Maharashtra News LIVE : राष्ट्रीय महिला आयोग पथकाचं दीड तास टीसीएस कंपनी चौकशी
Maharashtra News LIVE Updates : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबादेवी मंदिरात आंबा महोत्सव साजरा होत आहे. मात्र, यंदा सोन्याचे दर १.५७ लाखांच्या पार गेल्याने खरेदी महागली आहे. विदर्भात उष्णतेची लाट असून समृद्धी महामार्गावर अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे.

आज राज्यासह देशभरात अक्षय्य तृतीयेचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईच्या श्री मुंबादेवी मंदिरात विविध जातींच्या आंब्यांनी सजावट करून आंबा महोत्सव साजरा केला जात असून दर्शनासाठी भाविकांच्या लांब रांगा लागल्या आहेत. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या दिवशी सोने-चांदी खरेदीची मोठी परंपरा आहे. मात्र यंदा सोन्याचे दर (GST सह) 1,57,000 रुपयांवर तर चांदी 2,67,000 रुपयांवर पोहोचल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे. तर दुसरीकडे, विदर्भात उन्हाने रौद्र रूप धारण केले असून वर्ध्याचा पारा 45 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. तसेच समृद्धी महामार्गावर रील्स बनवण्याच्या नादात खासगी बसचा भीषण अपघात होऊन एका चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर २०-२५ प्रवासी जखमी झाले आहेत. मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे. तसेच आज नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. यासह महाराष्ट्र, देश-विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
LIVE NEWS & UPDATES
-
परभणी-वसमत राज्य महामार्गावर दोन कारची समोरासमोर धडक
परभणी वसमत राज्य महामार्गावर झिरो फाटा परिसरात दोन कारची समोरासमोर धडक झाली आहे. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही कारचा समोरून चुराडा झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या दोन जनांची परिस्थिती चिंताजनक असून इतर काही जण गंभीर जखमी असून सर्व जखमींना परभणीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे.
-
बीड – मोबाईल शॉपीवर डल्ला; 15 लाखांचे ब्रँडेड मोबाईल लंपास.
बीडमधील सुभाष रोडवरील एका मोबाईल शॉपीमधून चोरट्याने अक्षय तृतीयेसाठी आणलेला 10 ते 15 लाखांचा ब्रँडेड मोबाईलचा साठा चोरून नेला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी चोरट्याने चालू मोबाईल संभाजीनगरकडे जाणाऱ्या टेम्पोमध्ये फेकून दिला. याप्रकरणी बीड शहर पोलिसांकडून चोरट्याचा कसून शोध सुरू आहे.
-
-
सोलापूर : अक्कलकोट मध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस
अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव, हन्नूर, दर्शनाळ आदी गावांना पावसाने झोडपले आहे. अवकाळी पावसामुळे काढून ठेवलेल्या शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. अक्कलकोट तालुक्यातील दर्शनाळ येथील अर्जुन गाडेकर या शेतकऱ्याच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने गहू, ज्वारी, कांदा पिके भिजून गेली आहे.
-
महिला विधेयकाबाबतचा परवाचा दिवस हा खरोखरच काळा दिवस होता- उदय सामंत
“महिला विधेयकाबाबतचा परवाचा दिवस हा खरोखरच काळा दिवस होता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला भगिनींसाठी जो कायदा समोर ठेवला होता, त्यातून देशातील महिला खासदार आणि आमदारांना फायदा मिळवायची भूमिका होती. विरोधात मतदान करून महिलांना राजकीय आरक्षण देऊ नये अशी भूमिका घेतली गेली. एकनाथ शिंदेंनी सर्वात आधी महिला विधेयक पाठिंबा दिला होता,” अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.
-
भेंडवळची घटमांडणी आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर त्यांच्या वंशजानी संपन्न केली
सुमारे 370 वर्षांपूर्वी जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील तपस्वी चंद्रभान महाराजांनी सुरू केलेली भेंडवळची घटमांडणी आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर त्यांच्या वंशजानी संपन्न केली आहे. या घटमांडणीतून येणाऱ्या निष्कर्षांचा अंदाज उद्या सकाळी सूर्योदयावेळी जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे आजपासूनच भेंडवळ गावात शेतकऱ्यांची मोठी मांदियाळी बघायला मिळत आहे.
