Maharashtra News LIVE: बागेश्वर महाराज यांच्या विरोधात काँग्रेसचे ठाण्यात आंदोलन
Maharashtra News LIVE Updates : बच्चू कडू यांची आज शिंदेंच्या शिवसेना नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक आहे. विधान परिषदेच्या आमदारकीसाठी त्यांच्यासमोर मोठी अट आहे. त्यावर बच्चू कडू काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बच्चू कडू यांची सोमवारी मुंबईत बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे. आजदेखील शिवसेनेच्या नेत्यांसोबत बच्चू कडूंची महत्त्वाची बैठक आहे. विधान परिषदेच्या आमदारकीसाठी प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करावा लागणार, अशी मोठी अट बच्चू कडू यांच्यासमोर शिवसेनेची आहे. बच्चू कडू काय निर्णय घेणार, हे आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. बार्शी इथं भगवंताची महापूजा तसंच सोलापुरात भव्य कार्यकर्ता मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत. सोलापुरातील ऐतिहासिक विजयाच्या उत्सवानिमित्त निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार असून यावेळी फडणवीस कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. यासह राज्यातील इतर घडामोडी, देश-विदेश, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
बागेश्वर महाराज यांच्या विरोधात काँग्रेसचे ठाण्यात आंदोलन
बागेश्वर धीरेंद्र शास्री महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याच्या विरोधात काँग्रेस पक्षाने ठाण्यात आंदोलन कले. यावेळी आंदोलकांनी बागेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस जोडे मारत निषेध व्यक्त केला.
-
मनपाच्या शाळा खासगी विकासकांच्या घशात घालण्याचा डाव – सुनील प्रभू
आदित्य ठाकरे जे बोलले तीच आमची भूमिका आहे, पीपीपी तत्वावर मनपाच्या शाळा खासगी विकासकांच्या, खाजगी संस्थांच्या घशात घालण्याचा डाव आहे, इंग्रजी माध्यम सुरू होईल, मराठीपण टिकणार नाही अशी टीका शिवसेना नेते सुनील प्रभू यांनी केली आहे.
-
-
आमचे उमेदवार कोण हे ३० तारखेला कळेल – उदय सामंत
बच्चु कडू यांचा स्वतंत्र पक्ष आहे आणि माझी काही त्यांच्याशी भेट झालेली नाही. आमचे कोण उमेदवार आहेत हे ३० तारखेला कळेल. ३० तारखेला आमचे उमेदवार २ आहेत की ३ हे समजेल. ‘ऑपरेशन टायगर’ याबाबत एकनाथ शिंदे बोलले आहेत असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.
-
धाराशिव मध्ये तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे
धाराशिव जिल्ह्यामध्ये तापमानाचा पार 40 अंश सेल्सिअस वर पोहोचला असून उष्णतेच्या तीव्र झळा जाणवत आहेत. गेले आठ दिवसापासून वाढलेल्या तापमानामुळे जिल्ह्यातील पाणी पातळी सुद्धा झपाट्याने कमी झाली आहे. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
-
अमरावती : अमरावतीचा पारा 46 अंशाच्या जवळ
सलग तिसऱ्या दिवशी अमरावतीचा पारा 46 अंशाच्या जवळपास पोहोचले आहे. काल विदर्भात सर्वाधिक अमरावतीचे तापमान 46.6° वर पोहोचले होते. वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळी रस्त्यावरील गर्दी ओसरली आहे. पुढील तीन ते चार दिवस अशाच तापमानाचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
-
-
पुणे : जुन्नर तालुक्यात दोन लहान मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी येथे दोन लहान मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. अभी महेश पवार (वय 10 वर्)षे आणि सोहम जयसिंग नवले (वय 12 वर्)षे अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत.
-
बीड : जिल्हा कारागृहातील कैद्याचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू
बीड जिल्हा कारागृहातील एका कैद्याला बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी त्या कैद्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. आशिष धीवार असे या कैद्याचे नाव आहे. त्याला 26 एप्रिल रोजी कारागृहातून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
-
अहिल्यानगरमध्ये तापमानाचा पारा चाळीशी पार
अहिल्यानगर जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता वाढली असनू कडक उन्हामुळे फळबागांना फटका बसला आहे. डाळींब बागांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. फळांवर पांढऱ्या कापडाचे आच्छादन केले आहे.
