Maharashtra News LIVE : 30 जूनपासून मतदार यादीचे विशेष पुनरावलोकन अभियान; बीएलओ करणार घराघर जाऊन पडताळणी
Maharashtra News LIVE Updates : आज कोकण किनारपट्टीवरील अनेक भागांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील काही भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
बीड येथे एका तरुणाला जबर मारहाण, पाच आरोपींविरुद्ध ॲट्रॉसिटी
बीड येथे एका तरुणाला जबर मारहाण झाली होती. त्यामध्ये हत्येचा प्रयत्न आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींची नावे उघड असून तीन आरोपी अनोळखी आहेत. त्यासंदर्भात तपास सुरू आहे. त्यातील आरोपी सचिन राठोड याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. या आरोपींना अटक झालेली नसून ते फरार आहेत.
-
लग्नासाठी धर्मांतराची अट घातल्याने सांगलीत तरुणाची आत्महत्या
सांगली शहरात एक धक्कादायक आणि दुर्देवी घटना घडली आहे लग्नासाठी धर्मांतराची अट घातल्याने सांगलीतील एका 19 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे.दुर्वांक प्रमोद शेवाळे असे मयत तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी संबंधित तरुणीसह दोघांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
-
-
30 जूनपासून मतदार यादीचे विशेष पुनरावलोकन अभियान; बीएलओ करणार घराघर जाऊन पडताळणी
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 30 जून ते 29 जुलै या कालावधीत मतदार यादीचे विशेष पुनरावलोकन अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा उद्देश पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे तसेच अपात्र व्यक्तींची नावे वगळणे हा आहे. याअंतर्गत बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) घराघर जाऊन गणना प्रपत्र भरतील आणि मतदारांची पडताळणी करतील.
-
गृहमंत्री अमित शाह यांनी एफसीआरए 2.0 पोर्टल आणि ई-ओसीआय प्रणाली सुरू
दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एफसीआरए 2.0 पोर्टल आणि ई-ओसीआय (ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया) प्रणाली सुरू केली.
-
उपमहापौर संजय घाडी चेंबुर स्कूल बस घटनास्थळी दाखल
चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. उपमहापौर संजय घाडी यांनी दुर्घटना स्थळाची पाहाणी केली.
-
-
अयोध्या: देणग्या चोरीला गेल्यानंतर दानात वाढ
देणग्या चोरीच्या घटनेनंतर अयोध्येतील देणग्यांच्या रकमेत वाढ झाली आहे. सूत्रांनुसार, 7 जूनपूर्वी दररोज सरासरी 16-18 लाख रुपये जमा होत होते. या प्रकरणानंतर, जमा होणारी सरासरी रक्कम 22-24 लाख रुपये आहे.
-
पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानविरोधात प्रचंड निदर्शने
पाकिस्तानव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये (पीओजेके) 9 जूनपासून आंदोलने सुरू आहेत. रावलकोटमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी पाकिस्तानी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
-
-
चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळलं, विद्यार्थ्याचा मृत्यू
चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. बसमध्ये 13 विद्यार्थी होते. महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळावरून आढावा घेतला. सर्व झाडांचे ऑडिट करणार असल्याचं असं त्याने सांगितलं. झाडं उन्मळून कसं पडलं याची चौकशी करणार आहोत.
-
राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकवणे अनिवार्य
राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकवणे अनिवार्य. शाळा हा नियम धुडकावणार असतील तर त्या शाळांवर कठोर कारवाई करणार. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसेंचा इशारा.
-
सचिन अहिर यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होऊ शकत नाही- असीम सरोदे
सचिन अहिर यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होऊ शकत नाही. पक्षांतरबंदी कायद्यानुसार अहिरांना अपात्रतेपासून संरक्षण. उपसभापती पदाला संरक्षण असल्यामुळे कारवाई करता येत नाही-सरोदे
-
मुंबईच्या चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळून एका विद्यार्थीनीचा मृत्यू-राहुल शेवाळे
मुंबईच्या चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळून 10 विद्यार्थी जखमी. चेंबूरमधील 11 नंबर रोडवर स्कूल बसवर झाड कोसळल्याची घटना. एक शाळकरी मुलगा अजूनही बसमध्ये अडकल्याची माहिती. अशातच आता या घटनेत एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची माहिती राहुल शेवाळे यांनी दिली आहे.
