Gulabrao Patil Video : ‘…म्हणून प्रवाशांनी एसटीची भाडेवाढ सहन करावी’, गुलाबराव पाटलांनी 15 टक्के भाडेवाढीवरून काय म्हटलं?
शनिवार मध्यरात्रीपासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून १५ टक्के भाडेवाढ जाहीर केली आहे. या भाडेवाढीवरून शिवसेना नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाष्य केले आहे.
एसटी महामंडळाने शनिवार मध्यरात्रीपासून १५ टक्के भाडेवाढ जाहीर केली आहे. मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम ६८ ( २) तरतुदी नुसार भाडेवाढ करण्याचे अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाला आहेत. त्यांच्याकडे १४.९५ टक्के इतकी वाढ करावी असा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिला होता. हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या भाडेवाढीमुळे समान्य जनतेच्या खिशाला कात्री लागली. तर दुसरीकडे सर्वसामान्य प्रवाशांमध्ये भाडेवाढीवरून नाराजी दिसतेय. अशातच शिवसेना नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाष्य करत प्रवाशांनी ST भाडेवाढ सहन करावी असं म्हटलंय. ‘आता महाराष्ट्रात ५ हजार बसेस नवीन दाखल होत आहेत. तर १० ते १५ टक्के दरवाढ प्रवाशांनी सहन करावी’, असं वक्तव्य शिवसेना नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय. पुढे ते असेही म्हणाले, जर आपल्याला सुविधा हव्या असतील, लक्झरी बसेस सोबत महाराष्ट्रातील एसटी बसला स्पर्धा करायची असेल, राज्यभरात ई बसेस आणायच्या आहेत. त्याकरता थोडासा भार सहन करावा लागेल पण सुरक्षिततेच्या दृष्टीतून प्रवाशांना या भाडेवाढीचा फायदा होऊ शकतो, असं मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलंय.
