Maharashtra News LIVE : असदुद्दीन ओवैसी 9 मे रोजी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर
Maharashtra News LIVE : हिंगोली-औंढा नागनाथ तालुक्यातील संघनाईक तांड्यात भीषण पाणी टंचाई. हंडाभर पाण्यासाठी वृद्ध महिला व लहानग्यांना रानावनात भटकंती करावी लागत आहे. यासह देश-विदेश,मनोरंजन, क्रीडा, राजकारण क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचता येतील. दिवसभर फॉलो करा हा ब्लॉग.

मुंबईतील कुर्ला एलवार्ड, घाटकोपर आणि आसपासच्या परिसरात पाणी टंचाईने नागरीक हैराण झाले आहेत. आज संध्याकाळी 6 पर्यंत पुरवठा बंद राहणार . शहरातील अनेक भागांत आज पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय मनपाकडून घेण्यात आला आहे. नागरिकांनी पाणी साठवून ठेवावे आणि काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान पुण्यातील पाणी कपात 31 मे पर्यंत टळली आहे. मुंबईच्या पाणी कपातीच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे शहरात 31 मे पर्यंत कोणतीही पाणी कपात केली जाणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय महापौर मंजुषा नागपूर यांनी मंगळवारी घेतला. जालनाचे शिवसेनेचे आमदार अर्जून खोतकर यांनी 12 नगरसेवकांना सोबत घेत एकनाथ शिंदेंची भेट घेतली. खोतकर यांनी छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांच्यासह शिवसेनेच्या 12 नगरसेवकांना घेऊन मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल संध्याकाळी भेट घेत जालना विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित व प्रस्तावित विकासकामांचा सविस्तर आढावा सादर केला.
LIVE NEWS & UPDATES
-
राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचारीची हिंदी भाषेची परिक्षा होणार नाही
नाशिक : राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचारीची हिंदी भाषेची परिक्षा होणार नाही. तसा निर्णय मंत्री उदय सामंत यांनी घेतला आहे. 1976च्या नियमावली नुसार दरवर्षी परीक्षा घेतली जात होती, असं यावेळी उदय सामंत यांनी सांगितले आहे.
-
नागपुरात गांजाच्या मोठ्या तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश
नागपूर शहरात ड्रग माफिया विरोधात पोलिसांची आक्रमक मोहीम सुरू आहे . गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ४ ने ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत सक्करदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत छापा टाकून गांजाच्या मोठ्या तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
-
-
नाशिकमध्ये आज ‘कुंभउद्योग संगम’, १५ ते २० हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार होण्याची शक्यता
नाशिकमध्ये आज ‘कुंभउद्योग संगम’ आणि जिल्हा गुंतवणूक समिटचा भव्य शुभारंभ करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात कुंभउद्योग संगमास मार्गदर्शन करणार आहेत. उद्योग समिटमधून १५ ते २० हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
-
जालन्यात इंधन टंचाई, पेट्रोल उपलब्ध नसल्याचे बॅनर्स
जालना शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलचा इंधन साठा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही पेट्रोल पंपाच्या समोर इंधन साठा उपलब्ध नसल्याचे बोर्ड लागले आहेत. शिवाय ज्या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध आहे अशा पेट्रोल पंपावर दुचाकीसह चारचाकी वाहनधारकांनी इंधन भरण्यासाठी मात्र मोठी गर्दी केल्याचं पहायला मिळत आहे.
-
असदुद्दीन ओवैसी 9 मे रोजी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर
AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी 9 मे रोजी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असणार आहे. यावेळी ते महाराष्ट्रातील सर्व नगरसेवक आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. महानगरपालिका निवडणुकांनंतर पहिल्यांदाच ओवेसी छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार आहेत. महाराष्ट्रात AIMIM पक्ष संघटन वाढीबाबत ओवेसी यांच्या उपस्थितीत चर्चा होणार आहे.
-
-
वाशिम : अडोळ प्रकल्पात केवळ 12.95 टक्के जलसाठा
वाशिम जिल्ह्यातील वाढत्या उष्णतेमुळे पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. मालेगाव तालुक्यातील बोराळा येथील आडोळ प्रकल्पात सध्या केवळ 12.95 टक्के जलसाठा शिल्लक राहिला असून या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या रिसोड शहराला आणि 8 ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करताना प्रशासनास मोठी कसरत करावी लागत आहे.