-
-
दीड तासानंतर राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक टीसीएस कंपनीतून बाहेर पडलं
नाशिक – तब्बल दीड तासानंतर राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक टीसीएस कंपनीतून बाहेर पडलं. TCS कंपनीत पथकाने जवळपास दीड तास चौकशी केली. याच कंपनीत महिलांचं लैंगिक शोषण करत मानसिक त्रास देऊन त्यांच्या धर्मांतराचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेत नाशिकमध्ये धाव घेतली.
-
मराठा समाजाकडून पुण्यात आंदोलन
मराठा समाजाकडून पुण्यात आंदोलन करण्यात आलं. एनसीइआरटीच्या अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील गुड लक चौकात आंदोलन करण्यात आलं. NCERT मधून अभ्यासमधून नकाशा गायब केला असल्याचा आरोप आहे. कोणाच्या दबावातून हे केले असेल तर त्याचा निषेध करतोय, असं आंदोलन म्हणाले.
-
वर्ध्याचे तापमान ४५ अंश सेल्सिअस वर
वर्ध्याचे तापमान ४५ अंश सेल्सिअस वर पोहोचलं आहे. सलग दुसऱ्या दिवशी ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सहा ते सात दिवसांपासून उष्णतेच्या झळा कायम आहेत. शनिवार पाठोपाठ रविवारीही ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या तापमानाने नागरिक हैराण आहेत.
-
सांगली – जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह तुरळक गारासह पावसाच्या सरी
सांगली जिल्ह्यात आज सायंकाळ साडे चारच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. आणि वादळी वाऱ्यासह तुरळक गारासह पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे हवे मध्ये गारवा निर्माण झाला आहे. तर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सांगली आणि मिरज शहरासह मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
-
भोंदू राजेंद्र गडगेला पोलीसांनी आणले दरबारात
भोंदू राजेंद्र गडगेला पोलीसांनी आणले दरबारात…एक तासापासून पोलीसांसह आरोग्य पथक भोंदूच्या दरबारात… वडगावपान येथील दत्तधाम दरबारात स्पाॅट पंचनामा सुरू…गडगेला मिळालीय पाच दिवसांची पोलीस कोठडी.. दाखल गुन्ह्या संदर्भात पोलीसांचा तपास सुरू… दरबारातील विविध औषधांचे नमुनेही घेतले ताब्यात.. वडगावपान येथील भोंदू राजेंद्र गडगेची कसून पोलीस चौकशी सुरु
-
राष्ट्रीय महिला आयोगाचा पथक टीसीएस कंपनीत दाखल
राष्ट्रीय महिला आयोगाचा पथक टीसीएस कंपनीत दाखल. याच कंपनीत महिलांचे लैंगिक शोषण करत मानसिक त्रास देऊन त्यांचा धर्मांतराचा झाला होता प्रयत्न. या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेत नाशिकमध्ये घेतली धाव. चार सदस्य समितीने काल नाशिक मध्ये दाखल होत घेतली होती प्रकरणाची माहिती. त्यानंतर आज टीसीएस कंपनीत महिला आयोगाचे पथक दाखल. घटनास्थळावर भेट देत तपास सुरू
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याण डोंबिवलीमध्ये दाखल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याण डोंबिवलीमध्ये दाखल झाले आहेत. रायगड येथील कार्यक्रम संपल्यानंतर हेलिकॉप्टरचा प्रवास करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे डोंबिवलीतील पलावा परिसरात आले आहेत. थोड्याच वेळात कल्याणच्या फडके मैदानात आयोजित CREDAI-MCHI प्रॉपर्टी प्रदर्शनात शिंदे सहभागी होणार आहेत.
-
नागपूरात सिलिंडर स्फोटाने एकाचा मृत्यू
नागपूर जिल्ह्यातील कामठीतील गांधीनगर भाजी मंडीत सिलींडर स्फोटाने घराला आग लागून एकाचा मृत्यू झाला असून चार ते पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अतुल उर्फ बंटी पानतावणे ( 40 वर्षीय ) यांचा बेडरुममध्ये गुदमरुन मृत्यू झाला. रविवारी सकाळी गॅस गळतीमुळे आधी घराला आग लागली त्यानंतर अचानक सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला. आग स्वयंपाकघरातून संपूर्ण घरात पसरली, पत्नी आणि मुले वेळेत बाहेर पडल्याने बचावली.
