Vijay Wadettiwar : हल्ल्यासाठी गुंड विधानभवनात आणले; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधान भवनातील पावित्र्याला धक्का लावणाऱ्या घटनेवर सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.
काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधान भवनातील पावित्र्याला धक्का लावणाऱ्या घटनेवर सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. कोणाचेही नाव न घेता त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधत विधान मंडळ परिसरात मकोकाअंतर्गत गुन्हेगार फिरत असल्याचा गंभीर आरोप केला.
वडेट्टीवार म्हणाले, सभागृहात प्रत्येकाला आपली मते मांडण्याचा अधिकार आहे, पण असंविधानिक शब्दांचा वापर करणे किंवा गुन्हेगारांना कार्यकर्त्याच्या नावाखाली सभागृहात आणणे निंदनीय आहे. काल घडलेली घटना लोकशाहीच्या मंदिराला काळिमा फासणारी आहे.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले, ज्या व्यक्तीने हल्ला केला, तो मकोकाअंतर्गत आरोपी आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सर्व काही स्पष्ट आहे. प्रथम हल्ला कोणी केला, यावर कारवाई व्हायला हवी, पण उलट मार खाणाऱ्यावरच गुन्हा दाखल झाला. वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, मागील काही काळात 10 हजार रुपयांना पास विकले गेले. आता सत्ताधारी गुंडांना विधान भवनात आणण्याचा प्रयत्न करत आहेत का, याची चौकशी व्हायला हवी. यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पडळकर यांच्यासोबत विधान भवनात दिसलेला कार्यकर्ता हा मकोकाअंतर्गत यापूर्वी आरोपी होता. तो आज कार्यकर्ता आहे की गुंड, हे स्पष्ट व्हायला हवे. अशा व्यक्तींना पास कसे दिले गेले? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
