5 दिवसांनंतर विरार लोकल धावली… पण स्टेशन गाठण्यासाठी अजूनही पाण्यातूनच प्रवास!
अतिवृष्टीमुळे विस्कळीत झालेली पश्चिम रेल्वेची विरारकडे जाणारी लोकल सेवा अखेर पूर्ववत करण्यात आली आहे. पावसाचे पाणी ओसरल्यानंतर आज सकाळपासून रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली असून, प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नालासोपारा आणि वसई रेल्वे स्थानकांवरील रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे पश्चिम रेल्वेची लोकल सेवा गंभीरपणे विस्कळीत झाली होती आणि हजारो प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
दरम्यान, आज रेल्वे रुळांवरील पाणी ओसरल्यानंतर विरारकडे जाणारी लोकल सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. मात्र, नालासोपारा रेल्वे स्थानक परिसर आणि स्टेशनकडे जाणारे अनेक रस्ते अजूनही पाण्याखाली असल्याने नागरिकांची गैरसोय कायम आहे.
स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना अजूनही पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागत असून, अनेक ठिकाणी जनजीवन पूर्णपणे पूर्वपदावर आलेले नाही. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, साचलेले पाणी लवकरात लवकर उपसण्यासाठी उपाययोजना सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.