Santosh Deshmukh Case : बीडच्या गाजलेल्या हत्या प्रकरणातून निकम बाहेर? आता हे वकील लढवणार केस
संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज सुनावणी पार पडली आहे. यावेळी मोठी माहिती समोर आली आहे.
संतोष देशमुख खून प्रकरणी आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. यावेळी न्यायालयाने आरोपींचे दोषमुक्तीचे अर्ज फेटाळलेले आहेत. ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात संतोष देशमुखांना नये मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न केलेले बघायला मिळत असतानाच आता वकील उज्ज्वल निकम हे यापुढे ही केस लढणार की नाही अशी चर्चा सुरू झाली आहे.
यामागचे कारण म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निकम यांची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती केली आहे. आता खासदार म्हणून त्यांना या खटल्यात बाजू मांडता येईल का, असा सवाल निर्माण झाला आहे. निकम यांनी यापूर्वी सांगितले होते की, ते कायदा तज्ज्ञांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतील. त्यानंतर आज पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारल्यावर उज्ज्वल निकम म्हणाले की, माझ्या इतकेच माझे सहकारी बाळासाहेब कोल्हे हे देखील सक्षम असल्याने या खटल्याचं पुढे काय होईल याबद्दल आपण निश्चिंत राहावं. या खटल्याची सुनावणी ही तातडीने होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे खटल्याच्या 4 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पुढच्या सुनावणीला उज्ज्वल निकम उपस्थित राहणार का? हे पहाणं महत्वाचं ठरेल.
