AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik, Ahilyanagar, Jalgaon, Dhule, Malegaon Election Results 2026 LIVE: मामा, तुम्ही मोठंच काम करून टाकलं… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट या खास व्यक्तीला फोन

| Edited By: | Updated on: Feb 09, 2026 | 11:23 AM
Share

Nashik, Ahilyanagar, Jalgaon, Dhule, Malegaon Election Results 2026 LIVE Counting in Marathi: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल आज (शुक्रवार, 16 जानेवारी) सकाळी 10 वाजल्यापासून हाती येत आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि मालेगाव महापालिकांचा निकाल जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

Nashik, Ahilyanagar, Jalgaon, Dhule, Malegaon Election Results 2026 LIVE: मामा, तुम्ही मोठंच काम करून टाकलं... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट या खास व्यक्तीला फोन
election results 2026Image Credit source: Tv9

राज्यातील 29 महापालिकांसाठी गुरुवारी मतदान झालं असून आज (शुक्रवार, 16 जानेवारी) 15,931 उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. मुंबईसह 29 महानगरपालिकांमध्ये एकूण 2869 जागा आहेत. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, जळगाव, धुळे आणि अहिल्यानगर या महानगरपालिकांचा निकाल या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेता येईल. नाशिक महापालिकेत एकूण 31 प्रभाग असून यातून 122 उमेदवार निवडून येणार आहेत. तर मालेगाव महानगरपालिकेत एकूण 21 प्रभागातून 84 नगरसेवक निवडून येतील. अहिल्यानगर महापालिकेत 17 प्रभाग असून 68 सदस्य निवडून येणार आहेत. तर धुळ्यात एकूण 19 प्रभागातून 74 नगरसेवक निवडून येणार आहेत. जळगावातील एकूण 19 प्रभागातून 75 नगरसेवक निवडून येणार आहेत. या महानगरपालिकांमधील कोणते उमेदवार आघाडीवर, कोणते पिछाडीवर, कोणाच्या पदरी निराशा तर कोण उधळणार विजयाचा गुलाल.. या सर्वांचे अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या..

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 16 Jan 2026 07:26 PM (IST)

    जळगावमध्ये सर्वच जागा मिळताच देवेंद्र फडणवीस यांचा या खास व्यक्तीला फोन

    जळगाव महापालिकेत भाजपच्या तसेच महायुतीच्या विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे आमदार सुरेश भोळे यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या आहेत. मामा तुम्ही मोठचं काम करून टाकलं, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सुरेश भोळे यांचे अभिनंदन केले. जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपला 46 पैकी 46 जागा मिळाल्या आहेत. याच विजयावरून मामा तुम्ही अॅटम करून टाकला, असे फोनवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार सुरेश भोळे यांना म्हणाले. जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपच्या वतीने निवडणूक प्रमुख म्हणून आमदार सुरेश भोळे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होते.

  • 16 Jan 2026 05:46 PM (IST)

    धुळेकरांनी विजयाचं गिफ्ट दिलं… जयकुमार रावल यांची प्रतिक्रिया

    मला धुळेकर नागरिकांनी माझ्या 50व्या वाढदिवसानिमित्त 50 जागा जिंकून गिफ्ट दिलं आहे. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सर्वकडे भाजप आहे. उत्तर दिशेला धुळे जिल्हा तर दक्षिण दिशेला मुंबई आहे. त्यामुळे 35 वर्षात मुंबई जिंकली आहे. आता मुंबईकर खुला श्वास घेतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाला नागरिकांनी साथ दिली त्यांचे आभार. संपूर्ण महाराष्ट्र भाजपामय झाला आहे आणि यापुढे पुन्हा एकदा विकास करता येणार आहे, असंही जयकुमार रावल म्हणाले.

  • 16 Jan 2026 05:12 PM (IST)

    शिंदे गटाच्या उमेदवार सिंधुताई कोल्हे विजयी

    जळगावच्या प्रभाग 11 मधील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सिंधुताई कोल्हे विजयी झाल्या आहेत. जळगावच्या कोल्हे कुटुंबातील माजी महापौर ललित कोल्हे स्वतः, तसेच आई सिंधू ताई कोल्हे, मुलगा पीयूष कोल्हे हे तिघेही विजयी झाले आहेत. ललित कोल्हे यांनी कारागृहातून शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवली होती आणि ते विजय झाले आहेत. आरोप कितीही झाले तरी कर्तृत्वाच्या भिंती तोडणे हे अवघड असतं, अशा शब्दात ललित कोल्हे यांच्या पत्नी सरिता माळी कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • 16 Jan 2026 04:48 PM (IST)

    जळगावात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार कुलभूषण पाटील यांच्या समर्थनार्थ जमाव आक्रमक

    मतमोजणी केंद्राबाहेर संतप्त तसेच आक्रमक झालेल्या जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करत रस्त्यावरील दुचाकींची नासधूस करण्याचा प्रयत्न झाला. प्रभाग 10 मध्ये फेर मतमोजणीच्या मागणीसाठी कुलभूषण पाटील यांच्या समर्थनार्थ मतमोजणी केंद्रा बाहेर मोठा जमाव जमला होता. या जमावावर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करत जमावावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी प्रशासनाकडून फेर मतमोजणी घेण्यात आलीच नाही. त्यामुळे कुलभूषण पाटलांचे समर्थक कार्यकर्ते आक्रमक झाले होते. कुलभूषण पाटील मतमोजणी केंद्राच्या बाहेर आल्यानंतर जमाव आक्रमक झाला होता.

  • 16 Jan 2026 04:34 PM (IST)

    भारतीय जनता पार्टीची धुळे महानगरपालिकेवर एक हातीसत्ता

    धुळे महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आली आहे. भाजपने गेल्या निवडणुकीप्रमाणे जिंकले यंदाही 51 जागा जिंकल्या आहेत. त्या खालोखाल एमआयएमने 10 जिंकून दुसरं स्थान मिळवलं आहे. तर ठाकरे सेना आणि काँग्रेसचा या निवडणुकीत सुपडा साफ झाला आहे.

  • 16 Jan 2026 04:11 PM (IST)

    आता घोडेबाजार थांबणार, बहुमत गाठताच; डॉक्टर सुजय विखेंची प्रतिक्रिया

    अहिल्यानगरच्या इतिहासात पहिल्यांदाच महानगरपालिकेत भाजप आणि राष्ट्रवादीला स्पष्ट बहूमत मिळालं आहे. आता नगरसेवकांचा घोडेबाजार थांबणार आहे. हा विजय नगरमधील मतदार, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाचा आहे. कोणालाही आता पळून जाता येणार नाही. आम्ही पळून जाण्यासाठी जागाच ठेवली नाही, असं भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी म्हटलंय. तर अहिल्यानगरच्या मतदारांचे अंत:करणापासुन आभार. आम्ही जी आश्वासने दिली ती पूर्ण करणार आहोत, अशी प्रतिक्रिया आमदार संग्राम जगताप यांनी दिलीय.

  • 16 Jan 2026 04:01 PM (IST)

    जळगावमध्ये 75 पैकी 69 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी

    जळगाव महापालिकेत भाजप 46, शिवसेना 22 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा 1 जागेवर विजय झाला आहे. प्रभाग क्रमांक 17 मधील ठाकरे गटाचे चारही उमेदवार तर प्रभाग सहामधील 1 असे शिवसेना ठाकरे गटाचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत. एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. जळगाव महापालिकेवर 69 जागांसह महायुतीचा झेंडा फडकला आहे.