-
पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांमध्ये दोन मतप्रवाह-सूत्र
पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांमध्ये दोन मतप्रवाह. काँग्रेसमध्ये विलीन होण्याबाबत एका गटाचं मत. तर भाजपात विलीन होण्याबाबत दुसऱ्या गटाचं मत- सूत्र. याबाबत पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका नाही.
-
आरक्षण उपवर्गीकरणाबाबतच्या बदर समितीच्या अहवालावर हरकती मागवल्यात- मुख्यमंत्री फडणवीस
आरक्षण उपवर्गीकरणाबाबतच्या बदर समितीच्या अहवालावर हरकती मागवल्यात. ‘सर्व हरकतींवर चर्चा होईल, सर्वांचं म्हणनं ऐकून घेतलं जाईल’. उपवर्गीकरणाला होणाऱ्या विरोधावर मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत स्पष्ट केलंय
-
चेंबूरमध्ये 11 नंबर रोडवर एका शाळेच्या बसवर झाड कोसळले
चेंबूरमध्ये 11 नंबर रोडवर एका शाळेच्या बसवर झाड कोसळले. बसमधील 10 शाळकरी मुलं गंभीर जखमी झाल्याची माहिती. तर एक शाळकरी मुलगा अजून बसमध्ये अडकल्याची माहिती
-
जळगाव : स्मार्ट मीटर व वाढीव वीजबिलांबाबत शिवसेना शिंदे गट आक्रमक
जळगावच्या पाचोरा-भडगाव शहरासह ग्रामीण भागात स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला शिवसेना शिंदे गटाने विरोध दर्शविला असून महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देत ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नयेत, अशी मागणी केली आहे. शिवसेनेने दिलेल्या निवेदनात सध्या अनेक भागांत वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याचे नमूद करत अशा परिस्थितीत स्मार्ट मीटर बसविणे ग्राहकांच्या हिताचे नसल्याचे म्हटले आहे.
-
परभणी – पाण्याचे आवर्तन बंद ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत
एल निनो च्या पार्श्वभूमीवर धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला असून शेतीसाठी सोडण्यात आली येणारी आवर्तन राज्य सरकारकडून बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. तर दुसरीकडे जून महिना संपत आला मात्र अजूनही पाऊस बरसत नसल्याने, लाखो रुपये खर्च करून लागवड केलेल्या शेकडो हेक्टर वरील पिके पाण्याअभावी वाळून जात आहे.
-
धुळे : पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या
धुळे जिल्ह्यामध्ये जून महिना उलटून जात असताना देखील पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांची पिके ही धोक्यात सापडली आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध होते अशा शेतकऱ्यांनी 15 मे नंतर कपाशीची पेरणी केली आहे. आता पाऊस नसल्याने ही पिके धोक्यात आली असून काही शेतकऱ्यांनी पाऊस येईल या आशेने बियाणे विकत घेतले असले तरी पाऊस नाही त्यामुळे पेरण्या रखडल्या आहेत.
-
नाशिक : येवला तालुक्यात तीव्र पाणीटंचाई, टँकरद्वारे पाणीपुरवठा
एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात अपेक्षित मान्सून अद्याप सक्रिय झालेला नसल्याने येवला तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने परिणामी तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. 47 गावे आणि 70 वाडी-वस्त्यांसह एकूण 117 ठिकाणी शासनाच्या वतीने 47 टँकरद्वारे दररोज 84 फेऱ्या करून सुमारे 70 ते 80 हजार नागरिकांची तहान भागवली जात आहे.
-
सचिन अहिर यांनीही आज षटकार मारला- एकनाथ शिंदे
सचिन अहिर यांनीही आज षटकार मारला. सहा खासदारांनी गेल्या आठवड्यात षटकार ठोकला. सहा मतदारसंघात काही लोकं जाऊन आले. त्यांचं अहिर यांनी षटकार मारून स्वागत केलंय. चौकार षटकरा सुरू आहे. राहतील. एक एक विकेट पडत जाईल. हा क्रिकेटचा गंमतीचा भाग जाऊ द्या असे एकनाथ शिंदे म्हणाले.
