Satish Bhosale : गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्या भोसलेला धमकी?
Satish Bhosale Case : आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले याला वन विभागाच्या कोठडीत असताना मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. त्यावर आज खोक्या भोसलेच्या वकिलांनी पोलीस अधिक्षकांना तक्रार दिलेली आहे.
आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले याला वन विभागाच्या कोठडीत असताना मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप खोक्या भोसले तसंच त्याच्या वकिलांनी केला आहे. यासंदर्भात आज खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या वकिलांनी बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याकडे तक्रार देखील दाखल केलेली आहे.
यावेळी बोलताना सतीश भोसले याचे वकील अंकुश कांबळे यांनी सांगितलं की, सतीश भोसले याला वन विभागाने हरणाची शिकार आणि तस्करी करण्याच्या आरोपाखाली चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे. यावेळी चौकशीदरम्यान सीसीटीव्ही बंद करून सतीश याला मारहाण करण्यात आली आहे. तसंच तूच हा गुन्हा केला असल्याचं कबूल कर, अन्यथा तुझ्या घराजवळ रायफल बॉम्ब ठेऊन तुला नक्षलवादी घोषित करू, अशा धमक्या दिल्या आहेत. याबद्दल आज आम्ही पोलीस अधीक्षकांना तक्रार देखील दिलेली आहे. तसंच सतीश भोसले याच्या संपूर्ण कुटुंबाला वन विभागाकडून धोका आहे, माझ्या जीवाला धोका आहे त्यामुळे आम्हाला पोलीससंरक्षण देण्यात यावं अशी मागणी केली असल्याचं यावेळी बोलताना वकिलांनी सांगितलं