-
धीरेंद्र शास्त्री व संजय गायकवाड यांच्याविरोधात आंदोलन
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री, संजय गायकवाड यांच्याविरोधात महाविकास आघाडी एकत्र येऊन आज करणार आंदोलन. महाविकास आघाडी, डावे पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी तसेच पुरोगामी संघटना शिवाजी पार्क येथे दुपारी 4 वाजता निदर्शने करणार आहेत…
-
टॅक्सी आणि रिक्षा चालकांना मराठी बोलणं बंधनकारक- प्रताप सरनाईक
काल मंत्रालयात बैठक झाली आणि ती सकारात्मक बैठक झाली. हा नियम ओला उबेरच्या बाबातीत सुद्धा घेतला आहे. सगळ्यांनी मागणी केली ठीक आहे. परंतु आमच्याकडे जी माहीती मिळाली त्यामध्ये 2020 साली राज्य सरकारने एक पुस्तीका काढली होती. टॅक्सी चालक, रिक्षा चालक मराठी बोलणं बंधनकारक आहे. आज आम्ही बैठक घेतली 1 मे पासुन आम्ही आमची मोहीम सुरु ठेवणार आहोत.
-
धाराशिव मध्ये तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर
धाराशिव जिल्ह्यामध्ये तापमानाचा पार 40 अंश सेल्सिअसवर पोहोचला असून उष्णतेच्या तीव्र झळा जाणवत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे जिल्ह्यातील पाणी पातळी सुद्धा झपाट्याने कमी झाली आहे. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
-
पुण्यातील हडपसर परिसरात रिकव्हरी एजंटकडून ग्राहकाला बेदम मारहाण
पुण्यातील हडपसर परिसरात रिकव्हरी एजंटकडून ग्राहकाला बेदम मारहाण.. खासगी रिकव्हरी एजंटच्या वर्तणुकीवर पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित.. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, वसुलीसाठी कोणत्याही ग्राहकाला धमकावणे किंवा सार्वजनिक ठिकाणी अपमानित करणे बेकायदेशीर..
-
दाऊदचा साथीदार सलीम डोलाला तुर्कीच्या इस्तांबुलमधून अटक
दाऊदचा साथीदार सलीम डोलाला तुर्कीच्या इस्तांबुलमधून अटक.. तुर्कीच्या इस्तांबुलमध्ये अटक झाल्यानंतर भारतात प्रत्यार्पण.. सलीम डोलाला भारतात आणल्याची माहिती.. सलील डोला याला पुढील चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्याची शक्यता..
-
परिवहन विभागाच्या बैठकीत सकारात्म चर्चा
परिवहन विभागाच्या बैठकीत सकारात्म चर्चा. कालावधी वाढवण्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती. 1 मे पासून परमिट रद्द न करण्यावर सगळ्याचं एकमत झाल्याची सूत्रांची माहिती.
-
पुस्तक वाचनासाठी निघालेल्या प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी रस्त्यातच अडवलं
बुलढाण्यात पुस्तक वाचनासाठी निघालेल्या प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी रस्त्यातच अडवलं… गायकवाडांची मग्रुरी अजूनही गेलेली नाही… आम्ही कायदेशीर लढाई लढणार… ‘शिवजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींकडून भूमिका स्पष्ट
-
संजय गायकवाडांच्या घरावर कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा
संजय गायकवाडांच्या घरावर कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा… प्रकाशक प्रशांत आंबींना शिवीगाळ केल्याप्रकरणी सीपीआय कार्यकर्त्यांकडून आंदोलन.. तर पोलिसांशी झटापट झाल्यानंतर पुस्तक वाचनावेळीत आंदोलक ताब्यात
-
कलिंगड उत्पादकांना दिलासा; युद्धविरामानंतर निर्यातीला वेग, दर पोहचले 16 रुपयांवर
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष निवळल्यानंतर आणि युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर भारतीय शेती क्षेत्राला, विशेषतः फळ उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. युद्धाच्या काळात निर्यातीवर आलेल्या मर्यादांमुळे कलिंगडाचे दर प्रति किलो ५ ते ६ रुपयांपर्यंत खाली कोसळले होते, ज्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. मात्र, आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ पुन्हा खुली झाल्याने कलिंगडाच्या निर्यातीला मोठा वाव मिळत आहे. परिणामी, बाजारात कलिंगडाला पुन्हा मागणी वाढली असून सध्या १५ ते १६ रुपये प्रति किलो असा समाधानकारक दर मिळत आहे. यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
-
संजय गायकवाड यांच्या घराबाहेर कम्युनिस्ट पक्षाचे आंदोलन, पोलिसांकडून धरपकड सुरु
आमदार संजय गायकवाड यांच्या घराबाहेर कम्युनिस्ट पक्षाकडून आंदोलन सुरु आहे. यावेळी पोलिसांकडून अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली जात आहे. यावेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यात जोरदार झटापट पाहायला मिळत आहे.
