Santosh Bangar : ‘रुग्णला अमृत पाजलं का? डेंग्यूचा ताप अन् 6 लाखांचं बील…’, शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं, ऑडिओ व्हायरल

Santosh Bangar : ‘रुग्णला अमृत पाजलं का? डेंग्यूचा ताप अन् 6 लाखांचं बील…’, शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं, ऑडिओ व्हायरल

| Updated on: Apr 11, 2025 | 6:47 PM

डेंग्यू तापाच्या रुग्णाचं बिल 6 लाख रुपये कसं? रुग्णाला अमृत पाजलं का? असा थेट सवाल करत शिंदेंच्या शिवसेनेचे संतोष बांगर हे छत्रपती संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयातील डॉक्टरवर भडकल्याचे पाहायला मिळत आहे.

डेंग्यू तापाच्या रूग्णाचं तब्बल ६ लाख रूपये बील रूग्णालयाकडून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार संभाजीनगरमधून समोर आला आहे. या प्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. ‘डेंग्यू तापाच्या रूग्णाचं ६ लाख बिल कसं?’, असा सवाल करत संतोष बांगर डॉक्टरवरच भडकल्याचे पाहायला मिळाले. इतकंच नाहीतर रुग्णाला अमृत पाजलं का? असा सवालही आमदार संतोष बांगर यांनी संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयाच्या डॉक्टरला करत ते त्यांच्या चांगलेच संतापले. आमदार संतोष बांगर यांची ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. दरम्यान या व्हायरल ऑडिओ क्लिपची टीव्ही नाईन मराठी पुष्टी करत नाही.

‘हॅलो… डॉक्टर साहेब नमस्कार… हा नमस्कार…. आमदार बांगर बोलतो. हा नमस्कार साहेब. एक आदिती माणिकराव सरकटे म्हणून पेशंट आहे माझ्याकडचा. हो सर ते तीन लाखाचं मेडिकल आणि २ लाख ८५ हजार रुपये तिचं बिल झालंय. एक लाख ८० हजार रुपये जमा केले आणि बाकीचे पैसे राहिले तर मला वाटतं आता दहा दिवसाचं म्हणजे सहा लाख रुपये डेंग्यूच्या पेशंटला कितीपत योग्य आहे? आता तुम्हाला माहित नाही त्याची कंडिशन. अहो कंडिशन कितीही खराब असू द्या ना तिला काय अमृत पाजलंय का तुम्ही? दहा दिवसाचे सहा लाख रुपये कशाला म्हणतात?’ असं संभाषण बांगर यांचं डॉक्टरांसोबत झाल्याची क्लिप व्हायरल होतेय.

Published on: Apr 11, 2025 05:47 PM