घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
कोल्हापुरात एक चिमुकला रात्री एकटाच आपल्या शेताची राखण करत असल्याचा हृदय पिळवटणारा प्रकार कोल्हापुरात समोर आला आहे.
घरात आजारी वडील, काढणीला आलेलं पीक आणि शेतात डुकरांचा वावर अशी सगळी परिस्थिती असताना वडिलांना मात्र रात्रीचं शेतात राखण करायला जावं लागू नये म्हणून कोल्हापुरात एक चिमुकला रात्री एकटाच आपल्या शेताची राखण करत असल्याचा हृदय पिळवटणारा प्रकार कोल्हापुरात समोर आला आहे.
रात्रीच्यावेळी रानटी जनावरं शेतात पिकांची नासाडी करतात, त्यामुळे शेतात राखणीसाठी थांबणं गरजेचं असतं. रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात शेताची राखण करणं हे जिकरीच काम आहे. मात्र घरात राबणारे वडील आजारी पडल्याने त्यांना आराम मिळावा म्हणून एक चिमुकला एकटाच रात्री शेतात पिकांची राखण करताना दिसून आला. यावेळी टीव्ही9 च्या प्रतिनिधीने या लहानग्याशी बातचीत केली तेव्हा त्याने सांगितलं की, वडिलांनी कष्टाने वाढवलेली पिकं अशी जनावरांना नसवू द्यायची का? त्यांनी पिकांचं नुकसान केलं तर आम्ही काय खायचं? या पिकांवरच आमचं घर चालणार आहे. त्यामुळे घरातलं कोणीतरी इथे थांबण गरजेचं आहे, असं उत्तर या चिमूकल्याने दिलं.