-
पुरंदर : सरकारने जमिनीचा मोबदला वाढवून द्यावा, शेतकऱ्यांची मागणी
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ भूसंपादन संमती प्रक्रिया सुरू झाली आहे. आता सरकारने शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला वाढवून द्यावा अशी मागणी विमानतळ बाधित शेतकऱ्यांनी केली आहे, आम्ही मोजणीसाठी संमती दिलीय मात्र जमीन खरेदीसाठी अजून संमती दिली नाही असंही शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.
-
नंदुरबारच्या तळोदा शहरात भीषण अपघात, एकाचा मृत्यू
तळोदा शहरालगतच्या बायपास रोडवर आज बुधवारी सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. ट्रकच्या टायरमधील हवा तपासत असताना अचानक झालेल्या भीषण स्फोटात चालकाचा जागीच मृत्यू झाला. सानेश्वर दिलीप मिस्तरी असं चालकाच नाव आहे. गुजरातवरून सिमेंट भरून आलेला ट्रक रिकामा करण्यापूर्वी ते टायरची तपासणी करत होते. त्यावेळी हा अपघात झाला.
-
रायगडातील २८ धरणांमध्ये केवळ २९ टाके पाणीसाठा शिल्लक
पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या रायगडातील २८ धरणांमध्ये केवळ २९ टाके पाणीसाठा शिल्लक.. मे अखेरीस रायगडकरांना टंचाईच्या झळा बसण्याची शक्यता..१० तालुक्यांत आतापासूनच तीव्र पाणीटंचाई..
-
राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा
पंढरपूर तालुक्यातील सुस्ते गावात नृत्यांगना राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा… कार्यक्रम बघायला आलेल्यांमध्ये हाणामारी… राड्यानंतर राधा पाटीलचा कार्यक्रम अर्ध्यातच थांबवला
-
उल्हासनगरातील दिपाली चव्हाण यांची फॅमिली डॉक्टरकडून 31 लाखाची फसवणूक
उल्हासनगरातील दिपाली चव्हाण यांची फॅमिली डॉक्टरकडून 31 लाखाची फसवणूक… लाखो रुपये देऊनही पतीचं ऑपरेशन झाले नाही आणि किडनी डोनरही मिळाला नाही… डॉक्टरसह 7 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
-
करमाळा शहरातील दत्त पेठेत शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या
करमाळा शहरातील दत्त पेठेत शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या.. तिघांविरोधात करमाळा पोलिसात गुन्हा दाखल.. आशा अर्जुनसिंग परदेशी असे मृत महिलेचे नाव..
-
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दारात विक्रमी वाढ
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दारात विक्रमी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात 2 हजार 900 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 7 हजार रुपयांची वाढ.
सोन्याचं दर जीएसटीसह 1 लाख 55 हजार 221 रुपये तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 58 हजार 350 रुपयांवर पोहोचले आहेl. अमेरिका व इराण यांच्यातील युद्धविरामासंदर्भात बैठक होऊन चर्चा होणार असल्याने त्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर झाल्याचं सराफ व्यावसायिकांचे म्हणणं आहे.
दोन्ही देशांमध्ये आज युद्धविरामा संदर्भात चर्चा झाली तर सोन्या चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ होण्याचा अंदाज सराफ व्यावसायिक यांनी व्यक्त केला आहे
-
नसरापूर अत्याचार प्रकरणात पोलीस तपासातून धक्कादायक माहिती समोर
नसरापूर अत्याचार प्रकरणात पोलीस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या गोठ्यात आरोपीने चिमुकलीवर अत्याचार केला त्याच गोठ्यात तो चार ते सहा दिवस राहिला होता. तेथे जवळच विटा उचलण्याचं काम मिळाल्यामुळे भीमराव कांबळेने त्या गोठ्यात स्वतःचे कपडे आणि साहित्य ठेवलं होतं. तीन दिवस त्या ठिकाणी भीमराव कांबळे विटा उचलण्याचं काम करत होता त्याच ठिकाणी ती चिमुकली खेळत होती. भीमराव कांबळेची त्या चिमुकलीवर अगोदर पासूनच नजर होती अशीही माहिती समोर आली आहे.
-
उदय सामंत यांच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये शिंदेच्या सेनेच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक
नाशिक – उद्योगमंत्री तथा नाशिक संपर्कमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक होणार आहे . नाशिक जिल्ह्याच्या शिंदेच्या शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीचा उदय सामंत आढावा घेणार आहेत. – नाशिक लोकसभा सह दिंडोरी लोकसभेच्या पदाधिकारी यांच्याकडून आढावा घेतील.
