फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? राऊतांच्या दाव्यावर बावनकुळेंची मोठी प्रतिक्रिया
Chandrashkhar Bawankule on Sanjay Raut: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच केंद्रात जातील. ते मनुष्यबळ विकास मंत्रालय चांगले संभाळू शकतात असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खरमरीत टीका केली आहे. तर कोतवालांना तलाठी भरतीमध्ये 20 टक्के आरक्षण देणार अशी घोषणा त्यांनी केली.

केंद्रात मनुष्यबळ विकास खातं बघा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुचवल्याचा दावा उद्धव ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी दावा केला होता. त्यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस केंद्रात जाण्याच्या वावड्यांवर लक्ष देऊ नका असे ते म्हणाले. विकसीत महाराष्ट्राचा संकल्प फडणवीस हेच पूर्ण करू शकतात. राऊतांच्या दाव्यावर महसूलमंत्र्यांनी असे उत्तर दिले. त्यांच्याकडे तिसरा डोळा आहे का माहित नाही. पण फडणवीस साहेब राज्यातच राहाणार. त्या वावड्यांवर विश्वास ठेवू नका असे ते म्हणाले. त्यांनी मंत्री संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांच्या दिपके यांच्या भेटीवरही नाराजी व्यक्त केली.
शिवसेनेच्या भूमिकेवर नाराजी
पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार बच्चू कडू यांनी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची भेट घेतली. त्यावरून भाजप नेते नाराज झाले आहेत. रत्नगिरीमध्ये माध्यमांशी बोलताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. एकनाथ शिंदे यांनी अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे. शेवटी त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यांच्या नेत्यांनी कसं वागलं पाहिजे हे एकनाथ शिंदे यांनी ठरवले पाहिजे. महायुतीत काम करताना असे वर्तन करणे योग्य नाही, असे महसूलमंत्री म्हणाले.
शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे सरकारचे अभिवचन
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर कार्यक्रमासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रत्नागिरीत दाखल झाले होते. रत्नागिरी ही वीर सावरकरांची भूमी आहे. उद्योग क्षेत्रात नवीन क्रांती आणण्यासाठी जबाबदारी उदय सामंत यांनी घेतली आहे. तहसील कार्यालयात जनतेने जाण्याऐवजी तहसील कार्यालयाने जनतेकडे जावं यासाठी हे अभियान आहे. महायुतीने जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचं काम आमच्या सरकारने केलं आहे, असे बावनकुळे म्हणाले.
चिपळूण मतदारसंघ या SIR मध्ये राज्यात पहिला
राज्यातील शेतकऱ्याला कृषी पंपाचं बिल यापुढे येणार नाही, हा निर्णय आमच्या सरकारने घेतला. शेतमजूर महिलेला देखील शेतकरी दर्जा देण्याचं काम सरकारने केलं. SIR सध्या सुरू आहे, या यादीत कोणत्याही मृत, घुसखोरी केलेल्याचं नाव राहणार नाही. चिपळूण मतदारसंघ या SIR मध्ये राज्यात पहिला आलेला आहे. तर जिल्ह्याने देखील पहिला क्रमांक मिळवलेला आहे, त्याबद्दल अधिकाऱ्यांचं अभिनंदन त्यांनी केलं.
कोतवालांना तलाठी भरतीमध्ये 20 टक्के आरक्षण देणार
कोतवालांना तलाठी भरतीमध्ये 20 टक्के आरक्षण देणार आणि निर्णय लवकरच घेणार बावनकुळे यांनी महत्त्वाची घोषणा केली. पुढच्या दोन वर्षात संपूर्ण जिल्ह्याचं मोजमाप करणार आहे. शेत पाणंद रस्त्यांकरता आणि साकव बांधण्यात सीएसआर खर्च करा साकवसाठी सरकारही मदत करेल असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले. आधी मोजणी नंतर नोंदणी होईल. जमिनीची मोजणी केल्याशिवाय कोणतंही रजिस्ट्रेशन होणार नाही असा कायदा आम्ही आणतोय असे महसूलमंत्री यांनी घोषणा केली. देवस्थान इनाम जमिनींबाबत कायदा डिसेंबरच्या अधिवेशनात आणणार, सर्वसामान्यांना न्याय देणार अशी घोषणाही त्यांनी केली.
