Sandeep Deshpande : आमची जीभ पोळली आहे, त्यामुळे..; ठाकरे बंधूंच्या युतीवर संदीप देशपांडेंचं थेट उत्तर
Thackeray Brothers Unity News : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेल्या असताना त्यावर आता मनसे मुंबई शहराध्यक्षांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे.
जोपर्यंत प्रस्ताव येत नाही तोपर्यंत बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर दिली आहे. प्रस्ताव येईल त्यादिवशी राज ठाकरे योग्य तो निर्णय घेतील असं त्यांनी म्हंटलं आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. मात्र यावर अद्यापही कोणता निर्णय झालेला नाही. शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांकडून या युतीबद्दल आम्ही सकारात्मक आहोत असं वारंवार सांगण्यात येत असलं तरी राज ठाकरे यांच्याकडून त्यावर अद्यापही कोणती प्रतिक्रिया आलेली नाही. एकीकडे राज्यात देखील ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल उत्सुकता लागलेली असताना दुसरीकडे कार्यकर्त्यांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात येत आहे. आता ठाकरे बंधूंच्या या युतीच्या चर्चेवर मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना देशपांडे म्हणाले की, रोज मला हा आवडतो तो आवडतो, असं म्हणून चालत नाही. त्यासाठी ठोस प्रस्ताव पाठवावा लागतो. 2014 आणि 2017 ला आमची जीभ ज्या प्रकारे पोळली आहे, त्यानंतर आम्ही आता ताक सुद्धा फुंकुन पिणार आहे. जोपर्यंत प्रस्ताव येत नाही तोपर्यंत त्यावर काय बोलायच? जेव्हा प्रस्ताव येईल त्यावेळी राज ठाकरे त्यावर योग्य तो निर्णय घेतील, असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं आहे.