-
जळगावच्या कासोदा येथील दोन तरुणांचा सातारा जिल्ह्यातील पाडेगावात कालव्यात बुडून मृत्यू
जळगावच्या कासोदा येथील दोन तरुणांचा सातारा जिल्ह्यातील पाडेगावात कालव्यात बुडून मृत्यू झाला. सादीक खान मैमिल खान असे मयत 22 वर्षीय व तर मझहर फकरोद्दीन शेख असे मयत 20 वर्षीय तरुणाचे नाव आहे. दोघेही तरुण चादरी विक्री करण्यासाठी सातारा जिल्ह्यात गेले असताना दुर्दैवी घटना घडली. दोघांपैकी एकाचा मृतदेह सापडला असून त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
-
जळगावच्या तापमानात गेल्या 24 तासांत दोन ते अडीच अंशांनी घट
जळगावच्या तापमानात गेल्या 24 तासांत दोन ते अडीच अंशांनी घट झाली आहे. सतत 42.6 अंशावर असलेला पारा आता 40.4 अंशावर घसरला आहे. तापमानात काहीशी घट झाल्याने वातावरणातला उकाडादेखील कमी झाला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु पुढील तीन ते चार दिवसांत तापमान पुन्हा 44 अंशावर जाणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
-
ममता बॅनर्जी यांनी राजीनामा दिला काय, नाही दिला काय, फरक पडत नाही- नवनाथ बन
“भाजपचा विजय झाल्यावर राऊत असं म्हणाले की दिवा विझताना मोठा होतो, मग राऊत तुम्ही शेवटचे फडफडणारे दिवे आहात. अस्तित्व संपवायचं ,मशाल विझवायची आणि मगच दिवा विझणार हे सुपारी घेऊन राऊतांनी सांगितलं आहे. सूर्य अस्ताला जात नसतो, भाजप लोकांची सेवा करते, जनतेचे आशीर्वाद आहे तोपर्यंत आमचा पराभव होणार नाही. मात्र, तुम्ही काय उबाठाचा शेवटचा दिवा विझवून शांत होणार आहात. ममता यांनी राजीनामा दिला काय किंवा नाही त्याला काही फरक पडत नाही. जनमताचा सन्मान राखणं कधीच त्यांनी केलं नाही,” अशा शब्दांत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी टीका केली.
-
नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरावर आज धर्मध्वज फडकणार
नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरावर आज धर्मध्वज फडकणार आहे. 150 वर्षांनंतर ऐतिहासिक ध्वज पुन्हा फडकणार असून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर धर्मध्वज उभारणी करण्यात आली आहे. पारंपरिक विधींनंतर ध्वज स्तंभ स्थापना सोहळा संपन्न होणार आहे. अयोध्या मंदिरानंतर नाशिकच्या काळाराम मंदिरावर देखील धर्मध्वज फडकणार आहे. देशाची माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजय राठकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या सोहळा संपन्न होणार आहे.
-
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात 2 हजार 200 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 5 हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 54 हजार 500 रुपयांवर पोहोचलं असून चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 56 हजार 470 रुपये इतके आहे. गेल्या महिनाभरात सोन्या आणि चांदीच्या दरात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.
-
पंढरपुरात राधा पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ; अर्ध्यातच करावा लागला बंद
पंढरपूर तालुक्यातील सुस्ते गावात नृत्यांगना राधा पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु हा कार्यक्रम सुरू असतानाच तुफान राडा झाला. कार्यक्रम बघायला आलेल्या प्रेक्षकांमध्ये हाणामारी झाली. यल्लमा देवी यात्रेच्या निमित्ताने राधा पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु डान्स पाहण्यासाठी आलेल्या तरुणांनी हुल्लडबाजी केल्यानंतर राधा पाटीलचा कार्यक्रम अर्ध्यातच बंद करण्यात आला.
-
महिला अत्याचारांच्या घटनांवर गंभीर चिंता व्यक्त करत वर्षा गायकवाड यांचं राज्यपालांना पत्र
काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी राज्यातील वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनांवर गंभीर चिंता व्यक्त करत राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी राज्यपालांना तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. नसरापूरसारख्या धक्कादायक घटनांनंतर सरकारने कठोर पावले उचलावीत, ‘शक्ती’ कायदा तात्काळ लागू करावा आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा देऊन त्यांच्यात भीती निर्माण करावी, असं त्यांनी पत्रात म्हटलंय. महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राज्य म्हणून ओळखलं जात होतं, मात्र अलीकडील घटनांमुळे ही प्रतिमा धुळीस मिळत असल्याचं गायकवाड यांनी नमूद केलंय.