  • 16 Jan 2026 03:38 PM (IST)

    Nashik Mahapalika Election Results: नाशिकमध्ये भाजपची एकहाती सत्ता

    नाशिक महानगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली आहे. भाजपने 62 चा जादुई आकडा गाठला आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने नाशिक महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. शिंदेंचा शिवसेना पक्ष दोन नंबरचा ठरला आहे.

  • 16 Jan 2026 03:19 PM (IST)

    Jalgaon Mahapalika Election Results: मुंबईकरांनी ठाकरे बंधूंना नाकारलंय- भाजप आमदार

    “जळगाव महापालिकेत विरोधकांना सपशेल नाकारलं आहे. जळगाव महापालिकेत 75 जागांपैकी 70 जागेवर महायुतीने यश संपादन केलं. विरोधक काम करत नाहीत, जातीयवादी राजकारण करतात. यामुळे विरोधकांना सर्वात मोठा फटका बसला आहे. तर मुंबईकरांनी ठाकरे बंधूंना नाकारलं आहे. ठाकरे मिया जोडीला मुंबईकरांनी घरी बसवलं आहे,” अशा शब्दांत भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे.

  • 16 Jan 2026 03:10 PM (IST)

    Malegaon Mahapalika Election Results: दोन उमेदवार पराभूत झाल्याने गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती- दादा भुसे

    मालेगाव महानगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाचे 18 उमेदवार विजयी झाले आहेत. विजय उमेदवारांचं श्रेय जनता जनार्दनाला जातं. धनुष्यबाणाला विजय केल्याबद्दल मी जनता आणि शिवसैनिकांचे आभार मानतो. मालेगावच्या विकासावर जनतेनं मतदान केलं आहे. दोन उमेदवार पराभूत झाल्याने गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाठिंब्याबाबत अद्याप विचार केला नाही. पदाधिकारी आणि वरिष्ठांशी चर्चा करून आम्ही पाठिंबासंदर्भात निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया मंत्री दादा भुसे यांनी दिली.

  • 16 Jan 2026 02:57 PM (IST)

    Nashik Mahapalika Election Results: नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 23 चा निकाल 

    नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 23 चा निकाल समोर आला असून भाजपचे चारही उमेदवार विजयी ठरले आहेत. प्रभाग 23 अ मधून भाजपच्या रुपाली निकुळे, ब मधून भाजपच्या मंगला प्रकाश नन्नावरे, क मधून भाजपच्या संध्या अभिजीत कुलकर्णी आणि ड मधून भाजपचे चंद्रकांत कारभारी खोडे विजयी ठरले आहेत.

  • 16 Jan 2026 02:47 PM (IST)

    Nashik Mahapalika Election Results: प्रभाग 14 मध्ये काँग्रेसचे 3, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक उमेदवार विजयी

    नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये काँग्रेसचे 3 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराचा विजय झाला. प्रभाग क्रमांक 14 मध्ये भाजपकडून उमेदवार न दिल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला फायदा झाला आहे. काँग्रेसचे नाझीया अत्तार ,सामीया खान, सुफी जीन आणि अजित पवार राष्ट्रवादीचे जागृती गांगुर्डे विजयी झाले आहेत.

  • 16 Jan 2026 02:38 PM (IST)

    Dhule Mahapalika Election Results: धुळे महानगरपालिकेतील जागांचे अपडेट्स

    एकूण जागा-74 भाजप-40 शिवसेना-3 राष्ट्रवादी- ठाकरे- काँग्रेस-0 मनसे-00 शरद पवार गट-00 एम आय एम -8 इतर-0

  • 16 Jan 2026 02:28 PM (IST)

    Jalgaon Mahapalika Election Results: विजयानंतर मंत्री गुलाबराव पाटलांचा कार्यकर्त्यांसोबत जल्लोष

    जळगाव महानगरपालिकेतील महायुतीच्या विजयानंतर मंत्री गुलाबराव पाटलांनी कार्यकर्त्यांसोबत जल्लोष केला. विजयी उमेदवारांसोबत मंत्री गुलाबराव पाटील यांनी डान्स केला. जळगाव महापालिकेवर महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. गुलाबराव पाटलांनी विजयी उमेदवारांसोबत जल्लोष साजरा केला. त्याचबरोबर कार्यकर्त्यांसह ढोल ताशांच्या गजरावर ठेका धरला.

  • 16 Jan 2026 02:20 PM (IST)

    Jalgaon Mahapalika Election Results: जळगाव महापालिकेत 75 पैकी 69 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी

    जळगाव महापालिकेत 75 पैकी 69 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप 46, शिवसेना 22 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा 1 जागेवर विजयी झाला आहे. प्रभाग क्रमांक 17 मधील ठाकरे गटाचे चारही उमेदवार तर प्रभाग सहा मधील 1 असे शिवसेना ठाकरे गटाचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत. तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय आहे. जळगाव महापालिकेवर 69 जागांसह महायुतीचा झेंडा फडकला आहे.

  • 16 Jan 2026 02:18 PM (IST)

    Jalgaon Mahapalika Election Results: ठाकरे बंधूंच्या पराभवाचं कारण त्यांचा निष्क्रियपणा- गुलाबराव पाटील

    “मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीचा बोलबाला आहे. काम आणि जनतेशी असलेला सक्रियपणा याला लोक स्वीकारतात. त्या पद्धतीचा कौल लोकांनी मुंबईत दिला. मराठी सर्वच आहेत, पण आमच्याकडे निवडून येणारा महापौर मराठी आणि हिंदूच होणार. मुंबईकरांनी ठाकरे बंधूंना नाकारल्याची बरीच कारणं आहेत. ती एका वाक्यात सांगता येणार नाहीत. विकास आणि सुविधा जे कोणी देत असतील त्याला लोक स्वीकारतात हे मुंबईने सिद्ध केलं. ठाकरे बंधूंच्या पराभवाचं कारण त्यांचा निष्क्रियपणा आहे. मतदान आलं की सक्रिय होऊन चालत नाही. 24 तास लोकांमध्ये राहावं लागतं. राजकारणात निष्क्रियपणा सोडावा लागतो. जो सक्रिय राहील तोच जीवनात चालत राहील. महाराष्ट्रात सर्वात जास्त महायुतीला स्ट्राईक देणारा जिल्हा जळगाव जिल्हा आहे. मी ठाकरे बंधूंना एवढाच सल्ला देईन की त्यांनी जमिनीवर राहून काम करावं,” अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

  • 16 Jan 2026 02:15 PM (IST)

    Ahilyanagar Mahapalika Election Results: अहिल्यानगर महापालिकेतील आकडेवारी

    भाजप- 25 राष्ट्रवादी (शरद पवार गट)-0 राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 27 शिवसेना (शिंदे गट)- 10 शिवसेना(ठाकरे गट)-1 काँग्रेस-2 मनसे-0 इतर- 3 (बसपा 1 , MIM 2)

  • 16 Jan 2026 02:04 PM (IST)

    Jalgaon Mahapalika Election Results: जळगावात मतमोजणीच्या ठिकाणी मोठा गोंधळ

    जळगावात मतमोजणीच्या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार कुलभूषण पाटील यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. प्रभाग 10 ड मध्ये फेर मतमोजणीसाठी कुलभूषण पाटील यांच्याकडून आंदोलन सुरू होतं. पोलिसांनी बळाचा वापर करून कुलभूषण पाटील यांना मतमोजणीच्या ठिकाणाहून बाहेर काढलं. मतमोजणी सुरू असलेल्या खोलीच्या बाहेर आता कुलभूषण पाटील यांच्याकडून ठिय्या आंदोलन सुरू आहे. कुलभूषण पाटील यांना पोलीस उपाधीक्षक नितीन गनापुरे यांच्याकडून धक्काबुक्की करण्यात आली.

