MNS : ‘भैय्यांना महाराष्ट्रात राहू द्यायचं की नाही याचा विचार…’, परप्रातियांचा मुद्दा पुन्हा पेटणार? मनसे नेत्याचा थेट इशारा
महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची मान्यता रद्द व्हावी, यासाठी थेट सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. यानंतर मनसेकडून विविध प्रतिक्रिया उमटताना दिसताय.
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची मान्यता रद्द करावी, यासाठी उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, उत्तर भारतीय विकास सेनेकडून घेण्यात आलेल्या या भूमिकेनंतर मनसेकडून थेट इशारा देण्यात आला आहे. ‘आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची मान्यता राहावी किंवा रद्द करावी, हे भैय्या ठरवणार का?’, असा सवाल करत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला. पुढे ते असेही म्हणाले की, मनसे पक्षाची मान्यता रद्द व्हावी, यासाठी भैय्या प्रयत्न करणार असतील तर याच भैय्यांना मुंबईत किंवा महाराष्ट्रात राहू द्यायचं की नाही याचा विचार करावा लागेल, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी परप्रांतीयांना एकप्रकारे इशाराच दिल्याचे पाहायला मिळाले. पुढे संदीप देशपांडे असेही म्हणाले की, प्रादेशिक पक्षांना संपविण्याचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष करतेय आणि आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी, यासाठी भैय्यांकडून प्रयत्न केले जात आहे. हे देखील त्यांचेच लोक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे सगळं केलं जात आहे, असा आरोपही संदीप देशपांडे यांनी केला आहे.