-
बार्शीच्या भगवंत मंदिर विकासासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बार्शी येथील ऐतिहासिक आणि प्राचीन भगवंत मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी बोलताना त्यांनी मंदिराच्या पौराणिक महत्त्वाबद्दल माहिती दिली. “राजा अंबरीषासाठी भगवंताने घेतलेला हा अवतार असून, या प्राचीन मंदिराचा उल्लेख इतिहासात आढळतो,” असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच, बार्शीचे आमदार राजा राऊत यांच्या मागणीची दखल घेत त्यांनी मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी मोठी घोषणा केली. राजाभाऊ राऊत जो मंदिराचा विकास आराखडा सादर करतील, त्याला राज्य सरकार त्वरित मंजुरी देईल आणि आवश्यक निधी उपलब्ध करून देईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
-
सांगली जिल्ह्यात पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु, १८ सरपंच आणि ८२ ग्रामपंचायत सदस्यांसाठी पोटनिवडणूक
सांगली जिल्ह्यातील रिक्त झालेल्या थेट सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी आज पोटनिवडणुकीची मतदान प्रक्रिया उत्साहात पार पडत आहे. जिल्ह्यातील एकूण १८ सरपंच पदे आणि ८२ सदस्य पदांसाठी ही निवडणूक होत असून, काही जागा आधीच बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित जागांसाठी सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असून अनेक ठिकाणी स्थानिक आघाड्या आणि राजकीय पक्षांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.
-
बार्शीच्या भगवंत मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते महापूजा; पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत
भारतातील एकमेव असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील ऐतिहासिक भगवंत मंदिरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली. भगवंत महोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस आज बार्शी दौऱ्यावर असून, मंदिरात दाखल होताच त्यांचे पुष्पवृष्टी करून उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी विठ्ठल रुपी भगवंताचे दर्शन घेऊन राज्याच्या समृद्धीसाठी साकडे घातले. या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक आणि राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.
-
शरद पवारांनी पुण्यात कुटुंबातील सदस्यांची बैठक बोलवली, सर्वांशी संवाद साधणार
शरद पवार यांनी पुणे येथे पवार कुटुंबातील सर्व सदस्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्यासह कुटुंबातील इतर प्रमुख सदस्य उपस्थित राहणार आहेत. आगामी राजकीय घडामोडी किंवा कौटुंबिक विषयांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, शरद पवार सर्वांशी संवाद साधणार आहेत. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
-
मराठवाड्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र
मराठवाड्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली असून आजही तापमानाने चाळिशी पार केली आहे. नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. आज मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान असणार आहे. परभणी आणि नांदेड येथे सर्वाधिक सुमारे 42°C तापमान असणार आहे. छत्रपती संभाजीनगर, हिंगोली आणि बीड येथे तापमान 41°C च्या आसपास राहील. तर जालना, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातही पारा 40°C च्या पुढे जाण्याची शक्यता आहे.दुपारच्या वेळेत “रिअल फील” तापमान तब्बल 44°C पर्यंत पोहोचत असल्याने उष्णतेची तीव्रता अधिक जाणवणार आहे.यासोबतच उष्ण आणि कोरडे वारे म्हणजेच ‘लू’ देखील वाहत आहेत.