-
हुंड्यासाठी छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; राहाता तालुक्यातील एकरुखे येथील धक्कादायक घटना
राहाता तालुक्यातील एकरुखे येथे हुंड्यासाठी होणाऱ्या जाचाला कंटाळून २३ वर्षीय प्रिया शुभम ढगे या विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. घराच्या बांधकामासाठी माहेरून ४ लाख रुपये आणण्यासाठी पती, सासू आणि सासऱ्याकडून सतत शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. या छळाला कंटाळून अखेर तिने टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी राहाता पोलिसांनी पती शुभम ढगे, सासरा राजेंद्र ढगे आणि सासू प्रतिभा ढगे यांच्यावर गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली आहे.
-
जळगावात उन्हाचा तडाखा; गुलाबासह फुलांची शेती होरपळली, उत्पादनात मोठी घट
जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा ४४ अंशांवर पोहोचल्याने फुलांच्या शेतीला मोठा फटका बसला आहे. वाढत्या उन्हामुळे गुलाबाची झाडे आणि फुले झाडावरच वाळत असून, कळ्या उमलण्यापूर्वीच करपून जात आहेत. मुबलक पाणी असूनही फुलांची वाढ खुंटल्याने उत्पादनात ७० ते ८० टक्क्यांची घट झाली आहे. ज्या शेतात दररोज दीड हजार फुले निघत होती, तिथे आता केवळ २०० ते २५० फुले मिळत आहेत. लग्नविधींमुळे फुलांना मोठी मागणी आणि चांगला भाव असतानाच उत्पादन घटल्याने फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
-
जॅकवेल गळतीमुळे संभाजीनगरचा पाणीपुरवठा पुन्हा रखडला, नवीन योजना लांबणीवर
छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला पुन्हा एकदा गळती आणि तांत्रिक त्रुटींचा फटका बसला आहे. जायकवाडी येथील जॅकवेल गेटमधील गळती आणि अप्रोच ब्रिजला गेलेले तडे यामुळे मे महिन्यात सुरू होणारे पाणी आता थेट जूनपर्यंत लांबण्याची शक्यता आहे. न्यायालयीन समितीने अडीच महिन्यांपूर्वीच दुरुस्तीचे आदेश देऊनही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि संबंधित कंत्राटदार कंपनीकडून काम पूर्ण न झाल्याने शहराचा पाणीप्रश्न अधिक गंभीर झाला आहे.
-
पळशी शिवारात शेततळ्यात पडून ६ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
छत्रपती संभाजीनगर जवळील पळशी शिवार परिसरात शेततळ्यात पडून एका सहा वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. तनुजा रवी राठोड असे या मृत मुलीचे नाव असून, काल सायंकाळी खेळता खेळता ती पाण्यात पडली. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून तिला बाहेर काढले, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याची भीषण टंचाई, तरुणांची लग्न रखडली
छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील आडुळ तांडा येथे पाणीटंचाईने रौद्र रूप धारण केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे जीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. अनेक वर्षांपासून पाठपुरावा करूनही पाण्याचा प्रश्न सुटत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या टंचाईचा फटका आता तरुणांच्या विवाहावरही होत आहे. गावात पाणी नसल्याने अनेक तरुणांची लग्नं रखडली आहेत. गावाबाहेर असलेल्या एका विहिरीवर पाणी भरण्यासाठी महिला आणि शाळकरी मुलींची दिवसभर मोठी गर्दी होत आहे. विहिरीतील दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. राजकीय नेते केवळ मतदानापुरतेच येतात, मात्र आमची तहान भागवण्यास कुणीही तयार नाही, अशी संतप्त भावना येथील महिलांनी व्यक्त केली आहे.
-
कल्याणच्या आधारवाडी कारागृहात कैद्याचा संशयास्पद मृत्यू; नातेवाईकांचा संताप
कल्याणच्या आधारवाडी कारागृहातील एका कैद्याचा गुरुवारी संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. संध्याकाळी ५ वाजता छातीत दुखू लागल्यानंतरही रात्री ९ वाजेपर्यंत कोणताही उपचार मिळाला नाही, असा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच, वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने कैद्याला जेल अधीक्षकांच्या गाडीतून रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
-
पराभव झाला नाही, आम्ही ममता दीदींच्या मताशी सहमत आहोत – संजय राऊत
ममता बॅनर्जी जिंकलेल्याच आहेत. त्यांना सत्तेत येण्यापासून रोखलं, ममता दीदी राजीनामा देणार नाही, हा त्यांच्या आंदोलनाचा भाग आहे. पराभव झाला नाही, आम्ही ममता दीदींच्या मताशी सहमत आहोत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली
-
देहूरोड येथे बिबट्याचा मुक्त संचार, सर्च ऑपरेशन सुरु
शहरातील देहूरोड येथील अम्युनिशन फॅक्टरी, दुर्गा देवी टेकडी, रावेत आणि म्हस्के वस्ती या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने तातडीने सर्च ऑपरेशन हाती घेतले आहे.