  • 16 Jan 2026 02:01 PM (IST)

    Dhule Mahapalika Election Results: धुळे महानगरपालिकेत भाजपने सत्तेची मॅजिकल फिगर गाठली

    धुळे महानगरपालिकेत भाजपने सत्तेची मॅजिकल फिगर गाठली आहे. भाजपचे 36 उमेदवार विजयी झाले आहेत. बहुमताला लागणारा आकडा भाजपने पार केला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती या महापालिकेत फेल ठरली आहे. मुस्लिम भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसऐवजी मतदारांची एमआयएमला पसंती मिळाली आहे.

  • 16 Jan 2026 01:52 PM (IST)

    Nashik Mahapalika Election Results: नाशिक महापालिकेत सुधाकर बडगुजर यांना दुसरा दणका

    नाशिक महानगरपालिरकेत भाजप नेते सुधाकर बडगुजर यांना मतदारांनी दुसरा दणका दिला आहे. पुत्र दीपक बडगुजर प्रभाग २९ मधून पराभूत झाले आहेत. भाजप बंडखोर उमेदवार मुकेश शहाणे मोठ्या फरकानं विजयी ठरले आहेत. दोन एबी फॉर्म दिल्यानं मुकेश शहाणे यांचा अर्ज बाद झाला होता. बडगुजर पिता पुत्रांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

  • 16 Jan 2026 01:49 PM (IST)

    Jalgaon Mahapalika Election Results: जळगावात ट्रकभर गुलालाची उधळण करत जल्लोष सुरू

    मंत्री गिरीश महाजन यांचे स्विह सहाय्यक अरविंद देशमुख विजय होताच जळगावात ट्रकभर गुलाल आणून जल्लोष साजरा करण्यात आला आहे. जळगाव महापालिकेवर महायुतीचं वर्चस्व सिद्ध होत असल्याने जळगावात जल्लोषाचं वातावरण आहे.

  • 16 Jan 2026 01:47 PM (IST)

    Jalgaon Mahapalika Election Results: प्रभाग १० ड मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार कुलभूषण पाटील यांच्याकडून फेर मतमोजणीची मागणी

    जळगावच्या प्रभाग क्रमांक १० ड मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार कुलभूषण पाटील यांच्याकडून फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली आहे. फेर मतमोजणीसाठी प्रशासन तयार नसल्यामुळे कुलभूषण पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे. पोलीस अधिकारी आणि कुलभूषण पाटील यांच्यामध्ये बाचाबाची सुरू आहे. फेर मतमोजणीच्या मागणीसाठी ठाकरे गटाचे उमेदवार कुलभूषण पाटील यांनी मतमोजणीच्या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं आहे.

    प्रभाग १० ड मध्ये भाजपच्या उमेदवार जाहीर पठाण यांचा विजय झाला आहे. २०० मतांचा फरक असल्याने ठाकरे गटाचे उमेदवार कुलभूषण पाटील यांनी फेर मतमोजणीची मागणी केली आहे. मतमोजणीच्या ठिकाणी गोंधळ होऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त दाखल झाला आहे.

  • 16 Jan 2026 01:38 PM (IST)

    Ahilyanagar Mahapalika Election Results: अहिल्यानगर पालिकेत विजयानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया

    “अहिल्यानगर जिल्ह्याने हॅट्रीक पूर्ण केली आहे. विधानसभा नगरपालिका आणि आता महापालिकेत भाजप महायुतीला मोठं यश मिळालं आहे. पुन्हा एकदा भाजप एक नंबरचा पक्ष आहे हे अहिल्यानगरच्या मतदारांनी दाखवून दिलं आहे. दोन भाऊ एकत्र आल्याने निवडणुका जिंकता येत नाही. फडणवीसांच्या कामावर मतदारांनी विश्वास दाखवला आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत देखील भाजप एक नंबरचा पक्ष राहील,” अशी प्रतिक्रिया पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

  • 16 Jan 2026 01:28 PM (IST)

    Ahilyanagar Mahapalika Election Results: अहिल्यानगर पालिकेत भाजप-राष्ट्रवादी अजित पवार युतीला स्पष्ट बहुमत

    अहिल्यानगर महापालिकेत भाजप-राष्ट्रवादी अजित पवार युतीला स्पष्ट बहुमत मिळत आहे. डॉ. सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप जोडीने बाजी मारली आहे. राधाकृष्ण विखे पाटलांच्या बंगल्यावर कार्यकर्त्यांची गर्दी जमली आहे. राधाकृष्ण विखे पाटीलही कार्यकर्त्यांसमवेत जल्लोषात सहभागी झाले आहेत.

  • 16 Jan 2026 01:18 PM (IST)

    Malegaon Mahapalika Election Results: मालेगाव महापालिकेतील विजयी उमेदवार

    भाजप – 02 शिवसेना – 18 इस्लाम – 19 सपा – 05 काँग्रेस – 01 एमआयएम – 04 इतर – 01

  • 16 Jan 2026 01:09 PM (IST)

    Dhule Mahapalika Election Results: धुळ्यातील प्रभाग क्रमांक 17 मध्ये शिवसेना ठरला जायंट किलर

    धुळ्यातील प्रभाग क्रमांक 17 मध्ये शिवसेना जायंट किलर ठरला आहे. भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या प्रभागामध्ये शिवसेना शिंदे गटाचे दोन्ही उमेदवार विजयी ठरले आहेत. या प्रभागामध्ये भाजपाचे दोन उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते. मात्र मतदानामध्ये शिवसेनेनं बाजी मारली आहे. दिग्गज समजल्या जाणाऱ्या भाजपाच्या शीतल नवले यांचा नवख्या धीरज कलंत्री या शिवसेनेच्या उमेदवाराने पराभव केला.

  • 16 Jan 2026 12:56 PM (IST)

    Jalgaon Mahapalika Election Results: जळगावच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये अपक्ष उमेदवार भारती सोनवणे विजयी

    जळगावच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये अपक्ष उमेदवार भारती सोनवणे विजयी झाल्या आहेत. जळगावच्या महापालिका निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवाराने अखेर खातं उघडलं आहे. अपक्ष उमेदवाराचा विजय झाला असून शिवसेना शिंदे गटाचा पराभव झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार फरदीन खान यांचा पराभव झाला आहे. जळगावात राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या उमेदवारांनी अद्यापही खातं उघडलेलं नाही.

  • 16 Jan 2026 12:46 PM (IST)

    Jalgaon Mahapalika Election Results: जळगावातील प्रभाग क्रमांक 15 मधील भाजपचे 3, शिवसेनेचा 1 उमेदवार विजयी

    जळगाव महानगपालिकेत प्रभाग क्रमांक 15 मधील भाजपचे तीन आणि शिवसेनेचा एक उमेदवार विजयी झाला आहे. भाजपचे उमेदवार अरविंद देशमुख, कलाबाई शिरसाळे, प्रकाश बालानी तर शिवसेनेच्या रेश्मा काळे विजयी ठरल्या आहेत. भाजपचे गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक अरविंद देशमुख यांचा पहिलाच निवडणुकीमध्ये विजय झाला आहे.