-
राळेगाव कळंब वणी भागात बालविवाहाचा गुन्हा दाखल
राळेगाव कळंब वणी या भागात काल अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्याचे उघडकीस आल्याने आपण बाल संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. मुलगी ही 15 वर्षाची असल्याचे उघडकीस आले आहे.
-
काँग्रेसने हिरवे विषारी साप पाळून ठेवलेत- नवनीत राणा
हे सगळे चिल्लर लोक आहेत यांच्यावर बोलण्याची मला गरज नाही. काँग्रेसने हिरवे विषारी साप पाळून ठेवले आहे म्हणून ते वळवळ करत आहे. हे सगळे प्रकार आता बाहेर येत आहे. काँग्रेसच्या काळात या हिरव्या सापांना जपण्याचं काम काँग्रेसने केलं आणि हे प्रकरण दाबण्याचे काम काँग्रेसने केलं असे म्हणत नवनीत राणांचा विजय वडेटीवारांना अप्रत्यक्ष टोला.
-
अक्षय तृतीयेनिमित्त साईबाबा मंदिरात मोठी गर्दी
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेनिमित्त साईबाबा मंदिर येथे साईभक्तांची मोठी गर्दी झाली आहे. सलग सुट्ट्या आणि सणाचा योग साधत सकाळपासूनच दर्शनासाठी मांदीयाळी. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून साईबाबा संस्थानची विशेष तयारी करण्यात आली आहे.
-
एक फोन आला अन् २२ वर्षीय तरुणाने गोळी झाडून केली आत्महत्या
भडगाव शहरातील खुशाल आप्पा नगरातील धक्कादायक घटना समोर आली आहे. एक फोन आला अन् २२ वर्षीय तरुणाने गोळी झाडून आत्महत्या केली. स्वप्निल प्रवीण शिंपी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. घटनास्थळावरून भडगाव पोलिसांनी गावठी पिस्तूल आणि स्वप्निलचा फोन जप्त केला आहे
-
भोंदू अशोक खरातला पुन्हा पाच दिवसांची पोलिस कोठडी
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. आता खरातला पुन्हा पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 23 एप्रिल पर्यंत अशोक खरातला पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे.
-
छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात निषेध आंदोलन
महिला आरक्षण विधेयक अर्थात नारी शक्ती कायदा विरोध करून राहुल गांधी यांनी महिलांचा अपमान केला असल्याने, राहुल गांधी यांच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर मधील क्रांती चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली, महिला आरक्षण कायदा झाला पाहिजे असे शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र यांनी म्हटले तर या विधेयकाला विरोध करणाऱ्या राहुल गांधी यांचा निषेध महिला आघाडीच्या तेजस्विनी केंद्रे यांनी केला.
-
पाण्याअभावी मोसंबीच्या फळबागा सुकल्या,फळबाग उत्पादक शेतकरी चिंतेत
दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता अधिकच वाढत चालली असल्याने जालना जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशावर जाऊन पोहोचलाय त्यामुळे जिल्ह्यातील लघु मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी झपाट्याने खाली होत असल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच आता फळबाग उत्पादक शेतकरी देखील संकटात सापडले.जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील मालेवाडी परिसरात पाण्याअभावी एका शेतकऱ्याची मोसंबीची बाग पूर्णतः सुकली असल्याच चित्र पाहायला मिळालं, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांकडून अतोकाट प्रयत्न सुरू असून तशी धडपड ही सुरू आहे,बोअरवेल आणि तलावांनी आधीच तळ गाठला आहे.परिणामी फळबागांना वेळेवर पाणी देता येत नसल्याने झाडांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी झाडे वाळू लागली आहेत.काही शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चाने तयार केलेल्या मोसंबीच्या बागा आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
-
आखाजी निमित्त आमरस-पूरणपोळीची परंपरा
साडेतीन मुहूर्तांपैकी अत्यंत महत्त्वाचा खान्देशातील आखाजी निमित्त आमरस-पूरणपोळीची परंपरा जपली जात आहे. नंदुरबार शहरात आमरस खरेदीसाठी दुकानांवर नागरिकांची गर्दी उसळली. बदलत्या काळामुळे तयार आमरसाला वाढती पसंती मिळत आहे. आंब्याचे दर वाढल्याने आमरसही महागला आहे.आंब्यांना सुमारे २०० रुपये किलो दर आहे. सणानिमित्त बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे.