-
कुणी येण्याने किंवा जाण्याने धक्का बसत नाही- आदित्य ठाकरे
गेले चार वर्षे आम्ही पाहतोय की, ज्यांना सगळं काही मिळतं ते स्वत:च्या स्वार्थासाठी निघून जात आहेत. हे आम्ही गेल्या काही काळापासून पाहत आहे, त्यामुळे यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही नाही. वरळी-शिवडी हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. आमचं तिकडचं काम बोलतं, त्यामुळे कुणी येण्याने किंवा जाण्याने धक्का काही बसत नाही.
-
अवैध फळ विक्रेत्यांवर बदलापूर नगरपालिकेची धडक कारवाई
अवैध फळ विक्रेत्यांवर बदलापूर नगरपालिकेने मोठी कारवाई करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान फळ विक्रेत्यांची पालिका अधिकाऱ्यांसोबत अरेरावी केली आहे. महिला फळ विक्रेत्यांकडून कारवाई रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
-
शिवसेना सुद्धा एक होऊन जाईल- अब्दुल सत्तार
मला तर वाटतं पुढच्या भविष्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना बोलून त्यांनी (उद्धव ठाकरे) यायला पाहिजे शिवसेना सुद्धा एक होऊन जाईल. एकनाथ शिंदे साहेबांचे नेतृत्व त्यांनी स्वीकारला पाहिजे. एकनाथ शिंदे साहेब अचूक निर्णय घेतात आणि त्याचे परिणाम राजकारणात दिसतात असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.
-
आता उद्धव ठाकरे यांनी सुद्धा यावे -अब्दुल सत्तार
मला तर वाटतं पुढच्या भविष्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून त्यांनी यायला पाहिजे. शिवसेना सुद्धा एक होऊन जाईल. एकनाथ शिंदे साहेबांचे नेतृत्व त्यांनी स्वीकारला पाहिजे. एकनाथ शिंदे साहेब अचूक निर्णय घेतात आणि त्याचे परिणाम राजकारणात दिसतात. लोकसभेत आमचे 13 खासदार आहेत काँग्रेसच्या नंतर कोणाची संख्या असेल तर शिवसेनेची आहे, अशी प्रतिक्रिया सचिन अहिर यांच्या फुटीनंतर आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली.
-
परभणी शहरातील काही परीसरात साचले पावसाचे पाणी
परभणी शहरातील शांती निकेतन कॉलनी परीसरात पावसाचे पाणी साचले. पाण्याने बुजलेल्या खड्यात सायकल सह मुलगा पडला. मुलगा सायकल सह बुडत असल्याचे लक्षात येताच घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी मुलाचे प्राण वाचवले. रस्त्यात खड्यावरून मनपावर नागरिकांचा संताप व्यक्त केला. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
-
विधानसभेत मोठा प्रयोग – आमदार अब्दुल सत्तार
पुढे जर राजकारण करायचं असेल तर एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत राहून करता येईल असा विश्वास आमदार खासदार नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य यांना आहे सगळ्यांचा विश्वास एकनाथ शिंदे यांच्यावर आहे.लोकसभेचे सहा खासदार हा पहिला टप्पा झाला आता विधानपरिषदेचे दुसरा टप्पा झाला आता विधानसभा आहे आता विधानसभेत सुद्धा मोठा प्रयोग होणार आहे.
-
अंधेरी RTO मध्ये ऑटो-टॅक्सी चालकांना मराठीचे धडे
मुंबईतील अंधेरी RTO मध्ये ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्याची मोहीम सुरू झाली आहे. येथे दररोज दोन सत्रांमध्ये मराठी भाषा शिकवली जात आहे – एक सकाळी आणि एक दुपारी. या उपक्रमाला ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चालक मोठ्या उत्साहाने मराठी शिकण्यासाठी पुढे येत आहेत. प्रवाशांशी संवाद साधताना भाषेचा अडसर येऊ नये, यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. मराठी शिकल्यामुळे स्थानिक प्रवाशांशी संवाद सोपा होईल, अशी प्रतिक्रिया चालकांनी दिली.