  • 16 Jan 2026 12:33 PM (IST)

    Nashik Mahapalika Election Results: नाशिक महानगरपालिकेत भाजपच्या सुधाकर बडगुजर यांना मोठा धक्का

    नाशिक महानगरपालिकेत भाजपच्या सुधाकर बडगुजर यांना मोठा धक्का बसला आहे. स्वतःच्या घरात भाजपचे चार तिकीटं घेणाऱ्या बडगुजर यांना मोठा धक्का बसला आहे. प्रभाग २५ चा निकाल समोर असून ४ पैकी २ जागांवर भाजप तर एका जागेवर शिंदेंची शिवसेना आणि एका जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार विजयी ठरला आहे.

    प्रभाग क्रमांक २५ मध्ये भाजपचे सुधाकर बडगुजर आणि भाजपच्या साधना मटाले विजयी ठरल्या आहेत. तर इतर २ जागांवर शिंदेंच्या सेनेच्या कविता नाईक विजयी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे मुरलीधर भांबरे विजयी झाले आहेत. भाजपने पुरस्कृत केलेले भाग्यश्री ढोमसे आणि प्रकाश अमृतकर पराभूत झाले आहेत.

  • 16 Jan 2026 12:31 PM (IST)

    Jalgaon Mahapalika Election Results: जळगाव महानगरपालिकेतील आतापर्यंतचे अपडेट्स

    एकूण जागा-75

    भाजप- 27 शिवसेना- 15 राष्ट्रवादी-2 ठाकरे-00 काँग्रेस-00 मनसे-00 शरद पवार गट-00 एमआयएम – 00 इतर-

  • 16 Jan 2026 12:21 PM (IST)

    Ahilyanagar Mahapalika Election Results: अहिल्यानगर महापालिकेत कौल कुणाला?

    अहिल्यानगर महापालिकेत एकूण 68 जागा असून त्यात 15 जागांवर भाजप आघाडीवर आहे.

    एकूण जागा-68 भाजप-15 शिवसेना-08 राष्ट्रवादी-20 ठाकरे-01 काँग्रेस-01 मनसे-00 शरद पवार गट-00 एमआयएम – 03 इतर-00

  • 16 Jan 2026 12:13 PM (IST)

    Nashik Mahapalika Election Results: नाशिक महापालिकेचा पहिला निकाल

    नाशिक महानगरपालिकेचा पहिला निकाल समोर आला आहे. नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 16 चा निकाल लागला आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) चारही उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेना (शिंदे) पक्षाचे राहुल अशोक दिवे, आशा रफिक तडवी, पूजा प्रवीण नवले, ज्योती अनिल जोंधळे अशी विजयी उमेदवारांची नावं आहेत.

  • 16 Jan 2026 12:09 PM (IST)

    Jalgaon Mahapalika Election Results: कारागृहातून निवडणूक लढवणारे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार ललित कोल्हे विजयी

    जळगाव महानगरपालिकेत कारागृहातून निवडणूक लढवणारे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार ललित कोल्हे विजयी ठरले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर असलेले ललित कोल्हे यांनी कारागृहातून निवडणूक लढवली होती. बोगस कॉल सेंटर प्रकरणांमध्ये ललित कोल्हे यांना अटक झाली असून ते नाशिक कारागृहात आहेत. महापालिका निवडणुकीमध्ये ललित कोल्हे यांच्याबरोबरच त्यांचे चिरंजीव पियुष कोल्हे हे देखील विजय झाले आहेत. महापालिका निवडणुकीमध्ये कोल्हे कुटुंबातील पिता पुत्राचा विजय झाला आहे.

  • 16 Jan 2026 12:05 PM (IST)

    Jalgaon Mahapalika Election Results: जळगावात आतापर्यंतच्या फेऱ्यांमध्ये महायुतीचाच बोलबाला

    जळगाव महापालिकेत आतापर्यंतच्या फेऱ्यांमध्ये निकालानंतर महायुतीचाच बोलबाला पहायला मिळतोय. महायुतीमध्ये भाजपचा 21, शिवसेना शिंदे गट 12 जागांवर तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एका जागेवर विजय झाला आहे. महाविकास आघाडीने अद्यापही खातं उघडलं नाही. बंडखोरी करणाऱ्या अपक्ष उमेदवारांना देखील धक्का बसला आहे.

  • 16 Jan 2026 11:57 AM (IST)

    Ahilyanagar Mahapalika Election Results: अहिल्यानगर महापालिकेत राष्ट्रवादीचे 16 उमेदवार विजयी

    अहिल्यानगर महानगरपालिकेत 16 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी ठरले आहेत. एकूण जागा-68 भाजप-12 शिवसेना-06 राष्ट्रवादी-16 ठाकरे-01 काँग्रेस-00 मनसे-00 शरद पवार गट-00 एमआयएम – 00 इतर-00

  • 16 Jan 2026 11:55 AM (IST)

    Jalgaon Mahapalika Election Results: प्रभाग क्रमांक 4 मधून शिवसेना शिंदे गटाचे पियुष कोल्हे विजयी

    जळगाव प्रभाग क्रमांक 4 मधून शिवसेना शिंदे गटाचे पियुष कोल्हे विजयी झाले आहेत. मुलगा पियुष कोल्हे यांच्या विजयानंतर आई शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हा आघाडीच्या अध्यक्षा सरिता माळी यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.  कारागृहातून निवडणूक लढवणारे माजी महापौर ललित कोल्हे यांचे चिरंजीव पियुष कोल्हे विजयी झाले आहेत.

  • 16 Jan 2026 11:48 AM (IST)

    Nashik Mahapalika Election Results: नाशिकच्या प्रभाग क्र. 13 मध्ये कोण आघाडीवर?

    नाशिक महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 13 च्या तिसऱ्या फेरीत शिवसेनेचे गणेश मोरे आघाडीवर असून भाजपचे शाहू खैरे पिछाडीवर आहेत. मनसेच्या मयुरी पवार 900 मतांनी आघाडीवर आहेत. तर शिंदेंच्या सेनेच्या सुवर्णा मोरे, भाजपचे हितेश वाघ पिछाडीवर आहेत. भाजपच्या आदिती पांडे पिछाडीवर असून काँग्रेसच्या वत्सला खैरे आघाडीवर आहेत.

  • 16 Jan 2026 11:37 AM (IST)

    Jalgaon Mahapalika Election Results: महायुती 18 जागांनी आघाडीवर

    जळगाव महानगरपालिका निवडणुकीत महायुती 18 जागांनी आघाडीवर आहे. भाजपचे 10, शिवसेनेचे 8, राष्ट्रवादी अजित पवार गटाचा 1 असे महायुतीचे एकूण 18 उमेदवार विजयी झाले आहेत. जळगाव महापालिकेत एकूण 19 प्रभाग असून त्यासाठी 63 जागांवर 321 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

  • 16 Jan 2026 11:34 AM (IST)

    Dhule Mahapalika Election Results: धुळ्यातील प्रभाग क्र. 5 मध्ये भाजपचे सर्व उमेदवार विजयी

    धुळे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. नागसेन बोरसे, प्रतिभा चौधरी, संध्या कदम आणि कृपेश नांद्रे विजयी ठरले आहेत. धुळे महानगरपालिकेमध्ये एकूण 74 प्रभाग असून प्रत्येक प्रभागातून एक नगरसेवक निवडून दिला जातो.

  • 16 Jan 2026 11:24 AM (IST)

    Jalgaon Mahapalika Election Results: गुलाबराव देवकर यांचे चिरंजीव प्रफुल्ल देवकर यांनी मारली बाजी

    जळगाव महानगरपालिकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे चिरंजीव प्रफुल्ल देवकर यांनी पहिल्याच निवडणुकीत बाजी मारली आहे. भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार जितेंद्र मराठे यांचा त्यांनी पराभव केला आहे.

  • 16 Jan 2026 11:23 AM (IST)

    Malegaon Mahapalika Election Results: मालेगाव महापालिकेत कोणाची आघाडी?