-
भाजप नेते किरीट सोमय्या आज मिरा रोडला भेट देणार
कालच्या मिरा रोड येथील प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आणि जखमींची विचारपूस करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या आज मिरा रोडला भेट देणार आहेत.मिरा रोड येथील वोकहार्ट हॉस्पिटलमागे जुबेर अन्सारी याने दोन सुरक्षा रक्षकांवर चाकूने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हल्ला करण्यापूर्वी आरोपीने रक्षकांना “कलमा वाचता येतो का?” आणि “नमाज पडता येते का?” अशी विचारणा केली होती.आरोपीकडे isis ‘लोन वुल्फ ‘जिहाद’ आणि ‘गाझा’ संदर्भातील आक्षेपार्ह नोट्स सापडल्या असून आरोपीचा isis ‘शी संबंध असल्याचा संशय आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून एटीएसने तपास ताब्यात घेतला असून, जखमींवर उपचार सुरू आहेत व आरोपी पोलिसांच्या कोठडीत आहे.पुढील तपास सुरु आहे
-
संजय गायकवाड यांच्या घरावर कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा
बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर कम्युनिस्ट पक्षाने मोर्चा काढला. शिवाजी कोण होता? या पुस्तकावरून वातावरण तापले आहे. प्रकाशक प्रकाश आंबी हे पुस्तकाचं वाचन करण्यासाठी इथं आले आहेत. गायकवाडांची मग्रुरी अजून गेलेली नाही असा दावा त्यांनी केला. तर गायकवाड यांनी आंबींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
-
जळगावमध्ये तापमानाचा पारा 44.6 अंश सेल्सिअस वर
जळगावमध्ये तापमानाचा पारा 44.6 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. जळगावात यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात तापमानाने 44 अंशांचा आकडा ओलांडला आहे. वाढत्या तापमानामुळे शाळांच्या वेळांमध्ये बदल झाला आहे. रस्ते निर्मनुष्य झाल्याचे चित्र दिसत आहेत. एप्रिलमध्ये सुरू राहणाऱ्या सीबीएससी स्कूल आठ ते साडेदहा वाजेपर्यंत भरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
-
बीड जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींपैकी 43 जागा बिनविरोध
बीड जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींच्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. मात्र, काही ग्रामपंचायतींचा उर्वरित कालावधी 6 महिन्यांपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आल्याने यात बदल करण्यात आला व 79 जागांसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. या प्रक्रियेत 3 सरपंच आणि 40 सदस्य अशा एकूण 43 जागांवर निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. तर आज सकाळी साडेसात वाजल्यापासून जिल्ह्यातील 27 ग्रामपंचायतींच्या 31 जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी आता जेथे मतदान होत आहे. तेथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. याचा निकाल उद्याच जाहीर होणार आहे.
-
जालना जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी, प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन
जालना शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून काल 41.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून कुलाबा येथील प्रादेशिक हवामान विभागाकडून जालना जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहून खबरदारी घ्यावी असा आवाहन करण्यात आलय. दुपारी 12 ते 3 या वेळेत घराबाहेर जाणे टाळाअति कष्टाची कामे करू नका शिवाय उलटी,चक्कर आणि अशक्तपणा किंवा यासारखी इतर उन्हाचा झटका बसण्याची लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलाय.सध्या उन्हाचा पारा वाढत असल्याने नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी रुमाल टोप्या गॉगल यांचा वापर करत आहे.उन्हाच्या तडाख्यामुळे जालना शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून रस्ते देखील निर्मनुष्य होत आहे.
-
शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्यास बघू
पुस्तक वाचनात छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्यास बघू असा इशारा आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे. प्रकाशक प्रशांत आंबी यांनी शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात आज बुलढाण्यात मोठा राडा सुरू आहे. आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा आंदोलकांना मोठा इशारा दिला आहे.
