Beed | पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना; शेतकरी हवालदिल
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत केवळ २५ टक्के पावसाची नोंद झाली असून, पावसाअभावी खरीप पिके संकटात सापडली आहेत.
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत केवळ २५ टक्के पावसाची नोंद झाली असून, पावसाअभावी खरीप पिके संकटात सापडली आहेत.
सुमारे पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पावसाच्या आधारावर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने खरीप पेरण्या पूर्ण केल्या. पेरणीनंतर सोयाबीनची उगवणही चांगली झाली. मात्र, त्यानंतर गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने सोयाबीनची पिके करपू लागली असून, अनेक ठिकाणी पिकांनी माना टाकल्याचे चित्र दिसून येत आहे.
शेतकऱ्यांनी पेरणीसाठी सुमारे ५० हजार रुपयांपर्यंत खर्च केला आहे. मात्र, वेळेवर पाऊस न झाल्याने हा खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक आणि मानसिक संकटात सापडला आहे.
असे असतानाही पावसाच्या आशेवर शेतकरी शेतात कोळपणीची कामे करताना दिसत आहे. मात्र, लवकरच समाधानकारक पाऊस झाला नाही तर सोयाबीनसह खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.