वाल्मिक कराडच सूत्रधार; कोर्टाचं निरीक्षणावर धनंजय देशमुखांची मोठी प्रतिक्रिया
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. न्यायालयाने वाल्मिक कराड याला संतोष देशमुख खंडणी प्रकरणातील मुख्य सूत्रधार ठरवले आहे. कोर्टाने नमूद केले की, वाल्मिक कराड हा संघटित गुन्हेगारी टोळीचा सक्रिय सदस्य आहे. त्याने अवदा कंपनीकडून खंडणी वसूल करण्यासाठी कट रचल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. कोर्टात वाल्मिक कराडविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचाही उल्लेख झाला, ज्यात गेल्या 10 वर्षांत त्याच्यावर आणि त्याच्या टोळीवर 20 गुन्हे, त्यापैकी सात गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.
वाल्मिक कराडविरुद्ध डिजिटल पुरावे, अनेक साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे त्याला या कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. यावर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, पोलिस, सीआयडी आणि एसआयटीने केलेल्या तपासात आणि त्याआधारे तयार केलेल्या चार्जशीटमध्ये वाल्मिक कराड हाच या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचे नमूद केले होते. आता कोर्टाच्या या निरीक्षणामुळे आम्हाला विश्वास आहे की, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होईल.