-
बच्चू कडू हे शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून जाण्याची शक्यता
बच्चू कडू हे शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून जाण्याची शक्यता. बच्चू कडूंनी प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन केल्यास आत्ता आमदारकी आणि सहा महिन्यांनी मंत्रीपद शिवसेनेची बच्चू कडू यांना मंत्री पदाचीचीही ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान आता आमदारकी दिल्यास बच्चू कडूंनी शिवसेनेत प्रवेश करावा मात्र सध्या पक्ष विलीन करू नये. जेव्हा मंत्रिपद मिळेल तेव्हा पक्ष विलीन करावा प्रमुख पदाधिकाऱ्यांची भूमिका असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
-
महाराजांचा अनादर करण्याचा कोणताही हेतू लेखकांचा होता ना प्रकाशक म्हणून माझा – प्रशांत आंबी
ए आई म्हणतो, जय भवानी जय शिवाजी म्हणतो, अरे देवा म्हणतो…म्हणजे काही एकेरी हाक मारत नाही. त्याप्रमाणे त्याच भावनेतून हे पुस्तक लिहीलं आहे. महाराजांचा अनादर करण्याचा कोणताही हेतू लेखकांचा होता ना प्रकाशक म्हणून माझा – प्रशांत आंबी
-
नाशिक – भोंदू अशोक खरात चे वकील आज अशोक खरातची एसआयटी कस्टडी दरम्यान घेणार भेट
नाशिक – भोंदू अशोक खरात चे वकील आज अशोक खरातची एसआयटी कस्टडी दरम्यान भेट घेणार आहेत. भोंदू अशोक खरात आणि वकील आज दिवसभरात एसआयटी कस्टडीत भेटणार असल्याची शक्यता आहे. अशोक खरातच्या विरोधात महिला लैंगिक अत्याचार प्रकरणी आठ गुन्हे दाखल असून खरातची एसआयटीकडून कसून चौकशी सुरू आहे. सातव्या गुन्ह्यात खरातला तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. भोंदू अशोक खरातचे वकील एसआयटी चौकशी संदर्भात खरात सोबत चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
-
जालना जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन
जालना जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी, प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन जारी करण्यात आलं आहे. काल जालन्यात 41.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. दुपारी 12 ते 3 वाजेच्या वेळेत घराबाहेर जाण टाळा,उन्हाचा झटका बसण्याची लक्षणं दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
-
चंद्रपुरात उष्णतेचा कहर,तापमान 45 अंशांपार
चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं आहे. एप्रिलच्या अखेरीसच तापमानात मोठी वाढ झाली असून मे महिन्यातही उष्णतेचा तडाखा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेकडून ठिकठिकाणी जनजागृतीचे फलक लावून नागरिकांना उन्हापासून व उष्ण वाऱ्यापासून बचावासाठी आवश्यक उपाययोजनांचे आवाहन करण्यात येत आहे. हीट स्ट्रोकच्या रुग्णांसाठी कोल्ड रूमची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
-
नाशिक – खरातच्या कार्यालयातून अंगठीचे 35 मापे ,एक धनादेश जप्त
नाशिक – भोंदू अशोक खरातच्या कार्यालयातून अंगठीची 35 मापं ,एक धनादेश जप्त करण्यात आला. सातव्या गुन्ह्याचा तपास करताना भोंदू खरातच्या कार्यालयात अंगठी बनविण्याचे मापे आणि धनादेश आढळला. एकूण पस्तीस गोलाकार मापं स्टीलच्या कडीमध्ये आढळले. भोंदू खरात पीडित महिला तसेच त्याच्या जाळ्यात अडकलेल्या भक्तांच्या बोटाचे माप घेऊन त्यांना 5 हजारांची अंगठी लाखो रुपयात विकायचा. एका महिलेच्या नावाने असलेल्या मोठ्या रकमेचा धनादेश देखील एसआयटीने जप्त केला .
-
धनंजय देशमुख यांचे निवडणुकीदरम्यान मोठे विधान..
मतदारांचा प्रतिसाद नेहमीप्रमाणेच आहे. सकाळपासून मतदान पार पडत आहे शांततेत आणि सुरळीत मतदान प्रक्रिया सुरू आहे. बिनविरोध होणार नाही याला आता महत्त्व नाही कारण आता मतदान प्रक्रिया पार पडत आहे. 1600 ते 1800 मतदान होईल. मतदारांचा नक्कीच कौल मिळेल आणि पुढे सर्व कामे केली जातील, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले.
