MLA Corruption : अजितदादांनंतर शिंदेंच्या आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर आमदार मंगेश कुडाळकर गोत्यात! आरोप नेमके काय?
शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्यावर निधी गैरवापराप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. मतदारसंघाच्या विकासासाठी मिळालेला निधी माडाच्या भूखंडावर सभागृह आणि कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी वापरून ते भाड्याने दिल्याचे आरोप आहेत. तक्रारदार रमेश बोरवा यांच्या पुराव्यांवरून न्यायालयाने एसीबीला कारवाईचे निर्देश दिले.
शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. निधी गैरवापराच्या एका गंभीर प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आमदार कुडाळकर यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी मिळालेला निधी म्हाडाच्या आरक्षित भूखंडावर सभागृह आणि कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी वापरल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे, तर ही बांधकामे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी भाडेतत्त्वावर दिल्याचा दावा तक्रारदार रमेश बोरवा यांनी केला आहे. बोरवा यांनी न्यायालयात यासंदर्भात पुरावे सादर केले. न्यायालयाने हे प्रकरण गंभीर असल्याचे निरीक्षण नोंदवत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (ACB) आमदार कुडाळकरांवर गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. या सुनावणीवेळी आमदार कुडाळकर किंवा एसीबीचे प्रतिनिधी कोणीही उपस्थित नव्हते, ही बाबही समोर आली आहे. कुडाळकर यांनी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे म्हटले आहे. अजित पवार गटातील काही नेत्यांवर आरोप झाल्यानंतर आता शिंदे गटातील नेत्यांवरही आरोप होत असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