-
गोंदियातील धान उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी
गोंदियातील धान उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. लवकरच चुकारे खात्यात जमा होतील. रब्बी धान खरेदीचे चुकारे युद्धपातळीवर देण्यात येत आहे. 515 कोटींचे पैसे प्रलंबित आहेत. 77 हजारांहून अधिक शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यात येत आहे. चुकारे वितरणाला वेग आला आहे. 262 कोटींचे चुकारे अदा करण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम लवकरच मिळणार आहे. धान चुकारे प्रकरणी पणन विभाग सक्रिय झाले आहेत.
-
नागपुरात उप वर्गीकरण करण्याच्या समर्थानात मोर्चा
नागपुरात उप वर्गीकरण करण्याच्या समर्थानात मोर्चा काढण्यात आला. मातंग समाज सह वेगवेगळ्या समाजाच्या संस्थांचा सहभाग या मोर्चात होता. यशवंत स्टेडियम ते संविधान चौक पर्यंत मोर्चा आयोजित करण्यात आला होता.मोर्चात वेगवेगळे बँड पथक सुद्धा सहभागी झाले होते.
-
जळगावच्या अमळनेर तालुक्यातील जैतपीर परिसरात मुसळधार पावसामुळे शेतीचे नुकसान
जळगावच्या जैतपीर परिसरातील काही शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी शिरल्याने सुमारे ४० ते ५० बिघे शेती पाण्याखाली खाली गेली आहे. शेतामध्ये बाजरी, ज्वारी, कापूस आदी पिकांची नुकतीच लागवड करण्यात आली होती शेतात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचल्यामुळे शेताला अक्षरशा तलावाचे स्वरूप आले असूनपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीची महसूल व कृषी विभागाने तात्काळ पाहणी करून पंचनामा करावा आणि शासनाकडून योग्य ती नुकसानभरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.
-
ट्रॅक्टरवरून विद्यार्थ्यांची अनोखी मिरवण
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश देत शाळा प्रवेशोत्सव. आदिवासी आश्रम शाळेचा आगळावेगळा उपक्रम. नवीन विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत.
-
अंधेरी RTO मध्ये ऑटो-टॅक्सी चालकांना मराठीचे धडे
मुंबईतील अंधेरी RTO मध्ये ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्याची मोहीम सुरू झाली आहे. येथे दररोज दोन सत्रांमध्ये मराठी भाषा शिकवली जात आहे. एक सकाळी आणि एक दुपारी. या उपक्रमाला ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चालक मोठ्या उत्साहाने मराठी शिकण्यासाठी पुढे येत आहेत. प्रवाशांशी संवाद साधताना भाषेचा अडसर येऊ नये, यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. मराठी शिकल्यामुळे स्थानिक प्रवाशांशी संवाद सोपा होईल, अशी प्रतिक्रिया चालकांनी दिली.
-
दौंडमधील राजनंदनी कंपनीत अँटी-नार्कोटिक्स टास्क फोर्स ची धाड
दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी मधील राजनंदनी कंपनीत अँटी-नार्कोटिक्स टास्क फोर्स ची धाड. स्थानिक पोलिसांच्या मदतीने अँटी-नार्कोटिक्स टास्क फोर्सची धाड. 2 तासांपासून अधिक वेळ कारवाई सुरू आहे. अँटी-नार्कोटिक्स टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांकडून कंपनीच्या आत मध्ये कसून झडती घेतली जात आहे. ही धाड नेमकी कोणत्या मोठ्या ड्रग्ज रॅकेटच्या संशयावरून टाकण्यात आली आहे, याचा अधिकृत खुलासा अद्याप यंत्रणांकडून करण्यात आलेला नाही.
-
ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर हे पद्मश्री पुरस्कार परत करण्याच्या भूमिकेवर काय म्हणाले?
पुण्यातील लोककला संमेलनात मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अनुपस्थित. ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घेतली होती भुमिका. आता खेडकर यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलीय. अधिवेशन सुरू असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतुक मंत्री आशिष शेलार उपस्थित राहू शकले नाहीत. ते का अनुपस्थित आहेत याचे कारण संयोजकांनी मला नंतर स्पष्ट केले.“भावनेच्या भरात वक्तव्य केलं” असे स्पष्टिकरण आता रघुवीर खेडकर यांनी दिलय.