    मालेगाव महापालिकेतील प्रभाग क्रमांक 18 मध्ये एमआयएमच्या उमेदवार अल्कमा अब्दुल करीम आघाडीवर आहेत. तर प्रभाग क्रमांक 20 मध्ये इस्लाम पार्टीच्या मेहमूदा बानो आघाडीवर आहेत.

  • 16 Jan 2026 11:21 AM (IST)

    Nashik Mahapalika Election Results: नाशिकच्या प्रभाग क्र. 13 मध्ये कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर?

    नाशिक महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे गणेश मोरे दुसऱ्या फेरीनंतरही आघाडीवर असून भाजपचे शाहू खैरे 374 मतांनी पिछाडीवर आहेत. भाजपच्या अदिती पांडे दुसऱ्या फेरीनंतर आघाडीवर असून रश्मी भोसले पिछाडीवर आहेत. मनसेच्या मयुरी पवार 500 मतांनी दुसऱ्या फेरीत आघाडीवर आहेत. तर भाजपचे हितेश वाघ 300 मतांनी आघाडीवर असून शिवसेनेच्या सुवर्णा मोरे पिछाडीवर आहेत.

  • 16 Jan 2026 11:16 AM (IST)

    Malegaon Mahapalika Election Results: मालेगाव महानगरपालिकेत कौण कुणाला?

    मालेगाव महापालिकेत प्रभाग क्रमांक 18 अ मध्ये पहिल्या फेरीत काँग्रेसचे एजाज बेग, प्रभाग क्रमांक 18 ब मधून एमआयएमच्या नसरीन बानो, प्रभाग क्रमांक 18 क मधून MIM च्या अलकमा कौसर आणि प्रभाग क्रमांक 18 ड मधून एमआयएमचेच शेख सिकंदर आघाडीवर आहेत. तर प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपचे सुनील गायकवाड तिसऱ्या फेरी अखेर 461 मतांनी पुढे आहेत. प्रभाग क्रमांक 21 मध्ये एमआयएमचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष खालिद परवेज यांना धक्का बसला आहे. ते 500 मतांनी पिछाडीवर आहेत. तर इस्लाम पार्टीचे मुशर्रफ रांगडी यांनी आघाडी घेतली आहे.

  • 16 Jan 2026 11:14 AM (IST)

    Jalgaon Mahapalika Election Results: जळगाव महानगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाने उघडलं खातं

    जळगाव महानगरपालिकेमध्ये शिवसेना शिंदे गटानेदेखील खातं उघडलं आहे. प्रभाग क्रमांक 18 मधील शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी ठरले आहेत. प्रभाग क्रमांत 18 मधील नलबाई सोनवणे आणि अनिता बापसे हे शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. तर प्रभाग क्रमांक 19 मध्ये भाजपचे राजेंद्र घुगे विजय ठरले आहेत.

  • 16 Jan 2026 11:11 AM (IST)

    Nashik Mahapalika Election Results: नाशिक महापालिकेतील प्रभाग क्र. 15 ची मतमोजणी थांबवली

    नाशिक महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 15 ची मतमोजणी थांबवण्यात आली आहे. मशीनमध्ये मतदानाची वेळ साडेपाच वाजतानाची असताना पाच वाजून 21 मिनिटांनी मशीन बंद झाल्याचं आढळून आलं. त्यामुळे मतमोजणी थांबवून निवडणूक निर्णय अधिकारी यावर माहिती घेत आहे.

  • 16 Jan 2026 11:07 AM (IST)

    Malegaon Mahapalika Election Results: मालेगाव महानगरपालिकेत कोण-कोण आघाडीवर?

    मालेगाव महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 11 मधील भाजपाचे उमेदवार पमुदादा पाटील आघाडीवर आहेत. शिवसेनेच्या आशाबाई अहिरे, शिवसेनेच्या प्राची पवार, भाजपचे दीपक गायकवाड हेसुद्धा आघाडीवर आहेत. शिवसेना आणि भाजपमध्ये कांटे की टक्कर सुरू आहे. तर प्रभाग क्रमांक 7 मध्ये पहिल्या फेरीत इस्लाम पक्ष आणि MIM यांच्यात चुरस रंगली आहे. प्रभाग क्रमांक 7 मध्ये पहिल्या फेरीत MIM पक्ष आघाडीवर असून प्रभाग 6 मध्ये इस्लाम पक्षाने आघाडी घेतली आहे.

  • 16 Jan 2026 11:01 AM (IST)

    Jalgaon Mahapalika Election Results: जळगावमध्ये भाजपने खातं उघडलं

    जळगावमध्ये भाजपने खातं उघडलं असून प्रभाग क्रमांक 19 मध्ये राजेंद्र घुगे विजय ठरले आहेत. जळगावातील एकूण 75 जागांपैकी 12 जागा बिनविरोध आल्या आहेत. त्यामुळे 19 प्रभागांमधील एकूण 63 जागांसाठी 321 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

  • 16 Jan 2026 10:58 AM (IST)

    Dhule Mahapalika Election Results: चार बिनविरोध उमेदवारांची अधिकृतरित्या घोषणा

    धुळे महानगरपालिका निवडणुकीमध्ये बिनविरोध झालेल्या चार उमेदवारांची निवडणूक आयोगाच्या वतीने अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली आहे. प्रभाक क्रमांक 1 अ मधून उज्वला रणजित भोसले, प्रभाग क्रमांक 6 ब मधून ज्योत्सना प्रफुल्ल पाटील, प्रभाग क्रमांक 17 अ मधून अमोल मासुळे आणि प्रभाग क्रमांक 17 ब मधून सुरेखा रावसाहेब उगले बिनविरोध निवडून आले आहेत.

  • 16 Jan 2026 10:56 AM (IST)

    Nashik Mahapalika Election Results: नाशिक महानगरपालिकेत कोण आघाडीवर?

    नाशिक महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपच्या हिमगौरी आडके आघाडीवर आहेत. तर प्रभाग क्रमांक 23 मधून भाजपच्या संध्या कुलकर्णी आघाडीवर आहेत. नाशिकच्या प्रभाग 1 मध्ये भाजपाच्या दीपाली गीते टपाली मतदानात आघाडीवर आहेत. प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या रश्मी भोसले आघाडीवर आहेत.

  • 16 Jan 2026 10:50 AM (IST)

    Jalgaon Mahapalika Election Results: जळगावात जेलमधून निवडणूक लढवणारे एकनाथ शिंदेंचे उमेदवार आघाडीवर

    जळगावात जेलमधून निवडणूक लढवणारे एकनाथ शिंदेंचे उमेदवार आघाडीवर आहेत. माजी महापौर ललित कोल्हे 228 मतांनी पुढे आहेत.

  • 16 Jan 2026 10:44 AM (IST)

    Nashik Mahapalika Election Results: प्रभाग क्रमांक 3 मधून राष्ट्रवादीचे अंबादास खैरे आघाडीवर

    नाशिक महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 3 मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबादास खैरे आघाडीवर आहेत.

  • 16 Jan 2026 10:43 AM (IST)

    Dhule Mahapalika Election Results: धुळे महापालिका निवडणुकीत भाजप चार जागांवर आघाडीवर

    धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. धुळे महापालिका निवडणुकीत भाजप चार जागांवर आघाडीवर आहे.

  • 16 Jan 2026 10:39 AM (IST)

    Nashik Mahapalika Election Results: नाशिकमध्ये भाजपचे दोन बंडखोर आघाडीवर

    नाशिक महानगरपालिकेत भाजपचे दोन बंडखोर आघाडीवर आहेत. मुकेश शहाणे आणि शशिकांत जाधव आघाडीवर आहेत.

