Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या 'राम रक्षा आंदोलन' वरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरातील आर्थिक गैरव्यवहाराच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या ‘राम रक्षा आंदोलन’ वरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरातील आर्थिक गैरव्यवहाराच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
माध्यमांशी बोलताना उदय सामंत यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले की, उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत आघाडी केली, त्यावेळी त्यांचे हिंदुत्व कुठे गेले होते? तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावर ठाकरे यांनी भूमिका का घेतली नाही, असा सवालही त्यांनी केला.
उदय सामंत पुढे म्हणाले की, राज्यातील हिंदू मतदार उद्धव ठाकरे यांना नाकारत असल्याची जाणीव झाल्यानंतरच त्यांनी पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणला आहे. त्यामुळे सध्याची भूमिका ही केवळ राजकीय असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेचाही उल्लेख केला. “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेससोबत जाण्याला स्पष्ट विरोध केला होता. ‘शिवसेना काँग्रेसमय होणार असेल तर मी माझं दुकान बंद करीन,’ अशी त्यांची भूमिका होती. मग काँग्रेससोबत सत्ता स्थापन करताना उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व कुठे होते?” असा प्रश्न उदय सामंत यांनी उपस्थित केला.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या ‘राम रक्षा आंदोलन’च्या घोषणेनंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नव्या राजकीय संघर्षाची चिन्हे दिसू लागली आहेत.
