सफाई कर्मचाऱ्यांना हक्काचं घर मिळणार! महायुतीच्या जाहीरनाम्यात काय?

| Updated on: Jan 11, 2026 | 12:55 PM

देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या मुंबई विकासाच्या धोरणांवर प्रकाश टाकला. सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरे, म्हाडा लेआउट्सचा पारदर्शक पुनर्विकास, धारावी प्रकल्पांतर्गत पात्र रहिवाशांना ३५० चौ.फूट घर व लघु उद्योगांना प्रोत्साहन, तसेच महानगरपालिकेच्या शाळांचे आधुनिकीकरण व मराठी भाषा प्रयोगशाळा स्थापन करण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या माध्यमातून मुंबईत सुरू असलेल्या आणि आगामी विकासकामांची माहिती दिली. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना मुंबईमध्ये मालकी हक्काची घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय यापूर्वी २०१ ९ मध्ये घेण्यात आला होता, परंतु उद्धव ठाकरे यांच्या सरकारने तो बदलला होता. आता महायुतीने तो पुन्हा अंमलात आणला आहे.

म्हाडा लेआउट्सच्या पुनर्विकासात पारदर्शकता आणली जाईल. यापुढे म्हाडा स्वतः विकसक म्हणून काम करेल आणि टेंडर पद्धतीने विकासक नियुक्त केले जातील, ज्यामुळे जमिनीची मालकी म्हाडाकडेच राहील. धारावी पुनर्विकास प्रकल्पात पात्र रहिवाशांना ३५० चौ.फूट घर मिळेल आणि लघु उद्योगांनाही प्रोत्साहन दिले जाईल. यासोबतच महानगरपालिकेच्या शाळांचे आधुनिकीकरण करून त्यांना कौशल्ययुक्त बनवले जाईल व मराठी भाषा प्रयोगशाळा स्थापन केल्या जातील.

Published on: Jan 11, 2026 12:54 PM