BJP News : ‘ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर..’, बॅनरबाजी करून भाजपकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न
BJP vs MNS Clashes : भाषेच्या मुद्द्यावरून भाजपकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. दादर परिसरात भाजपकडून जोरदार बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे.
भाजपने पुन्हा एकदा मनसेला डिवचणारे बॅनर लावले आहेत. भाषेच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण पेटलेलं असतानाच दादरच्या शिवसेना भवन परिसरात भाजपने बॅनरबाजी करून मनसेला डिवचलेलं बघायला मिळत आहे. ‘ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती..’ अशा आशयाचे हे बॅनर आहेत.
राज्यातल्या शाळांना पहिले ते पाचवीपर्यंत इंग्रजी बरोबर हिंदी भाषा शिकण्याची सक्ती नव्या शैक्षणिक धोरणातून करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाषेचा वाद सुरू झाला आहे. मनसेने मराठी भाषेचा मुद्दा उपस्थित करून अशी सक्ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा भाजपला दिला आहे. त्यानंतर आता आज दादरमध्ये भाजपकडून बॅनरबाजी करून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या बॅनरवर, ‘ ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती.. तोडत नाही, भाषा जोडते! साऱ्या देशांशी संवाद, महाराष्ट्र देतो साद!’ असा मजकूर या बॅनरवर लिहिलेला आहे.
