Alandi Indrayani River Flood | पालखीपूर्वीच आळंदी संकटात! इंद्रायणीला महापूर; वारकऱ्यांना येऊ नका, सरकारचं मोठं आवाहन
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक असताना आळंदीमध्ये पूरस्थिती अद्यापही कायम आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत असून, अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. अनेक दुकाने अजूनही पाण्याखाली असून, नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.

पूरस्थितीमुळे वारकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे इंद्रायणी स्नान तात्पुरते बंद करण्यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) चे पथक घटनास्थळी तैनात करण्यात आले असून, संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यभरातून हजारो वारकरी पालखी सोहळ्यासाठी आळंदीत दाखल होत असले, तरी पूरस्थिती लक्षात घेता राज्य सरकार आणि संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांनी वारकऱ्यांना सध्या आळंदीत येणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
या निर्णयाबाबत काही वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असली, तरी वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत बहुतांश भाविकांनी प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच नागरिक आणि वारकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.