Amol Mitkari : राज्याच्या राजकारणात मनोमिलनाचे वारे; ताई-दादा एकत्र येणार? मिटकरींचं मोठं विधान
Amol Mitkari Statement : राज्यात ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू आहे. अशातच आमदार अमोल मिटकरी यांनी पवार कुटुंबाच्या एकत्र येण्यावर भाष्य केलं आहे.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा असतानाच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी आता मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. पांडुरंगाच्या मनात आलं तर आषाढी एकादशीपर्यंत ताई आणि दादाही एकत्र येऊ शकतात, असं मोठं विधान अमोल मिटकरी यांनी आज प्रसारमाध्यमांसमोर केलं आहे. तर पक्षाचा कोणताही निर्णय हा कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच घेतला जाईल असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हंटलं आहे.
राष्ट्रवादीचे मिटकरी यांनी एक मोठं विधान केलं आहे. पांडुरंगाची ईच्छा असेल तर बहीण-भाऊ आषाढी एकादशीपर्यंतही एकत्र येऊ शकतात, असा गौप्यस्फोटच त्यांनी केला आहे. 10 तारखेला पक्षाच्या मेळाव्यापर्यंत वाट बघा, मेळाव्यात मोठे संकेत मिळण्याचे सुतोवाच मिटकरींनी केले आहेत, असंही मिटकरी म्हणालेत. तर यावर सुळेंनी प्रतिक्रिया दिली असून, हा निर्णय माझा नाही, कोण कुठे जाणार आहे? हा पक्षाचा निर्णय आहे. पवार साहेबांचे राजकारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. पवारसाहेब लोकशाही मार्गाने निर्णय घेत आहेत. यासंदर्भात मी सगळ्यांशी चर्चा करेल, कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे ते मला कळेल अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.
