेट दिली. यावेळी मध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, पोलिसांनी अद्यापही आरोपींचे आणि ही प्रकरण वेळेत नोंद न करून घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे सीडीआर का तपासलेले नाहीत? निवडणुकीत असलेल्या उमेदवाराचे फोन तुम्ही टॅप करतात तर आरोपींचे सीडीआर का नाही काढत? असा सवाल सोनवणे यांनी उपस्थित केला आहे.
संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यावर सर्व ग्रामस्थ त्यांचा शोध घेत असताना आरोपाच्या भोवऱ्यात असलेल्या पोलीस निरीक्षक पाटील यांनाच कशी संतोष देशमुख यांची बॉडी सापडली? त्यांचा मृतदेह पोलिसांनाच सापडावा हे संशयास्पद आहे. इतकंच नाही तर संतोष देशमुख यांना मारत असताना हा सर्व प्रकार लाईव्ह बघितला जात होता, ही अंगावर शहारे आणणारी घटना आहे, असा खळबळजनक खुलासा यावेळी बजरंग सोनवणे यांनी केला आहे. त्यामुळे हा गौप्यस्फोट सोनवणे यांचा रोख कोणाकडे होता? यावरून आता चर्चा सुरू झाल्या आहेत.
