PMPL News : पुणेकरांनो दहीहंडीच्या दिवशी PMP बसने प्रवास करणार आहात? तर ही बातमी तुमच्यासाठी
१६ ऑगस्टला पुण्यात दहीहंडी उत्सव साजरा होत आहे, त्यामुळे वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, पीएमपी बसच्या मार्गांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.
पुणेकरांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये दहीहंडी उत्सव शनिवारी (दि. १६) रोजी साजरा होणार आहे. यानिमित्ताने दहीहंडीच्या दिवशी पीएमपी बसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या सूचनेवरून शहराच्या मध्यवर्ती भागातून सुरू असलेल्या पीएमपी बसच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे. शनिवारवाडा ते सिंहगड या मार्गाच्या बस दहीहंडीमुळे रस्ता बंद झाल्यानंतर स्वारगेट येथून सुरू राहतील. तर, अप्पा बळवंत चौक ते सांगवी ही बस मनपा येथून सुरू राहील. तसेच, शिवाजी रोड मार्गे धावणाऱ्या बस शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे जाताना जंगली महाराज रोड, टिळक रोड मार्गे सुरू राहणार आहेत.
यासह स्वारगेटकडून सुटणाऱ्या बस बाजीराव रस्ता, टिळक रस्ता मार्गे धावणार आहेत. तसेच, पुणे स्टेशनकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या अथवा कोथरूडकडे जाणाऱ्या बस या जुना बाजार, मनपा, डेक्कन जिमखाना मार्गे धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन पीएमपीकडून करण्यात आले आहे