-
नराधम सावत्र बापाने चक्क 16 वर्षीय मुलीचा केला विनयभंग
पीडिता आपल्या आई वडिलांसोबत घरात झोपली असताना सावत्र वडिलांनी तिचा विनयभंग केला. पीडिता घाबरून घराबाहेर पडली. नागपूर रेल्वे स्टेशनवर संशयास्पद फिरत असताना आढळली, त्यावेळी हा संपूर्ण प्रकार पीडितेने रेल्वे पोलिसांना सांगितला. नागपूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून अमरावती जिल्ह्यातील दत्तापूर पोलिसांकडे तपास वर्ग केला.
-
खरातला व्हिसी द्वारे थोड्याच वेळात न्यायालयात हजर करणार
भोंदू अशोक खरात याला व्हिसी द्वारे थोड्याच वेळात न्यायालयात हजर करणार. काल अशोक खरात याला चौथ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाली होती. आज पाचव्या गुन्ह्यात अशोक खरात याला न्यायालयात हजर केले जाईल. पाचवा गुन्हा देखील महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या संदर्भात आहे. पाचव्या गुन्ह्यात खरातला पोलिस कोठडी मिळण्यासाठी तपास यंत्रणांकडून युक्तिवाद जाणार केला.
-
मेगा ब्लॉकचा फटका; कोपर-ठाकुर्लीत प्रवाशांचा जीवघेणा प्रवास
मेगा ब्लॉकचा फटका बसला. कोपर-ठाकुर्लीत प्रवाशांचा जीवघेणा प्रवास करताना दिसला. ट्रॅकवरून जीव धोक्यात टाकत मार्ग काढताना धक्कादायक चित्र दिसून आले. मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे ठाणे रेल्वे स्थानक ते डोंबिवली रेल्वे स्थानक दरम्यान लोकल सेवा विस्कळीत झाली. प्लॅटफॉर्म विस्तारासाठी १० तासांचा ब्लॉक आहे. अनेक धीम्या गाड्या जलद मार्गावर वळवल्या. कोपर रेल्वे स्थानक आणि ठाकुर्ली रेल्वे स्थानक येथे गाड्यांना थांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवासी थेट रेल्वे ट्रॅकवर उतरून जीव धोक्यात टाकत मार्ग काढताना दिसले.
-
पाच मोबाईल पैकी तीन मोबाईलचा डेटा रिकव्हर
अमरावतीच्या परतवाडा शहरातील तरुणीचं लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपीकडून जप्त करून फॉरेनची लॅब पाठवलेल्या पाच मोबाईल पैकी तीन मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्यात पोलिसांना यश मिळाले. या मोबाईल डाटा मधून अनेक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. आरोपींनी पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने मोबाईल मधील अनेक आक्षेपार्य व्हिडिओ आणि फोटोग्राफ डिलीट केल्याचे समोर आले होते मात्र तीन मोबाईल मधला डाटा रिकव्हर करण्यात आला आहे. पोलिसांकडून आता आरोपींची आर्थिक व्यवहाराची तपासणी केली जाणार आहे.
-
बीड न्यायालय परिसरात महिलेला पतीकडून मारहाण
बीड न्यायालयात केसच्या तारखेसाठी आलेल्या 22 वर्षीय विवाहितेवर पतीने दोन साथीदारांसह हल्ला केला. केस मागे घेण्याच्या कारणावरून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी पती सलमान शेखसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
-
नवनीत राणा ही पोसलेले विषवल्ली आहे- विजय वडेट्टीवार
नवनीत राणा ही पोसलेले विषवल्ली आहे , जातीवाद वाढविण्यासाठी तीला पोसलेले आहे. खरात बद्दल न बोलणारी बाई मुस्लिम तरुण हा आरोपी पुढे आल्या बरोबर ती बोलायला लागली. भाजप पुरस्कृत भोंदू बाबा तयात होत आहे. नवनीत राणा वर दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या वक्तव्या वरून गुन्हे दाखल झाली पाहिजे , अनिल बोंडे वर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे
-
शेतकऱ्यांनी स्वखर्चाने खरडून गेलेल्या जमिनी केल्या दुरुस्त
धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे फुटलेल्या साठवण तलावाची दुरूस्ती सात महीन्यानंतर ही रखडलेलीच तर जमीन खरडून गेलेले शेतकरी देखील मदतीच्या प्रतिक्षेत. शेतकऱ्यांनी स्वखर्चाने खरडून गेलेल्या जमिनी केल्या दुरुस्त. सप्टेंबर महिन्यात भुम परंडा भागात झाली होती अतिवृष्टी,सरकारने मोठ पॅकेज जाहीर केल माञ शेतकरी अद्याप ही मदतीपासून वंचित
-
उन्हापासून बचावासाठी रेल्वे कडून शेड ची उभारणी
रेल्वे प्रवाश्यांची भर उन्हाळ्यात गरसोय होऊ नये यामुळे रेल्वे प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे..कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रवासांसाठी स्थानकाच्या बाहेर भले मोठे शेड उभारण्यात आलेले आहे. भर उन्हाळ्यात लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडीने प्रवास करणाऱ्या नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये यामुळे रेल्वे प्रशासनाने कुर्ला एलटीटीच्या बाहेर शेड उभारण्यात आलेले आहे यामध्ये लाईटची व्यवस्था करून पंखे देखील लावण्यात आलेले आहेत तसेच नागरिकांची गर्दी होऊ नये यामुळे बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे.