  • 16 Jan 2026 10:39 AM (IST)

    Jalgaon Mahapalika Election Results: भाजपचे सुनिल महाजन आणि जयश्री महाजन आघाडीवर

    जळगाव महानगरपालिकेत भाजपचे सुनिल महाजन आणि जयश्री महाजन आघाडीवर आहेत.

  • 16 Jan 2026 10:37 AM (IST)

    Ahilyanagar Mahapalika Election Results: अहिल्यानगरच्या प्रभाग 17 मध्ये भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आघाडीवर

    अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 17 मध्ये पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत.

  • 16 Jan 2026 10:33 AM (IST)

    Nashik Mahapalika Election Results: नाशिकच्या प्रभाग क्र. 11 मधून दिशा लोंढे आघाडीवर

    नाशिक महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 11 मधून दिशा लोंढे आघाडीवर आहेत. तर प्रभाग क्रमांक 16 मध्ये शिवसेनेचे राहुल दिवे आघाडीवर आहेत.

  • 16 Jan 2026 10:28 AM (IST)

    Nashik Mahapalika Election Results: प्रभाग क्र. 8 मधून शिंदेंच्या शिवसेनेचे विलास शिंदे आघाडीवर

    नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 8 मधून शिंदेंच्या शिवसेनेचे विलास शिंदे टपाली मतदानात आघाडीवर आहेत. तर प्रभाग क्रमांक 9 मधून टपाली मतदानात दिनकर पाटील – अमोल पाटील हे पिता पुत्र आघाडीवर आहेत.

  • 16 Jan 2026 10:23 AM (IST)

    Nashik Mahapalika Election Results: नाशिकच्या प्रभाग क्र. 25 मध्ये भाजपचे सुधाकर बडगुजर आघाडीवर

    नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांर 25 मध्ये टपाली मतदानात भाजपचे सुधाकर बडगुजर आघाडीवर आहेत.

  • 16 Jan 2026 10:20 AM (IST)

    Nashik Mahapalika Election Results: नाशिकच्या प्रभाग 29 मधून अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे आघाडीवर

    नाशिक महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक 29 मधून टपाली मतदानात अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे आघाडीवर आहेत.

  • 16 Jan 2026 10:15 AM (IST)

    Dhule Mahapalika Election Results: धुळ्यात तीन टप्प्यांत होणार मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण

    धुळे महापालिकेच्या एकूण 74 जागा असून त्यापैकी चार जागा आधीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर 70 जागांसाठी 316 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. वखार महामंडळाच्या गोदामातील सहा कक्षात एकाच वेळी मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे.

    सर्वप्रथम टपाली मतांची मोजणी होणार असून एकूण 10 ते 14 मतगणनेच्या फेऱ्या होणार आहेत. पहिल्या टप्प्यात प्रभाग क्रमांक 1, 5, 8, 3, 14, 17 आणि त्यानंतर प्रभाग क्रमांक 2, 6, 12, 9, 15, 18 आणि अखेरच्या टप्प्यात 4, 7, 13, 10, 11, 16, 19 ची मतमोजणी होणार आहे. तीन टप्प्यात होणार मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

  • 16 Jan 2026 10:08 AM (IST)

    Nashik Mahapalika Election Results: मतमोजणी केंद्रात टपाली मतमोजणीला सुरुवात

    नाशिकच्या प्रबोधनकार ठाकरे सभागृहातील मतमोजणी केंद्रात टपाली मतमोजणीला सुरुवात झाली आहे. प्रभाग क्रमांत 25, 26 आणि 28 या तीन प्रभागांची मतमोजणी केली जात आहे. प्रभाग क्रमांक 25 चे भाजप उमेदवार सुधाकर बडगुजरदेखील मतमोजणी केंद्रात उपस्थित आहेत.

  • 16 Jan 2026 10:00 AM (IST)

    Dhule Mahapalika Election Results: धुळ्यात स्ट्राँग रुम उघडण्यात आलं

    धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान झालेलं स्ट्रॉंग रूप उघडण्यात आलं आहे. ईव्हीएम मजमोजणीला सुरुवात झाली आहे. एकाच वेळी सहा ठिकाणी प्रभाग निहाय मतमोजणी होणार आहे. तीन टप्प्यांत ही मतमोजणी होणार आहे.

  • 16 Jan 2026 09:51 AM (IST)

    Nashik Mahapalika Election Results: नाशिक प्रभाक क्र. 13 मध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराची पोलिसांसोबत बाचाबाची

    नाशिकच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. तल्लाह शेख हे प्रभाग क्रमांक 13 मधून उमेदवार आहेत.

  • 16 Jan 2026 09:49 AM (IST)

    Nashik Mahapalika Election Results: नाशिकमध्ये थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात

    नाशिकमध्ये थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. टपाली मतांच्या मोजणीनंतर ईव्हीएममधील मतमोजणी होणार आहे. नाशकात 31 प्रभागांतील 122 जागांचा निकाल लागणार आहे. नाशिकमधील तासाभरात पहिला मतमोजणीचा कल हाती येणार आहे.

  • 16 Jan 2026 09:47 AM (IST)

    Dhule Mahapalika Election Results: धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल

    धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मतमोजणी सुरुवात होईल. धुळे महानगरपालिकेसाठी 74 जागांसाठी निवडणूक पार पडली. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींना सोडण्यास सुरुवात झाली आहे.

  • 16 Jan 2026 09:42 AM (IST)

    Nashik Mahapalika Election Results: मतमोजणी केंद्रावर उमेदवार प्रतिनिधी-पोलिसांमध्ये बाचाबाची

    नाशिकमधल्या प्रबोधनकार ठाकरे इथल्या मतमोजणी केंद्रावर उमेदवार प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. महापालिकेकडून ओळखपत्र दिलेलं असतानाही आधार कार्ड आणि ओरिजनल ओळखपत्राची मागणी केल्यामुळे ही बाचाबाची झाली. मतमोजणी केंद्रात उमेदवार प्रतिनिधींना आत प्रवेश देताना तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान पोलिस आणि उमेदवार प्रतिनिधींमध्ये बाचाबाची झाली.

  • 16 Jan 2026 09:37 AM (IST)

    Malegaon Mahapalika Election Results: मालेगाव महापालिकेतील 84 जागांसाठी मतमोजणी

    काही वेळातच मालेगाव महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणी केंद्रावर उमेदवारांसह प्रतिनिधींची गर्दी होऊ लागली आहे. निवडणूक यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज झाली आहे. मालेगावात 84 जागांसाठी मतमोजणी होणार आहे. यासाठी मतमोजणी केंद्रावर येणाऱ्यांची तपासणी करूनच केंद्रात प्रवेश दिला जात आहे.

  • 16 Jan 2026 09:22 AM (IST)

    Nashik Mahapalika Election Results: नाशिक महापालिकेत मतमोजणीच्या एकूण 12 फेऱ्या

    नाशिकच्या वंदे मातरम सभागृहात प्रभाग क्रमांक 13, 14 आणि 15 ची मतमोजणी पार पडणार आहे. एकूण बारा फेऱ्या होणार असून 12 टेबलवर मतमोजणी होणार आहे. प्रशासकीय यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज असून अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील विशेष खबरदारी घेतली जात आहे. टपाली मतमोजणी झाल्यानंतर मतदान यंत्राच्या मोजणीला सुरुवात होणार आहे.