-
ब्रह्मपुरी शहरातील ख्रिस्तानंद हॉस्पिटलची नोंदणी रद्द
ब्रह्मपुरी शहरातील ख्रिस्तानंद हॉस्पिटलची नोंदणी रद्द करत जिल्हा प्रशासनाने ऑपरेशन थियेटर केले सील. मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर ३ रुग्णांना जंतूसंसर्ग होऊन त्यांची दृष्टी गेल्याची तक्रार प्राप्त होताच जिल्हा शल्य चिकित्सकांनी सोमवारी या रुग्णालयाची नोंदणी रद्द करून ऑपरेशन थिएटर सील केले. १९ फेब्रुवारी ला या हॉस्पिटल मध्ये ३ रुग्णांवर करण्यात आलं होतं मोतियाबिंदूचं ऑपरेशन,त्यानंतर या तिघांची दृष्टी गेल्याची जिल्हा प्रशासनाकडे अलीकडेच करण्यात आली होती तक्रार, चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालानुसार ख्रिस्तानंद हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र नेत्ररोग विभाग मंजूर नसतांनाही तिथे अवैधरित्या नेत्र शस्त्रक्रियागृह चालविले जात असल्याची आणि या ठिकाणी ऑपरेशन केल्या जात असल्याची जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महादेव चिंचोळे यांची माहिती.
-
ॲस्टोमो कंपनीत वरिष्ठ अधिकाऱ्याकडून महिलेचा विनयभंग
जळगावच्या बांभोरी येथील ॲस्टोमो कंपनीत वरिष्ठ अधिकाऱ्याकडून शरीर सुखाची मागणी करत कर्मचारी महिलेचा विनयभंग. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून जनार्दन नामक कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडिती महिलेने तिच्या आजारी मुलीसाठी सुट्टी मागितली असता अधिकाऱ्याची महिलेकडे शरिरसुखाची मागणी करत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न. तू खूप सुंदर आहे, मला तू आवडते, तू मला खुश कर, मी तुला दोन दिवस काय दहा दिवसाच्या सुट्ट्या देईन आणि पगारही कापणार नाही,” असे म्हणून अधिकाऱ्याने पीडितेचा विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद
-
पिंपरी चिंचवड शहरात आज सायंकाळी पाणीपुरवठा बंद
ॉपिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीन निगडी जलशुद्धीकरण केंद्रात करण्यात येणाऱ्या स्थापत्य आणि विद्युत विषयक देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळ आज पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच उद्याही सकाळचा पाणीपुरवठा अनियमित आणि कमी दाबाने होणार आहे. नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा,अस आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीन करण्यात आलय.
-
बच्चू कडूंना विधान परिषदेचे आमदारकी देण्यात शिंदेंची शिवसेना इच्छुक..
बच्चू कडू आणि मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये मुंबईत काल झालेल्या बैठकीची इनसाईड स्टोरी tv9 मराठीच्या हाती. बच्चू कडूंना विधान परिषदेचे आमदारकी देण्यात शिंदेंची शिवसेना इच्छुक; मात्र प्रहारच्या विलानीकरणाच्या मुद्द्यावर एकमत नाही. बैठकीमध्ये बच्चू कडूंनी विलनीकरणासंदर्भात ठोस निर्णय घेतला नाही. प्रहार चे शिवसेनेत विलानीकरण करणार की नाही याबाबत कालच्या बैठकीत बच्चू कडू यांनी भूमिका स्पष्ट केली नाही. आज देखील बच्चू कडू यांची शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यासोबत सोबत बैठक..
-
मस्साजोग ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान
मस्साजोगच्या ग्रामपंचायत समितीच्या सरपंचपदासाठी आज निवडणूक आहे. संतोष देशमुख यांच्या निधनानंतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सर्वांची इच्छा होती. मात्र, तसे होऊ शकले नाही. आज मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली.
-
उच्च न्यायालयाच्या कर्मचारी भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेदरम्यान केंद्रात मोबाईल नेणाऱ्या परीक्षार्थी उमेदवाराला अटक
जळगावात उच्च न्यायालयाच्या कर्मचारी भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेदरम्यान केंद्रात मोबाईल नेणाऱ्या परीक्षार्थी उमेदवाराला अटक करण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान मोबाईल नेण्यास मनाई असतानादेखील परीक्षार्थी उमेदवाराने परीक्षा केंद्रात मोबाईल नेल्याचा प्रकार समोर आला. परीक्षार्थी उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक, शिपाई, वाहनचालक या पदांच्या परीक्षेदरम्यान गणेश कॉलनीमधील प. न. लुंकड कन्या शाळेच्या केंद्रावर प्रकार घडला आहे.