-
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने चांदी खरेदीसाठी नागरिकांचा कल
साडेतीन मुहूर्तापैकी एक समजला जाणारा अक्षय तृतीयाचा आज सण असून अक्षय तृतीयेच्या दिवशी मुहूर्तावर सोने चांदी खरेदीसाठी नागरिकांचा कल असतो. आज सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 57 हजार रुपये तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 67 हजार रूपये आहेत. यंदाच्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने चांदी खरेदी करताना ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहे
-
अक्षय तृतीयेचा उत्साह, मुंबादेवी चरणी आंब्यांचा महानैवेद्य
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मुंबईची ग्रामदेवता श्री मुंबादेवी मंदिरामध्ये ‘आंबा महोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या महोत्सवानिमित्त संपूर्ण मंदिर परिसर हापूस, केसर आणि बदामी अशा विविध जातींच्या आंब्यांनी आकर्षकरीत्या सजवण्यात आला आहे. पहाटेपासूनच पारंपरिक पूजेने या उत्सवाला सुरुवात झाली असून, देवीला विविध प्रकारच्या आंब्यांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला आहे. लाडक्या देवतेचे हे नयनरम्य रूप डोळ्यांत साठवण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात लांबच लांब रांगा लावल्या असून, संपूर्ण परिसरात भक्तीचा आणि मांगल्याचा दरवळ पसरला आहे.
-
विदर्भातील सात जिल्ह्यांमध्ये तापमान ४३ अंशांच्या पुढे; वर्ध्यात हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद
विदर्भात एप्रिल महिन्यातच उन्हाळ्याने अत्यंत रौद्र रूप धारण केले असून संपूर्ण परिसर उष्णतेच्या लाटेने होरपळून निघाला आहे. वर्धा येथे आज ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हे राज्यातील या महिन्यातील सर्वाधिक तापमान ठरले आहे. नागपूर आणि अमरावतीमध्येही पाऱ्याने ४४ अंश तापमान ओलांडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या भीषण उकाड्यामुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत असून अत्यावश्यक कामांशिवाय रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. अकोला, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांतही तापमान ४३ अंशांच्या वर गेल्याने संपूर्ण विदर्भात आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
-
भोंदू अशोक खरातच्या कोठडीतील मुक्काम वाढणार? आज पुन्हा कोर्टात हजर करणार
नाशिकमधील बहुचर्चित भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत वाढ होत असून, आज त्याला पाचव्या गुन्ह्याप्रकरणी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. सुरक्षा कारणास्तव ही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC) द्वारे पार पडणार आहे. महिलांच्या लैंगिक शोषणाच्या चौथ्या गुन्ह्यात न्यायालयाने खरातला कालच ३० एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. मात्र, एसआयटीने (SIT) आता पाचव्या गुन्ह्यात तपास करण्यासाठी खरातच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. भोंदूगिरी, लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचे एकामागून एक गुन्हे समोर येत असल्याने खरातचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-
समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; चालकाला रिल्स बनवण्याचा मोह नडला, दीड वर्षाच्या चिमुकल्याचा अंत
समृद्धी महामार्गावर मेहकर टोलनाक्याजवळ एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण अपघात घडला आहे. मुंबईवरून पुसदकडे जाणाऱ्या एका खाजगी लक्झरी बसचा चालक आणि क्लिनर मोबाईलवर रिल्स बनवण्यात दंग असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस अनियंत्रित होऊन पलटी झाली. या दुर्दैवी घटनेत एका दीड वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला असून २० ते २५ प्रवासी जखमी झाले आहेत. ही बस पलटी होऊन बाजूच्या चारचाकी वाहनावर आदळल्याने त्या गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर जखमींना मेहकरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. अखेर जखमींना खाजगी रुग्णालयात हलवावे लागले, तर काही रुग्णांवर स्थानिक नागरिकांनीच प्राथमिक उपचार केले.