-
लातूर जिल्ह्यात अनधिकृत होर्डिंग्ज आणि बॅनर विरोधात प्रशासनाची कारवाई
लातूर जिल्ह्यात अनधिकृत होर्डिंग्ज आणि बॅनर विरोधात प्रशासनाने मोहीम हाती घेतली असून आता पर्यंत 16 एजन्सी विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन, महानगर पालिका आणि पोलिस विभाग अशी तिघांची ही संयुक्त मोहीम आहे. विना परवाना होर्डिंग्ज,बॅनर आणि पोस्टर लावणाऱ्याची संख्या वाढल्याने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
-
जळगावच्या अमळनेर तालुक्यातील जैतपीर परिसरात मुसळधार पावसामुळे शेतीचे नुकसान
जळगावच्या अमळनेर तालुक्यातील जैतपीर परिसरात मुसळधार पावसामुळे शेतीचे नुकसान झालं. जैतपीर परिसरातील काही शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी शिरल्याने सुमारे ४० ते ५० बिघे शेती पाण्याखाली गेली. शेतामध्ये बाजरी, ज्वारी, कापूस आदी पिकांची नुकतीच लागवड करण्यात आली होती. शेतात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचल्यामुळे शेताला अक्षरशा तलावाचे स्वरूप आले असून पिकांचे मोठं नुकसान झालं.
-
सचिन अहिर यांचा शिंदे सेनेकडून उपसभापतीपदासाठी अर्ज
ठाकरे सेनेचे सचिन अहिर शिंदेसेनेच्या वाटेवर आहेत. सचिन अहिर यांनी विधान परिषद उपसभापतीपदासाठी शिंदे सेनेकडून अर्ज भरला. त्यामुळे 8 दिवसांत शिंदेंकडून ठाकरेंना दुसरा धक्का बसला आहे
-
मुंबई-पुणे मिसिंग कनेक्टिंग लिंक बोगद्यात धावत्या कारवर दगड; काच फुटली, मोठी दुर्घटना टळली
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील कनेक्टिंग लिंक बोगद्यात धावत्या कारवर अचानक दगड कोसळल्याने कारची समोरील काच फुटली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मुंबईहुन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या अर्टिगा कारवर दगड पडल्याने वाहनाचे नुकसान झाले. माहिती मिळताच खंडाळा महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चालकाने कोणतीही तक्रार नोंदवली नसून, अपघातात जीवितहानी झाली नाही. मात्र यामुळे बोगद्याच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झालं आहे.
-
धुळे – जून महिना संपला तरी पाऊस नसल्याने पेरण्या रखडल्या..
धुळे जिल्ह्यात जून महिना संपला तरी पाऊस नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत. मुबलक पाणी असलेल्या शेतकऱ्यांकडून पेरण्या झाल्या असल्या तरी पाऊस नसल्याने पिके धोक्यात आली आहेत. हजार रुपयाची बियाणे, खतं घेऊन ठेवली आहेत. पण पाऊस नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट सरकारनेच काहीतरी मदत करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली .
-
ठाण्यातील वागळे पोलीस ठाण्याजवळ मोठं झाड कोसळलं, 1 जखमी
ठाण्यातील वागळे पोलीस ठाण्याजवळ रस्त्यावर भले मोठे झाड कोसळून एक व्यक्ती जखमी झाली. पार्क केलेल्या एकूण 11 वेगवेगळ्या वाहनांवरती झाड पडले. त्यावेळी कामावर चालत जाणाऱ्या एका व्यक्तीच्या अंगावरती झाड पडल्याने, त्याच्या डोक्याला व छातीला दुखापत झाली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून झाड कापून बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनचे पुनरागमन; भातशेतीला मिळणार सजीवनी..
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनने पुन्हा जोरदार धरला असून, रविवारी दुपारपासून सुरू झालेला संततधार पाऊस आजही कायम आहे.या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे त्याचप्रमाणे नदी-नाल्यांमधील पाण्याची पातळी वाढू लागली आहे. मे महिन्यात झालेल्या पावसानंतर अनेकांनी भातपेरणी केली होती. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने लावणीची कामे खोळंबली होती. सुरू झालेल्या पावसाने चिंता दूर केली असून, शेतशिवारात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
-
लासलगावात मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ…
जैन मंदिरातून सोन्या-चांदीचा लाखोंचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. देवी पद्मावतीच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरीला गेली आहे. मोबाईल दुकानातून १६ मोबाईल व रोख रक्कम चोरी झाली आहे, पंजाब नॅशनल बँकेचेही कुलूप फोडल्याची माहिती समोर येत आहे. सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले असून पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे.