  • 16 Jan 2026 09:05 AM (IST)

    Nashik Mahapalika Election Results: नाशिक महापालिकेतील प्रभाक क्र. 13 ची लढत महत्त्वाची

    नाशिक महानगरपालिकेसाठी आज मतमोजणी होणार आहे. नाशिकच्या डीजीपी नगर इथल्या वंदे मातरम सभागृह या ठिकाणी प्रभाग क्रमांक 13, 14 आणि 15 यासाठी थोड्याच वेळात मतमोजणी होणार आहे. नाशिकमधल्या सर्वाधिक चर्चेत आणि प्रतिष्ठेच्या लढतींपैकी प्रभाग क्रमांक 13 ची महत्वाची लढत मानली जात आहे.

    भाजपमध्ये ऐनवेळी प्रवेश केलेले शाहू खैरे, विनायक पांडे यांच्या सून आणि बबलू शेलार असे मातब्बर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर ज्यांना भाजपकडून उमेदवारी नाकारलेली होती हे सर्व शिवसेना शिंदे पक्षाकडून निवडणूक लढवत आहे. मतमोजणीच्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाशिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त मतमोजणी केंद्राच्या बाहेर आहे.

  • 16 Jan 2026 08:51 AM (IST)

    Jalgaon Mahapalika Election Results: जळगाव महापालिकेतील 75 पैकी बारा जागा बिनविरोध

    जळगाव महापालिकेतील 75 पैकी बारा जागा बिनविरोध झाल्यामुळे 63 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. एमआयडीसीमधील वखार महामंडळाच्या गोदामामध्ये सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून मतमोजणीची संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हातात येतील असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.

    भाजपच्या सहा आणि शिवसेनेच्या सहा अशा एकूण 12 जागा बिनविरोध झाल्यामुळे 63 जागांसाठी निवडणूक पार पडली. 63 जागांसाठी 321 उमेदवार रिंगणात होते. यात अपक्ष उमेदवारांची संख्या देखील मोठी असल्याचं पाहायला मिळालं. आधीच महायुतीच्या 12 जागा बिनविरोध झाल्यामुळे निकालामध्ये भाजप आणि शिवसेनेने आधीच आघाडी घेतली आहे.

    मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील यांबरोबरच माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह महायुतीच्या आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निकालामध्ये महायुतीचा गुलाल उडतो की महाविकास आघाडी बाजी मारते याकडे राजकीय पक्षांसह जळगावकरांचं लक्ष लागून आहे.

  • 16 Jan 2026 08:40 AM (IST)

    Jalgaon Mahapalika Election Results: जळगाव महापालिका मतमोजणीनिमित्त पोलिसांचा तगडा बंदोबस्त

    जळगाव महापालिका मतमोजणीनिमित्त पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उमेदवारांची पोलिसांकडून कसून चौकशी होत आहे. उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाची मानल्या जाणारी ही महानगपालिका आहे. दिग्गजांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आहे.

  • 16 Jan 2026 08:29 AM (IST)

    Dhule Mahapalika Election Results: धुळे महानगरपालिकेसाठी तीन टप्प्यांत होणार मतमोजणीची

    धुळे महानगरपालिकेच्या एकूण 74 जागा असून त्यापैकी चार जागा आधीच भाजपने बिनविरोध जिंकल्या आहेत. तर 70 जागांसाठी 316 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत मतमोजणी होणार आहे. वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

    सहा कक्षात एकाच वेळी मतमोजणी प्रक्रिया सुरु होणार असून सर्वप्रथम टपाली मतांची मतमोजणी केली जाणार आहे. एकूण दहा ते चौदा मतगणनेच्या फेऱ्या होतील. तीन टप्प्यात मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

  • 16 Jan 2026 08:23 AM (IST)

    Dhule Mahapalika Election Results: धुळ्यात निकालाआधीच भाजपचा चौकार

    धुळे महानगपालिका निवडणुकीत भाजपचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. प्रभाक क्रमांक 1 अ मधून उज्वला रणजित भोसले, प्रभाग क्रमांक 6 ब मधून ज्योत्सना प्रफुल्ल पाटील, प्रभाग क्रमांक 17 अ मधून अमोल मासुळे आणि प्रभाग क्रमांक 17 ब मधून सुरेखा रावसाहेब उगले बिनविरोध निवडून आले आहेत.

  • 16 Jan 2026 08:18 AM (IST)

    Nashik Mahapalika Election Results: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नाशिक शहराध्यक्ष गजानन शेलारांचा राजीनामा

    शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नाशिक शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी राजीनामा दिला आहे. गजानन शेलारांची पक्षातून हकालपट्टी होणार असल्याची चर्चा होती. निवडणूक काळात पक्षाच्या बड्या नेत्यांनी नाशकात सभा न घेतल्याचा शेलारांचा आरोप होता. तर शेलारांच्या निवडणूक काळातील कामगिरीवर पक्षाचे वरीष्ठ नेतेही नाराज होते.

  • 16 Jan 2026 08:06 AM (IST)

    Malegaon Mahapalika Election Results: नाशिक महापालिकेत महायुतीचा भगवा डौलाने फडकेल- दादा भुसे

    “मालेगावातील 24 पैकी 24 उमेदवार शिवसेनेच्या धनुष्यबाणाने निवडून येतील. महायुतीचा भगवा नाशिक महापालिकेत डौलाने फडकेल. एकनाथ शिंदे यांच्याविषयी संपूर्ण महाराष्ट्रात आत्मियता आहे. मालेगावात राजकीय आणि सामाजिक परिस्थिती वेगळी आहे,” अशी प्रतिक्रिया मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

  • 16 Jan 2026 07:53 AM (IST)

    Dhule Mahapalika Election Results: धुळ्यात 74 पैकी 4 जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध

    धुळे महानगपालिका निवडणुकीच्या निकालात मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निवडणुकीत एकूण 74 पैकी चार जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे 70 जागांवर मतमोजणी होणार आहे.

  • 16 Jan 2026 07:40 AM (IST)

    Jalgaon Mahapalika Election Results: जळगाव महापालिकेसाठी 53.60% मतदान

    जळगाव महापालिकेसाठी 53.60% मतदान झालं आहे. या महापालिकेतील 75 जागांसाठीच्या निवडणुकीत महायुतीच्या 12 उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली होती. त्यामुळे आता उर्वरित 63 जागांसाठी उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे.

  • 16 Jan 2026 07:27 AM (IST)

    Jalgaon Mahapalika Election Results: गुंडगिरीची सखोल चौकशीची मागणी करणार, आमदार अनिल पाटील यांचा शिरीष चौधरींवर हल्लाबोल

    शिरीष चौधरी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नंदुरबार इथल्या हाणामारी तसंच दाखल गुन्ह्यावरून आमदार अनिल पाटील यांनी निशाणा साधत तीव्र शब्दात टीका केली आहे. नंदुरबार इथं शिरीष चौधरी यांच्याविरुद्ध दाखल गुन्हेसंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस महानिरीक्षक यांची भेट घेणार असल्याचं अनिल पाटील म्हणाले. इतकंच नव्हे तर गुंडगिरीची सखोल चौकशी करण्याची मागणी करणार असून विधानसभेत आवाज उठवणार असल्याचंही ते म्हणाले.

  • 16 Jan 2026 07:17 AM (IST)

    Jalgaon Mahapalika Election Results: शिरीष चौधरी यांच्यावर अनिल पाटील यांची खोचक टीका

    जळगावच्या अमळनेर इथल्या शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी खोचक टीका केली आहे. शिरीष चौधरी हे दहशतीचं राजकारण करत असून नंदुरबार आणि अमळनेरमधल्या जनतेसाठी घातक असल्याची टीका आमदार अनिल पाटील यांनी केली आहे. गुंड प्रवृत्तीला नेतृत्व देऊन अमळनेरचं नुकसान करू नका, असं आवाहन जनतेला करत जनता तुम्हाला माफ करणार नाही असा सूचक इशारा अनिल पाटील यांनी शिरीष चौधरींना दिला आहे.