-
मुंबईची लाईफलाईन विस्कळीत, तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे प्रचंड हाल
मुंबई रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात आल्याने लोकल सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. ठाणे आणि डोंबिवली स्थानकांवरील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या कामासाठी मध्यरात्रीपासून १० तासांचा विशेष ब्लॉक सुरू करण्यात आला असून, याचा सर्वाधिक फटका मध्य रेल्वेच्या प्रवाशांना बसला आहे. कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर गाड्यांना थांबा नसल्यामुळे संतापलेले प्रवासी थेट रेल्वे ट्रॅकवर उतरून जीव धोक्यात टाकून प्रवास करताना दिसत आहेत. अंबरनाथहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्या ३० ते ३५ मिनिटे उशिराने धावत असून अनेक धीम्या गाड्या जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. ट्रॅकवर प्रवाशांची गर्दी वाढल्याने दुर्घटना टाळण्यासाठी आरपीएफ (RPF) आणि रेल्वे पोलीस तैनात करण्यात आले असून, रेल्वेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे २० एप्रिलला सातारा दौऱ्यावर, शिवसेनेचे मोठे शक्तिप्रदर्शन
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे २० एप्रिल रोजी साताऱ्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्हा परिषदेत १५ सदस्य निवडून येऊनही सत्ता स्थापन करता न आल्याने, आता मुख्यमंत्री आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या दौऱ्यात कोरेगाव मतदारसंघातील अंगापूर या तीर्थक्षेत्राला भेट देऊन २ कोटींचा निधी जाहीर करत आमदार महेश शिंदे यांना नवे संकेत देण्यात आले आहेत. तसेच, सातारा शहरात जाहीर सभा घेऊन भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करून जिल्हा परिषदेतील ‘नैतिक विजय’ साजरा करत आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेने आता साताऱ्यात शड्डू ठोकला आहे.
-
जळगावात सोन्याच्या दराचा उच्चांक; अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचा दर दीड लाख पार
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचा उत्साह आज जळगावच्या सुवर्णनगरीत पाहायला मिळत आहे. अक्षय तृतीयेला सोने-चांदीची खरेदी केल्यास घरात समृद्धी येते, या श्रद्धेपोटी भाविक आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी बाहेर पडले आहेत. मात्र, यंदा सोन्या-चांदीच्या दराने सर्वसामान्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. जळगावात आज सोन्याचे दर जीएसटीसह प्रति तोळा १ लाख ५७ हजार रुपये, तर चांदीचा दर प्रतिकिलो २ लाख ६७ हजार रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्यात ५७ हजार तर चांदीत तब्बल १ लाख ६३ हजार रुपयांची मोठी वाढ झाली आहे. रशिया-युक्रेन युद्ध आणि आंतरराष्ट्रीय धोरणांच्या परिणामामुळे ही दरवाढ झाली असली, तरी मुहूर्तावर सोने खरेदी करण्याच्या परंपरेला जळगावकरांनी पसंती दिली आहे.
-
मिरा-भाईंदर पालिकेची मोठी कारवाई, हॉटेल, गॅरेज आणि टपऱ्यांसह अनधिकृत शेड जमीनदोस्त
मिरा-भाईंदर महानगरपालिकेने प्रभाग समिती क्रमांक ६ मधील अनधिकृत बांधकामांविरोधात आक्रमक पवित्रा घेत मोठी कारवाई केली आहे. काशिमीरा ते चेक नाका या मुख्य परिसरातील आर.के. पान शॉप, लवली चायनीज आणि पाटील सर्विस सेंटरसह एकूण १५ अनधिकृत शेड, गॅरेज आणि टपऱ्यांवर पालिकेचा हातोडा फिरला. रस्ते आणि पदपथांवरील हे अतिक्रमण हटवल्यामुळे वाहतुकीसाठी रस्ते मोकळे झाले असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पालिकेच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
Published On - Apr 19,2026 9:06 AM