-
ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्या राजकीय चाणक्यनीतीचा विजय
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पॅनल पद्धतीने झालेल्या निवडणुकीत केंद्रात आणि राज्यात सत्तेतील मित्रपक्ष असणाऱ्या भाजप आणि शिवसेनेचे शिलेदारच एकमेकांविरुद्ध लढत असल्याचे पाहायला मिळाले. अखेर या निवडणुकीत ‘परिवर्तन पॅनल’चा पराभव करत ‘सहकार पॅनल’ने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. नुकत्याच लागलेल्या निकालात भाजपचे ८ तर शिंदेसेनेचे ५ उमेदवार निवडून आले आहेत. एकूण २१ जागांसाठी झालेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत बहुमतासाठी ११ उमेदवारांची गरज होती, मात्र महायुतीचे १३ उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे शिंदे-चव्हाणांची राजकीय चाणक्यनीती यशस्वी ठरल्याचे दिसत आहे, तर दुसऱ्या बाजूला या निकालातून हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला धक्का बसला आहे.
-
पेपरफुटीप्रकरणातील आरोपींचा भाजपाशी संबंध, राऊतांचा आरोप…
पेपरफुटीप्रकरणातील आरोपींचा भाजपाशी संबंध… महाराष्ट्रात याक्षणी कायद्याचं राज्य आहे, असं वातावरण नाहीये… तर ओम राजे – निंबाळकरांचा राऊतांकडून सोंगाड्या असा उल्लेख. पक्षांकर करणाऱ्यांना मोठ्या पदावर बसवलं जातं आहे. पक्षांतर केलेल्यांना आधी का निधी दिला नाही? असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
-
नसरापूर सारख्या घटना राज्यात सातत्याने घडतात – संजय राऊत
नसरापूर सारख्या घटना राज्यात सातत्याने घडत आहेत. महाराष्ट्रात याक्षणी कायद्याचं राज्य आहे, असं वातावरण नाहीये… राज्यात कायद्याची धूळधाण सुरु आहे…. असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
-
पवनचक्कीच्या ठेकेदाराकडून अल्पभूधारक शेतकऱ्याच्या शेतात अतिक्रमण
धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील बारूळ येथील अल्पभूधारक शेतकरी सोमनाथ ठोंबरे यांच्या शेतामध्ये कुठलीही कल्पना न देता पवनचक्कीच्या ठेकेदाराकडून अतिक्रमण केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या कामामुळे शेतीचे नुकसान झाले असून, अद्याप कोणताही मोबदला मिळालेला नसल्याचा दावा शेतकऱ्याने केला आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी मागणी करूनही न्याय मिळाला नसल्याचे शेतकरी ठोंबरे यांनी सांगितले.
-
मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये साचले पाणी
मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील एपीएमसी (भाजीपाला बाजार) च्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाणी साचले आहे. प्रवेशद्वाराबाहेर पाणी साचल्यामुळे बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना मोठ्या अडचणी येत असून, अनेकांना गुडघ्यापर्यंतच्या पाण्यातून चालावे लागत आहे.मेफ्को मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावरही पाणी साचले आहे.