  • 16 Jan 2026 07:08 AM (IST)

    Nashik Mahapalika Election Results: नाशिकमधील 122 जागांसाठी 155 टेबलवर होणार मजमोजणीची प्रक्रिया

    नाशिक महापालिकेसाठी गुरुवारी मतदान झाल्यानंतर आज मतमोजणी होणार आहे. एकूण 122 जगासाठी 155 टेबलवर मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. एका प्रभागासाठी तीन टेबलवर मतमोजणी होणार आहे. संपूर्ण मतमोजणीसाठी 465 कर्मचारी नियुक्त असतील. साधारणपणे दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तर 2398 पोलीस कर्मचारी वेगवेगळ्या मतमोजणी केंद्रावर बंदोबस्तासाठी तैनात असतील.

  • 16 Jan 2026 06:59 AM (IST)

    Nashik Mahapalika Election Results: नाशिकमध्ये गेल्या वेळेच्या तुलनेत यंदा 5% कमी मतदान

    गेल्या वेळेच्या तुलनेत नाशिकमध्ये यंदा पाच टक्क्यांनी मतदानाची टक्केवारी कमी झाली. नाशिक महापालिका निवडणुकीत यंदा 56.67 टक्के मतदान झालं. 2017 मध्ये 61.60 टक्के मतदान झालं होतं. घटलेल्या मतदानाचा फटका कोणाला बसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 16 Jan 2026 06:55 AM (IST)

    Jalgaon Mahapalika Election Results: जळगावातील गोळीबाराच्या घटनेचा निवडणूक प्रक्रियेशी संबंध नाही- पोलीस

    जळगाव महापालिकेत अत्यंत सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पडली असून कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. जळगावमध्ये जी गोळीबाराची घटना घडलेली आहे, या घटनेशी कुठलाही मतदान निवडणूक प्रक्रियेशी संबंध नाही. ही घटना वैयक्तिक वादातून घडली आहे. या घटनेत कोणीही जखमी झालं नसून सध्या चौकशी सुरू असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी सांगितलं.

  • 16 Jan 2026 06:47 AM (IST)

    Jalgaon Mahapalika Election Results: प्रशासनाच्या चुकीमुळे 2 महिलांवर मतदानापासून वंचित राहण्याची वेळ

    जळगाव शहरातील प्रभाग 1 मधील गेंदालाल मिल परिसरातील मतदान केंद्रावर दोन महिलांवर मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आली. महिलांची नावं असूनही, मतदानाच्या वेळेत मतदान केंद्रावर प्रवेश करूनही, तसंच अडीच तास रांगेत उभं राहूनही दोन्ही महिला मतदानापासून वंचित राहिल्या आहेत.

    महिलांना 18 व्या क्रमांकाच्या बूथचं टोकन दिलं, मात्र मतदान 15 क्रमांकाच्या बूथमध्ये होतं. तिथे गेल्यावर मतदान प्रक्रिया संपली होती. टोकन देण्यात घोळ झाल्याने मतदानाचा हक्क न बजावता आल्याचं सांगत दोन्ही महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे.

  • 16 Jan 2026 06:38 AM (IST)

    Nashik Mahapalika Election Results: 2017 च्या निवडणुकीत भाजपला बहुमत

    2017 मध्ये नाशिक महानगरपालिकेच्या 31 वॉर्डमधील 122 जागांसाठी निवडणूक पार पडली होती. त्या निवडणुकीत भाजपाने 64 जागांसह विजयी बहुमत प्राप्त केलं होतं. तर 32 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना पक्ष राहिला होता.

  • 16 Jan 2026 06:19 AM (IST)

    Nashik Mahapalika Election Results: नाशिक महापालिकेच्या एक्झिट पोलचे अंदाज काय?

    नाशिक महानगरपालिकेच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. त्याआधी गुरुवारी संध्याकाळी एक्झिट पोलचे अंदाज समोर आले. नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज आहे.

  • 16 Jan 2026 06:08 AM (IST)

    Dhule Mahapalika Election Results: धुळ्यात मतदान यंत्राची मोडतोड

    धुळे महापालिका निवडणुकीदरम्यान प्रभाग क्रमांक 18 मधील मिरच्या मारुती प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रातील खोली क्रमांक एकमध्ये असलेल्या मतदान यंत्राची मोडतोड करण्यात आली. या घटनेनंतर संबंधित मतदान केंद्रावरील मतदान काही काळासाठी थांबवण्यात आलं होतं.

  • 16 Jan 2026 06:06 AM (IST)

    Mahapalika Election Results : राज्यातील 29 महापालिकांसाठी गुरुवारी सरासरी 60% मतदान

    राज्यातील २९ महापालिकांसाठी गुरुवारी सरासरी ६०% मतदान झालं. जवळपास आठ ते दहा वर्षानंतर होणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकांमुळे अनेक ठिकाणी मतदानात उत्साह दिसून आला.

Published On - Jan 16,2026 5:56 AM

Follow Us
अन्नाच्या शोधात पडला बाहेर अन्...; दुबईतून मराठी माणसाचा व्हिडीओ समोर
अन्नाच्या शोधात पडला बाहेर अन्...; दुबईतून मराठी माणसाचा व्हिडीओ समोर.
इराण युद्धाचा केळी उत्पादकांना फटका, करमाळ्यात 1,200 कंटेनर पडून
इराण युद्धाचा केळी उत्पादकांना फटका, करमाळ्यात 1,200 कंटेनर पडून.
रोहित पवार उद्या पुन्हा पत्रकार परिषद घेणार; कोणते नवे मुद्दे मांडणार?
रोहित पवार उद्या पुन्हा पत्रकार परिषद घेणार; कोणते नवे मुद्दे मांडणार?.
भारतातील पहिले आणि शेवटचे ग्रहण! आज दिसणार खग्रास, खंडग्रास चंद्रग्रहण
भारतातील पहिले आणि शेवटचे ग्रहण! आज दिसणार खग्रास, खंडग्रास चंद्रग्रहण.
हज यात्रेसाठी गेलेले येवल्यातील 6 पर्यटक मक्का शहरात अडकले
हज यात्रेसाठी गेलेले येवल्यातील 6 पर्यटक मक्का शहरात अडकले.
मी कधी होळी खेळत नाही, पण...; होळी उत्सवात गौतमी पाटीलचा सहभाग
मी कधी होळी खेळत नाही, पण...; होळी उत्सवात गौतमी पाटीलचा सहभाग.
जय पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडीओवर भुजबळांकडून मोठा खुलासा!
जय पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडीओवर भुजबळांकडून मोठा खुलासा!.
मुलगा कुवेतमध्ये अडकला; अभिनेत्री विशाखा सुभेदारांना अश्रु अनावर
मुलगा कुवेतमध्ये अडकला; अभिनेत्री विशाखा सुभेदारांना अश्रु अनावर.
अंबादास दानवेंकडून संभाजीनगरात पदाधिकाऱ्यांसोबत रंगोत्सव साजरा
अंबादास दानवेंकडून संभाजीनगरात पदाधिकाऱ्यांसोबत रंगोत्सव साजरा.
सर्वांना सुखरुप भारतात आणणार! शिंदेंनी दिलं आश्वासन
सर्वांना सुखरुप भारतात आणणार! शिंदेंनी दिलं आश्वासन.