Raj Thackeray : बाहेरून येणारे लोंढे…राज्यात कोण येतंय- जातंय… मुंबईतील रेल्वे अपघातावरून राज ठाकरे भडकले
फक्त मेट्रो, मोनो आणि बाकीच्या ज्या काही सोयी-सुविधा करत आहेत याने प्रश्न सुटणार नाही, शहरं म्हणून याकडे कोणी बघायला तयार नाही, असे म्हणत राज ठाकरेंनी सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले.
आपल्याकडे टाऊन प्लानिंग नावाची गोष्टच नाही. आपल्याकडे बाहेरून येणारे लोंढे आहेत यामुळेच रेल्वे कोलमडली आहे. रेल्वेचा बोजवारा उडालेला आहे, ट्राफिकचा बोजवारा उडालेला आहे. लोकांना चालायला फुटपाथ नाहीत. वाहनांसाठी रस्ते नाहीत. कोण येतंय कोण जातंय तुम्हाला माहिती नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी सरकारवर संताप व्यक्त केला. पुढे राज ठाकरे असेही म्हणाले, मुंबईत मेट्रो, मोनो सर्व आहे. पण गाड्यांचे रजिस्ट्रेशन थांबलंय का? टू व्हीलर, फोर व्हिलरचे रजिस्ट्रेशन थांबलंय का, त्या गाड्या येतात आहेत. नक्की मेट्रो कोण वापरतंय, मोनो कोण वापरतंय, कोणी पाहायला तयार नाही. सर्वजण फक्त निवडणुका, प्रचार यातच गुंतले असल्याचे म्हणत राज ठाकरेंनी सरकारवर अप्रत्यक्षपणे टीका केली. इतकंच नाहीतर गेले अनेक दिवस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार याच्या जितक्या बातम्या लावल्यात, तेवढ्या तुम्ही रेल्वे अपघातात जीव गेलेल्यांच्या बातम्या लावणार आहात का? असा सवालही राज ठाकरेंनी पत्रकारांना केला.
