Rohit Arya Case : तो मनोरुग्ण होता, तर शालेय कामं का दिली ? वडेट्टीवारांचा खडा सवाल
विजय वडेट्टीवार यांनी रोहित आर्याला शासनाने मनोरुग्ण घोषित करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जर तो मनोरुग्ण होता, तर शालेय शिक्षण विभागाने त्याला कामे का दिली? थकबाकी न मिळाल्याने मुलांच्या अपहरणानंतर सरकारवर टीका होत आहे. राज्यकर्त्यांनी लाज बाळगावी, अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी निशाणा साधला.
विजय वडेट्टीवार यांनी रोहित आर्या प्रकरणावरून राज्य सरकारवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. राज्यातील १७ निरागस मुलांना डांबून ठेवणाऱ्या रोहित आर्याला शासनाने मनोरुग्ण घोषित केले आहे. “जर हा मनोरुग्ण होता, तर त्याला शालेय संबंधी कामे का दिली? शालेय शिक्षण विभागाने त्याच्याकडून इतर कामे का करून घेतली?” असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
रोहित आर्या सातत्याने सांगत होता की, त्याला थकबाकी मिळत नाहीये. पीएलसी स्वच्छता मॉनिटर आणि माझी शाळा यांसारख्या योजनांची कामे त्याला देण्यात आली होती. या कामांसाठीची त्याची सुमारे दोन कोटी रुपयांची बिले थकवली गेल्याचा त्याचा आरोप होता, आणि याच कारणामुळे त्याने मुलांना ओलीस ठेवल्याचेही सांगितले जात आहे. मुंबई पोलिसांनी आर्याचा एन्काऊंटर केल्यानंतर 17 मुलांना पुढील धोक्यापासून वाचवले. मात्र, वडेट्टीवार यांनी यावर आक्षेप घेत म्हटले की, जर आर्या मनोरुग्ण होता, तर त्याला इतकी महत्त्वाची आणि संवेदनशील कामे का देण्यात आली? आणि त्याची बिले का थकवली गेली, ज्यामुळे ही घटना घडली.
वडेट्टीवार यांनी रोहित आर्या प्रकरणाला राज्यातील इतर गंभीर समस्यांशी जोडले आहे. ते म्हणाले की, एकीकडे शेतकरी कर्जमुक्तीसाठी आत्महत्या करत आहेत, तर दुसरीकडे कंत्राटदारांची थकीत बिले मिळत नसल्याने तेही आत्महत्या करत आहेत. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागामध्ये थकबाकी न मिळाल्याने रोहित आर्यासारख्या व्यक्तीने मुलांना ओलीस धरले, हे राज्याच्या गंभीर परिस्थितीचे निदर्शक आहे. “चाललंय काय राज्यात? या राज्यामध्ये अंधेरनगरी चौपट राजा असाच सगळा कारभार दिसतोय,” अशी टीका त्यांनी केली.
