‘नार्वेकरांचं ‘ते’ म्हणणं म्हणजे धादांत लबाडी’, अंधारेंचा विधानसभाध्यक्षांवरच निशाणा अन् कोकाटेंच्या राजीनाम्याची केली मागणी
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवरून घटनेनुसार योग्य निर्णय घेणार असं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवरून घटनेनुसार योग्य निर्णय घेणार असं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. यावरून विरोधकांनी राहुल नार्वेकरांनाच घेरलंय. ‘माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळेपर्यंत फिलर भरून काढला जातोय’, असं म्हणत उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. तर माणिकराव कोकाटे यांच्या निकालाची प्रत आल्यावर निर्णय घेऊ हे नार्वेकरांचं म्हणणं म्हणजे धादांत लबाडी आहे, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी राहुल नार्वेकरांवर खोचक निशाणा साधला आहे. ‘माणिकराव कोकाटे यांच्या निकालाची प्रत आल्यावर निर्णय घेऊ हे नार्वेकरांचं म्हणणं म्हणजे धादांत लबाडी आहे. वास्तविक निकालाची प्रत न्यायालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. मात्र कोकाटेंना उच्च न्यायालयाकडून शिक्षेला स्थगिती मिळण्यासाठी जो कालावधी लागत आहे, तो फिलर नार्वेकर भरून काढत आहेत!’, असं ट्विट सुषमा अंधारेंनी केलं तर पुढे त्या असंही म्हणाले, माणिकराव कोकाटे प्रकरणांमध्ये नार्वेकर निकालाच्या प्रतीची वाट बघत आहेत. मात्र 38 पानी निकाल ऑनलाईन उपलब्ध आहे. वकील असणाऱ्या नार्वेकरांना सहजासहजी उपलब्ध होत नसेल तर मी द्यायला तयार आहे. कोकाटे यांचा राजीनामा कधी घेणार? की त्याच्यातही पुन्हा काही सेटिंग ठरली आहे? असा सवाल सुषमा अंधारेंनी केला आहे.
