राज्यातले बडे नेते हनीट्रॅपच्या जाळ्यामध्ये; 72 आजी-माजी नेते अडकल्याचा कोणी केला दावा
राज्यातले अनेक आजी-माजी मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा दावा एका मोठ्या नेत्याने केला आहे.
चंदन पूजाधिकरी, प्रतिनिधी
राज्यातले अनेक आजी-माजी मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मुंबईतल्या एका मोठ्या नेत्याने हा गौप्यस्फोट केलेला आहे. त्यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. नाशिकमधल्याच एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती मोठ्या नेत्याने दिली आहे.
हनी ट्रॅपच्या अनेक घटना राज्यात घडत असतानाच एका बड्या नेत्याने केलेल्या गौप्यस्फोटाने राज्यात आता खळबळ उडाली आहे. राज्यातले तब्बल 72 अधिकारी, त्याचप्रमाणे महसूल विभागाचे अधिकारी आणि राजकीय नेते या हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकलेले आहेत. नाशिक विभागातून यापूर्वी आलेली बातमी ही केवळ महसूल विभागाचा एक अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकला एवढीच होती. मात्र आता या नेत्याने केलेल्या या मोठ्या गौप्यस्फोटाने आता या हनी ट्रपमध्ये नेमके कोणते अधिकारी किंवा मंत्री अडकले आहेत, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हे प्रकरण केवळ वैयक्तिक संबंधांपुरते मर्यादित आहे की यामागे काही मोठे षडयंत्र आहे, याचाही शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