-
जळगाव जिल्ह्यात १०९ गावांत पाणीटंचाई; ३२ गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा
१०९ गावात ३३ टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू, ७७ खासगी विहिरींचे अधिग्रहण. जून महिना संपला तरी पावसाची मोठी तूट असल्याने अनेक गावांमधील सार्वजनिक पाणीपुरवठ्याचे स्रोत कोरडेठाक. काही तालुक्यांमध्ये अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे, पुरेसा पाऊस नसल्याने पाण्याची चिंता वाढवली. अमळनेर आणि जामनेर तालुक्यात प्रत्येकी बारा गावांमध्ये तर पारोळा तालुक्यात दोन भुसावळ तालुक्यात एका गावामध्ये पाणीटंचाई
-
भाविकांच्या ट्रॅक्टरला मालवाहू आयशरची धडक, एकाचा मृत्यू, 15 जण जखमी
पंढरपूरकडे जाणाऱ्या नातेवाईकांना सोडून घरी परतणाऱ्या भाविकांच्या ट्रॅक्टरला मध्यरात्री मालवाहू आयशरची जोरदार धडक; ट्रॅक्टरचे दोन तुकडे अपघातात एकाचा मृत्यू, दोन महिलांसह १५ जण जखमी. जखमींवर चाळीसगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू
-
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा धरणात 26 टक्के पाणीसाठा
आज १.४६८ MLD पाणी धरणातून मुंबईसाठी सोडण्यात आले. अजूनही तालुक्यात मुबलक पावसाची प्रतीक्षा. तालुक्यात आतापर्यंत पावसाची नोंद 320 मी मी पावसाची नोंद. पावसाच्या माहेरघरिच पावसाने पाठ फिरविल्याचे चित्र
-
नवी मुंबईत पावसामुळे हाहाकार, मोठी वाहतूककोंडी
सततच्या पावसामुळे जुईनगर स्टेशनजवळ मुंबईकडे जाणाऱ्या सायन-पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पाण्याने भरलेल्या रस्त्यामुळे वाहनांचा वेग मंदावला आणि अंदाजे २-३ किलोमीटरची वाहतूक कोंडी झाली.
-
अक्कलकोट तालुक्यात पारंपरिक कारहुनवी सण उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा
बादोला बु. येथे कारहुनवीनिमित्ताने बैलाची मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली. बैलांना रंगीबेरंग, घंटा, फुलांच्या माळा, आकर्षक अलंकारांनी सजवले तर बैलांच्या शिंगांना रंग देऊन पारंपरिक रूप दिले जाते. शेतकऱ्याकडून पिकांच्या समृद्धीसाठी आणि चांगल्या पावसासाठी प्रार्थना केली जाते. कारहुनवी निमित्ताने अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागात विविध ठिकाणीहून नागरिक एकत्रित येऊन सण साजरा करतात..
-
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा धरणात 26 टक्के पाणीसाठा
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा धरणात 26 टक्के पाणीसाठा आहे. आज धरणातून १.४६८ MLD पाणी मुंबईसाठी सोडण्यात आलं आहे. अजूनही मुबलक पावसाची प्रतीक्षा असून तालुक्यात आतापर्यंत 320 मीमी पावसाची नोंद झाली आहे.
-
बोरिवलीत बनावट FDA अधिकारी अटकेत
मुंबईच्या बोरिवली पोलिसांनी दोन बनावट FDA अधिकाऱ्यांना अटक केली आहे. विजय जाधव आणि स्वाती तुळसकर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघे स्वतःला FDA चे अधिकारी सांगून फॉर्च्युनर कारमधून एका हॉटेलमध्ये पोहोचले. त्यांनी हॉटेलची कागदपत्रे आणि इतर गोष्टींची तपासणी केल्यानंतर पैशांची मागणी केली. हॉटेल मालकाला संशय आल्याने त्याने पोलिसांना बोलावले. पोलिसांनी चौकशी केली असता दोघांनी बनावट आयडी कार्ड तयार करून स्वतःला FDA अधिकारी असल्याचे सांगत असल्याचे उघड झाले.
-
पहाटेपासून कल्याण-डोंबिवली परिसरात पावसाची पुन्हा हजेरी
गेल्या दोन दिवसांपासून उघडीप दिल्यानंतर आज पहाटेपासून कल्याण-डोंबिवली परिसरात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. पहाटेपासूनच कल्याण डोंबिवली परिसरात ढगाळ वातावरण राहिल्याने गारवा निर्माण झाला आहे. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळत आहे. तर रिमझिम स्वरूपात सुरू झालेल्या पावसाचा अधूनमधून जोर वाढताना दिसून येत आहे.
