Pak Threatens Nuclear : पोकळ धमक्यांसमोर झुकणार नाही अन्.. भारतचे पाकला खडेबोल अन् अमेरिकेला दाखवला आरसा
अमेरिकेच्या भूमीवरून पहिल्यांदाच पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीरनं भारताला अणूहल्ल्याची पोकळ धमकी दिली. त्यावर भारत सरकारने पाकिस्तानला खडेबोल सुनावताना अमेरिकेला सुद्धा आरसा दाखवलाय.
काही महिन्यापूर्वीच अद्दल घडूनही पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर पुन्हा एकदा भारताला अणुयुद्धाची धमकी देऊ लागलाय. धक्कादायक म्हणजे ही धमकी मुनीरनं पाकिस्तानातून नाही तर भारताचा मित्र देश असलेल्या अमेरिकेच्या भूमीवरून दिली आहे. अमेरिकेतल्या कार्यक्रमात मुनीरनं म्हटलंय की आम्ही न्यूक्लियर पॉवर देश आहोत. जर आम्ही बुडत असू तर अर्ध्या जगाला घेऊन बुडू. सिंधू नदीवर भारत धरण बांधेपर्यंत आम्ही वाट पाहत आहोत. जेव्हा धरण बांधून पूर्ण होईल तेव्हा आम्ही ते दहा मिसाईल्सनी नष्ट करू, अशी पोकळ धमकी ही मुनीरनं दिली आहे.
या धमकीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी करत पाकिस्तानला चोख उत्तर देताना अमेरिकेला सुद्धा आरसा दाखवलाय. अणूहल्ल्याची धमकी देणे ही पाकिस्तानची जुनी सवय आहे. अशा बेजबाबदार विधानामुळे आंतरराष्ट्रीय समुदाय पाकिस्तानबद्दलचा निष्कर्ष काढू शकतो. पाकिस्तान फक्त प्रादेशिक सुरक्षेसाठी नव्हे तर जागतिक सुरक्षेलाही धोका बनलाय. एका मित्र राष्ट्राच्या भूमीवरून अशी विधाने होणे खेदजनक आहे. अशा अणूहल्ल्याच्या धमक्या भारत सहन करणार नाही. आम्ही राष्ट्रीय सुरक्षेसाठी सर्व पाऊले उचलू, असं भारतानं म्हटलंय.