-
शायना एनसी यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट
शिवसेना शिंदे यांच्या पक्षाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट. विधान परिषदेवर उमेदवारी न मिळाल्यामुळे शायना एनसी पक्षावर नाराज असल्याची होती चर्चा. आता शायना एनसी यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर त्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत का अशी चर्चा सुरू.
-
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर शिंदे सेनेच्या संपर्कात
ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख तथा कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर शिंदे सेनेच्या संपर्कात. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत कणकवली पॅटर्न ठरला होता राज्यात चर्चेचा विषय. कणकवली पॅटर्नच्या माध्यमातून नगराध्यक्ष म्हणून संदेश पारकर यांची झाली होती निवड.
-
आगीत सात ते आठ दुकानांसह दोन चारचाकी वाहनं जळून खाक
जालन्यात स्क्रॅपच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. जालना शहरातील खरपुडी रोडवरील स्क्रॅपच्या दुकानाला मध्यरात्री अचानक आग लागली.आगीच कारण अद्याप अस्पष्ट आहे.या आगीमध्ये जवळपास सात ते आठ दुकानांसह दोन चारचाकी वाहने जळून खाक झाल्याची माहिती आहे.
-
छत्रपती संभाजीनगर – पहाटे ४ वाजता गाडीला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही
छत्रपती संभाजीनगर शहरातील देवगिरी हिल्स परिसरात पहाटे चार वाजताच्या सुमारास एका वाहनाला अचानक आग लागल्याची घटना घडली. पंडित नेहरू महाविद्यालयाच्या मागील बाजूस उभ्या असलेल्या गाडीला अचानक आगा लागील. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही वा कणीही जखमीही झालेलं नाही. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ धाव घेऊन आग विझवली.
-
सिंहगडावर पर्यटक दरीत घसरून पडला, रेस्क्यू टीमकडून सुखरूप बचाव
सिंहगड किल्ल्यावर एका पर्यटकाचा पाय घसरून तो सुमारे 70 फूट खोल दरीत पडल्याची घटना काल घडली. योगेश मोहन शितोळे असे जखमी पर्यटकाचे नाव आहे. मात्र हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीम व हवेली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने सुमारे 150 फूट खोल दरीत अडकलेल्या शितोळे यांना सुरक्षित बाहेर काढले. रेस्क्यू टीमने रात्रीच बचाव कार्य राबवून तरुणाचे प्राण वाचवले.
-
जळगाव – एटीएमची अदलाबदल करून 90 हजारांची फसवणूक
जळगावात एटीएमची अदलाबदल करून एकाची ९० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. जळगावातील पांडे चौकातील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये हा प्रकार घडला . मदतीचा बहाणा करून एका भामट्याने अत्यंत चलाखीने एटीएम कार्ड बदलून फसवणूक केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-
बीड- पाण्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण ; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
बीड- वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथे शेतातील पाण्याच्या कारणावरून पार्वती तोगे या महिलेला भावकीतीलच लोकांनी लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी चौघांविरुद्ध डवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
-
पंजाबमध्ये 3 तासांत 2 स्फोट, अमृतसर-जालंधर हादरलं
पंजाबमधील अमृतसर आणि जालंधर येथे काल रात्री उशिरा झालेल्या दोन मोठ्या स्फोटांमुळे घबराट पसरली आहे. अमृतसरमधील खासा लष्करी छावणीबाहेर आणि जालंधरमधील बीएसएफ मुख्यालयाबाहेर हे संशयास्पद स्फोट झाले. तपासाअंती, यामध्ये आयईडी (IED) या स्फोटक उपकरणाचा वापर झाल्याचे सूचित होत आहे. पोलिसांनी दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू केला असून, हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
-
नाशिकमध्ये आज ‘कुंभउद्योग संगम’ आणि जिल्हा गुंतवणूक समिटचा भव्य शुभारंभ
नाशिकमध्ये आज ‘कुंभउद्योग संगम’ आणि जिल्हा गुंतवणूक समिटचा भव्य शुभारंभ होणार आहे. उद्योग समिटमधून 15 ते 20 हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार होण्याची शक्यता आहे. – आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या औद्योगिक आणि पायाभूत विकासाला मोठी चालना मिळणार. हॉटेल गेट वे येथे मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या होणार.
Published On - May 06,2026 8:11 AM