-
१५ वर्षांपूर्वीच्या नळजोडणी घोटाळा प्रकरणात १० पालिका कर्मचाऱ्यांसह ११ जणांची निर्दोष मुक्तता
१५ वर्षांपूर्वीच्या नळजोडणी घोटाळा प्रकरणात १० पालिका कर्मचाऱ्यांसह ११ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. डोंबिवली पश्चिमेतील ‘ह’ प्रभागातील कथित नळजोडणी घोटाळा प्रकरणाचा निकाल लागला आहे. १५ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यात कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालयाने निर्णय सुनावला आहे. पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, प्लम्बर आणि खासगी व्यक्तीवर संगनमताने नागरिकांकडून पैसे घेऊन बनावट कागदपत्रांद्वारे नळजोडण्या दिल्याचा आरोप होता. दिवंगत नगरसेवक वामन म्हात्रे यांच्या तक्रारीनंतर २०११ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. सबळ पुरावे नसल्याने १० पालिका कर्मचाऱ्यांसह ११ जणांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता झाली आहे.
-
TCS कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतरण प्रकरणी आरोपींवरील जामीन अर्जावर सुनावणी
नाशिक- TCS कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतरण प्रकरणी संशयित निदा खानसह तौसिफ अत्तार, दानिश शेख यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. यापूर्वी संशयित आरोपींचे वकील आणि सरकारी वकील यांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आज निदा खानसह इतरांच्या जामीन अर्जावर निकाल येण्याची शक्यता आहे.
-
पेट्रोल-डिझेल भरण्यावरील १९० लिटरची मर्यादा १ जुलैपासून हटणार
नाशिक- पेट्रोल-डिझेल भरण्यावरील १९० लिटरची मर्यादा १ जुलैपासून हटणार आहे. केंद्र सरकारने इंधन विक्रीवरील तात्पुरते निर्बंध मागे घेतले आहेत. १ जुलैपासून IOCL, BPCL आणि HPCLच्या सर्व पेट्रोल पंपांवर नवे नियम लागू होणार आहेत. इंधन पुरवठा सुरळीत झाल्याने निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाहनचालकांना आता पूर्वीप्रमाणे इंधन भरण्यावर १९० लिटरची मर्यादा राहणार नाही. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडून याबाबत स्पष्ट आदेश जारी करण्यात आले आहेत.
-
नाशिक महापालिकेच्या आज होणाऱ्या महासभेत ४ हजार पानांची श्वेतपत्रिका सादर होणार
नाशिक महापालिकेच्या आज होणाऱ्या महासभेत ४ हजार पानांची श्वेतपत्रिका सादर होणार आहे. २०२२ ते २०२६ या चार वर्षांतील प्रशासकीय कामकाजाचा लेखाजोखा श्वेतपत्रिकेत असणार आहे. महापौर हिमगौरी आडके यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या महासभेत श्वेतपत्रिका सादर होणार आहे. आयुक्त मनिषा खत्री यांच्या निर्देशानुसार सर्व विभागांकडून कामं, खर्च आणि आर्थिक व्यवहारांची माहिती संकलित करण्यात आली आहे. खड्डेमुक्त रस्ते, पाणीपुरवठा, अतिक्रमण हटाव, अपूर्ण विकासकामे, महापालिकेची आर्थिक स्थिती आणि सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी यांसारख्या मुद्द्यांवर महासभेत चर्चा होण्याची शक्यता आहे.
-
शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला विधानसभा उपसभापतीपद जाणार
आज सकाळी १०.३० वाजता उपसभापती पदाबाबत महत्वाचा निर्णय होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला विधानसभा उपसभापतीपद जाणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेत उपसभापती पदावरून दोन जणांमध्ये मोठी चुरस आहे. चंद्रकांत रघुवंशी आणि कृपाल तुमाने यांच्यात चढाओढ आहे. चंद्रकांत रघुवंशी हे उपसभापती व्हावेत यासाठी जिल्हातील ९ आमदारांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवण्यात आलं आहे.
राज्यातील काही भागात रविवार रात्रीपासून जोरदार पावसाची नोंद होत आहे. राज्यात विश्रांती घेतलेला मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होत आहे. राज्यात निम्म्याहून अधिक जून महिना कोरडा गेला. महिना संपत आला तरीही आतापर्यंत सरासरीपेक्षा 52 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान जुलैच्या सुरुवातीला राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यंदा जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. अनेक भागांत मोसमी पाऊस दाखल झाल्यानंतरही हवामान कोरडंच असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता जुलै महिन्यात पावसाचं प्रमाण कसं असेल, याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. 2 ते 3 जुलै दरम्यान कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यासह देश-विदेशातील, मनोरंजन, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
Published On - Jun 30,2026 8:10 AM
