Amey khopkar Video : मराठी समालोचनावरुन हॉटस्टारच्या कार्यालयात धडकले मनसेचे नेते, नेमकं काय घडलं बघा व्हिडीओ
मराठी समालोचनाच्या मुद्यावरुन मनसेने आक्रमक भूमिका घेतली. हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांना मनसे नेते अमेय खोपकर यांनी जाब विचारला. हॉटस्टारवर मराठी समालोचन का नाही? हा जाब त्यांनी सबंधित अधिकाऱ्यांना विचारला
पुन्हा एकदा मराठी भाषेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मराठी समालोचनाच्या मुद्यावरुन मनसे नेते अमेय खोपकर आणि मनसेचे पदाधिकारी संतोष धुरी, केतन नाईक हे धडकल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मराठी समालोचनाच्या मुद्यावरुन अमेय खोपकर यांनी आक्रमक भूमिका घेत हॉटस्टारवर मराठी समालोचन का नाही? असा सवाल करत हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांना जाबच विचारला. यावेळी अमेय खोपकरानी मंत्री उदय सामंत यांना फोन लावला. हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांकडून मराठी भाषेची अमलबजावणी होईल असे लेखी पत्र घ्या, असं म्हणत उदय सामंत यांनी मनसेच्या मागणीला पाठिंबा दिला. “मराठी भाषेची कॉमेंट्री का असू नये? हे कोण ठरवणारे, बाकीच्या भाषांची असावी आणि मराठीची नसावी, बाकीच्या भाषांचा आदर आहेच. पण मराठीत कॉमेंट्री असावी हे शंभर टक्के बरोबर आहे” असं उदय सामंत यांनी सांगितलं. त्यावर ‘साहेब मी इथून पत्र घेऊन निघतो. काही असेल तर फोन करतो’ असं अमेय खोपकर म्हणाले. “तुम्हाला, आता मंत्री महोदयांनी सांगितलं, सांगा आता काय करायचं? तुम्हाला काय मदत लागेल ते सांगा, मी सर्व मदत करायला तयार आहे” असं मनसे नेते अमेय खोपकर म्हणाले. यानंतर समोरच्या अधिकाऱ्याने “मी प्रोडक्शनमध्ये नाही, पण स्टुडिओ सेटअप करायला काही दिवस लागतील” असं म्हणाला. तर मला लेखी द्या, मी निघालो” असं अमेय खोपकर म्हणाले.
