MNS Morcha : मीरा भाईंदरमध्ये मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांची धरपकड
Mira Bhayandar MNS Morcha : मीरा भाईंदर येथे होणाऱ्या मनसेच्या मोर्चाच्या पर्वशवभूमीवर आता पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
मीरा भाईंदर येथे मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धरपकड झाली आहे. आज होणाऱ्या मनसेच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. मराठी – अमराठीचा वाद राज्यात चांगलाच तापला आहे. अमराठी व्यापाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला आज मनसेकडून देखील आंदोलनाच्या माध्यमातूनच प्रत्युत्तर दिलं जाणार होतं. मात्र या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. तसंच कायदा व सुव्यवस्थेचे कारण सांगून आज पहाटे मनसे नेते अविनाश जाधव यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर संदीप देशपांडे आणि इतर पदाधिकाऱ्यांना निटोस पाठवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे मनसे नेते आता अधिकच आक्रमक झालेले आहेत. दरम्यान, काही कार्यकर्ते हे मनसेच्या नियोजित मोर्चाच्या ठिकाणी पोहोचल्याने याठिकाणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये धरपकड झाली असून कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. परप्रांतीयांच्या मोर्चाला परवानगी देता पण मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी नाकारता असा आरोप यावेळी या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.
