Thackeray – Shinde : बोलणं टाळलं, खुर्चीही टाळली, ठाकरे-शिंदेंनी नेमकं काय केलं? व्हिडिओची चर्चा!
अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभात फोटोसेशनचा कार्यक्रम झाला. या फोटोसेशनदरम्यान घडलेल्या एका घटनेने सगळ्यांचे लक्ष वेधले.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा अंतिम आठवडा सध्या सुरू आहे. या अधिवेशनात विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना विविध मुद्द्यांवर घेरण्याचा प्रयत्न करत असून, सत्ताधारीही त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत आहेत. आज शिवसेना (उबाठा) नेते अंबादास दानवे यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ संपला. त्यांच्या निरोप समारंभात सर्व प्रमुख नेत्यांनी भाषणे केली, त्यानंतर फोटोसेशनचा कार्यक्रम झाला. मात्र, या फोटोसेशनदरम्यान घडलेल्या एका घटनेने सगळ्यांचे लक्ष वेधले.
फोटोसेशनसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती आणि सर्व आमदार उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या आगमनाची सर्वजण वाट पाहत होते. ठाकरे आल्यानंतर सर्व नेत्यांनी त्यांचा सन्मान करण्यासाठी आपापल्या जागांवरून उठून स्वागत केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपल्या आसनावरून उठून त्यांचे स्वागत केले. फोटोसेशनदरम्यान विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या शिंदे यांच्या शेजारी बसल्या होत्या. उद्धव ठाकरे यांना पाहताच त्यांनी आपली जागा सोडली आणि ठाकरे यांना शिंदे यांच्या शेजारी बसण्याची विनंती केली. मात्र, ठाकरे यांनी शिंदे यांच्याशेजारी बसण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर ठाकरे दुसऱ्या खुर्चीकडे गेले, तर शिंदे यांनी नीलम गोऱ्हे यांना पुन्हा त्यांच्या मूळ जागेवर बसण्यास सांगितले. परिणामी, गोऱ्हे यांनी ठाकरे आणि शिंदे यांच्यामधील रिकाम्या खुर्चीवर स्थान घेतले. या फोटोसेशनदरम्यानच्या घटनेमुळे सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला, परंतु एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे किंवा त्यांच्या शेजारी बसणे टाळले. या घटनेने विधान भवनात आणि बाहेरही खमंग चर्चांना उधाण आले आहे.