-
बच्चू कडू हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाण्याची शक्यता
प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बच्चू कडूंची काल मुंबईत बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे. आज देखील शिवसेनेच्या नेत्यांसोबत बच्चू कडूंची महत्त्वाची बैठक आहे. विधान परिषदेच्या आमदारकीसाठी प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करावा लागणार, अशी मोठी अट बच्चू कडू यांच्यासमोर शिवसेनेची आहे.
-
नाशिक मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट दुर्घटनेत महिला कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू
नाशिक मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट दुर्घटनेत महिला कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आडगाव परिसरातील मेडिकल कॉलेजमध्ये कामावर असताना ज्योती अहिरे यांच्या अंगावर लिफ्ट कोसळल्याची घटना घडली होती. गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू असतानाच ज्योती अहिरे यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दैनंदिन कर्तव्य बजावताना घडलेल्या या भीषण घटनेने मेडिकल कॉलेज परिसरात खळबळ उडाली आहे.
-
नाशिकमध्ये साधूग्रामसाठी तपोवनात भूसंपादन वेगात
नाशिकमध्ये साधूग्रामसाठी तपोवनात भूसंपादन वेगात होत असून जमीनमालकांवर अन्याय होऊ देणार नाही अशी स्पष्ट ग्वाही महापौरांनी दिली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक ३७७ एकरपैकी ९४ एकर जमीन आधीच अधिग्रहित असून उर्वरित २८३ एकर संपादन प्रक्रिया सुरू आहे. अतिरिक्त १९२ एकर भूसंपादनाचा प्रस्तावही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्य शासनाकडे पाठवला आहे. तपोवन बैठकीत जमीनमालकांनी सेल इंडेक्सनुसार दर निश्चितीची मागणी करत भरपाईबाबत भूमिका मांडली. महापौर हिमगौरी आडके यांनी मुख्यमंत्री आणि कुंभमेळामंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न शिखर समितीसमोर मांडण्याचं आश्वासन दिलं.
-
जळगावच्या पिंप्राळा परिसरात नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा
जळगावच्या पिंप्राळा परिसरात नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असून नळातून चक्क मातीच्या रंगाचं पाणी येत आहे. यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. पिंप्राळा परिसरात ओमकार पार्क परिसरात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. नळातून माती बरोबरच इतर कचरा येत असल्याने पाणी पिण्यायोग्य नसल्याची नागरिकांची माहिती आहे. महापालिकेनं पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीची तपासणी करून दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी आहे.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर असून ते बार्शी इथं भगवंताची महापूजा तसंच सोलापुरात भव्य कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. सोलापुरातील ऐतिहासिक विजयाच्या उत्सवानिमित्त निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी फडणवीस कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. शहरातील हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर हा मेळावा पार पडणार आहे.
-
धाराशिव जिल्हा परिषदेच्या स्वीकृत सदस्य निवडीचे राजपत्र जाहीर
धाराशिव जिल्हा परिषदेच्या स्वीकृत सदस्य निवडीचं राजपत्र जाहीर करण्यात आलं आहे. धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये पाच स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे. जिल्हा परिषदेचा निकाल लागल्यानंतर तब्बल 95 दिवसानंतर स्वीकृत सदस्य निवडीचं राजपत्र जाहीर करण्यात आलं. स्वीकृत सदस्य निवडीचे सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असून जिल्हा परिषदसह पंचायत समितीमध्येही स्वीकृत सदस्य असणार आबेत. सदस्य संख्याबळाआधारे स्वीकृत सदस्याची निवड होणार आहे.
-
धुळ्यातील शिरपुरात १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार
धुळ्यातील शिरपुरात १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. कुटुंबासह भाडेकरु म्हणून राहण्यासाठी आलेल्या नराधमानेच हा अत्याचार केला. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषण गुलाब पाटील या २४ वर्षीय नराधमाला शिरपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
-
गोंदिया जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढल्याने शाळेच्या वेळेत बदल
गोंदिया जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला असून शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता सकाळी 7 ते 10 पर्यंत शाळांची वेळ असेल. जिल्हाधिकाऱ्यांनी हे नवे आदेश दिले आहेत.
Published On - Apr 28,2026 8:00 AM
