SSC Board Exam 2025 : कॉपीमुक्त अभियानाचा पहिल्याच दिवशी फज्जा, दहावीचा पहिलाच पेपर फुटला अन्…
दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटला आहे. पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटातच प्रश्नपत्रिका बाहेर आली. त्यानंतर उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जालन्यात घडलेल्या या प्रकरणानंतर आता या प्रकरणी बोर्ड काय निर्णय घेणार?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. आज इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा पहिलाच मराठी या भाषा विषयाचा पहिला पेपर होता. मात्र दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेसाठी केलेल्या कॉपीमुक्त अभियानाचा पहिल्याच दिवशी फज्जा उघडला आहे. जालन्यात दहावीचा मराठीचा पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच प्रश्नपत्रिका लीक झाल्याचा प्रकार बदनापूर येथे पाहायला मिळाला. सकाळी 11 वाजता मराठीचा पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटातच प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आल्याने शहरातील झेरॉक्स सेंटर मधून उत्तरपत्रिकेच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, शासनाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी जय्यत तयारी केली होती मात्र कॉपीमुक्त परीक्षेचा फज्जा उडताना जालन्यात पाहायला मिळाला. तर यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथेही पहिल्याच दिवशी दहावीचा पेपर फुटला असून पेपरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शिक्षण विभागाकडून महसूल विभागाकडून जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय महागाव आणि कोठारी येथील शाळेत चौकशी सुरू आहे.
