Chenab Bridge : हातात भारताचा झेंडा…जगातील सर्वात उंच चिनाब पुलाचं मोदींकडून उद्घाटन, पहिली वंदे भारत काश्मीरसाठी रवाना
काश्मीरपर्यंत रेल्वे कनेक्टिव्हीचं स्वप्न दशकांपूर्वीचे नाही तर ते शतकाहून अधिक जुने आहे. महाराजा हरि सिंह यांचे नातू आणि माजी सदर-ए-रियासत करण सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांनी असे म्हटले की, १३० वर्षांपूर्वी डोगरा शासकाची योजना अखेर पूर्ण झाली याचा त्यांना अभिमान आहे. हा एक प्रकल्प होता जो शतकाहून अधिक काळ अपूर्ण राहिला होता. पण आता हे स्वप्न पूर्ण झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज जम्मू -काश्मीरमधील चिनाब पुलाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा झेंडा हाती घेतल्याचे पाहायला मिळाले. यानिमित्ताने जम्मू काश्मीरच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडला गेला आणि १३० वर्षे जुने स्वप्न साकार झाले. रियासी येथील चिनाब पुलाचे उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कटरा रेल्वे स्थानकावरून श्रीनगरला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. चिनाब पुल हा जगातील सर्वात उंच पूल आहे.
चिनाब पूल हा स्टील आणि काँक्रीटपासून बनलेला एक कमानी पूल आहे. हा रियासी जिल्ह्यातील बक्कल आणि कौरी गावांना जोडतो. काश्मीरला रेल्वे कनेक्ट करण्यात या पुलाचा मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे हा पूल कुतुबमिनारपेक्षा पाच पट उंच आहे. यासोबतच, तो पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच आहे. चिनाब नदीपासून 359 मीटर उंच बनविलेला हा जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज आहे. हा पूल 1,315 मीटर भूकंप आणि जोरदार वारा सहन करण्यासाठी डिझाइन केला असल्याचे सांगितले जाते.
