Ajit Pawar: याल तर बरोबर, विरोधात शिरला तर …भाजपच्या बड्या नेत्याचा अजितदादांना थेट दम, निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला तडा?
BJP on Ajit Pawar: अजितदादा पवार आणि भाजप नेत्यांचं चांगलं वाजलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत युती न झाल्यानंतर दोन्ही पक्ष एकमेकांवर तुटून पडले आहेत. आता भाजपच्या बड्या नेत्यानं अजितदादांना थेट दम दिला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचारही मान्य करावे लागतील असा इशारा दिला आहे. त्यामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar clashes With BJP: अजितदादा यांच्या एका वाक्यानं सध्या महायुतीत आग लागली आहे. 70 हजार कोटींचा आरोप होऊन मी आरोप करणाऱ्यांसोबत सत्तेत असल्याचे वक्तव्य अजितदादांनी केले होते. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली. अजित पवार यांच्या या विधानावर अनेक भाजप नेत्यांनी तोंडसूख घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल कात्रजमध्ये कुणाला कसा घाट दाखवणारे याचे संकेत दिले. आम्हाला हलक्यात घेऊ नका असाच सूर आळवला. हा कलगीतुरा अद्याप संपलेला नाही. दादांसोबतची युती अनैसर्गिक असल्याचे सांगत आता भाजपच्या या बड्या नेत्याने तर अजितदादांच्या पक्षाला थेट इशाराच देऊन टाकला. त्यामुळे महायुतीत मोठा भूकंप येईल का, याविषयीची चर्चा रंगली आहे.
याल तर सोबत, विरोधात शिरला तर विरोधात
या वादात भाजप नेते आशिष शेलार यांनी सुद्धा उडी घेतली आहे. त्यांनी अजित पवार यांना मोठा इशारा दिला आहे. आम्ही सावरकरांचे भक्त आहोत. सावरकरी विचारांवर चालणारे आम्ही आणि आमचा पक्ष आहे.त्यामुळे अजित पवार यांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील, असे शेलार म्हणाले. याल तर तुमच्याबरोबर, न याल तर तुमच्याविना, विरोधात शिरला तर विरोधात,आम्ही आमचं काम करत राहू असा इशारा द्यायलाही शेलार विसरले नाहीत.
रसायनशास्त्र-गणितशास्त्र राजकारणात चालत नाही
यावेळी शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीवरही भाष्य केले. राजकारणात रसायनशास्त्र आणि गणीतशास्त्र चालत नाही. बहुतांशवेळेला ते वेगळं पडतं. एका घटकात दुसरा घटक टाकला आणि तो अनैसर्गिक असला तर दोन घटकातील विरोधाभास गुणधर्मात असला तर स्फोट होतो.मनसे उबाठाचा स्फोटच होईल, त्याची पावलं दिसत आहेत. त्यांच्या त्यांच्यात देखील बेबनाव आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची विचारधारा आणि माणसं वेगळी आहेत. मनसेत देखील राज ठाकरेंना मानणारी आणि अमित ठाकरेंची लोकं असं त्यांच्यात देखील तुकडे तुकडे गॅंग आहे, असे शेलार म्हणाले.
मोठ्या सभा घेऊन जमणार नाही. मग रस्त्यावर फिरावं लागेल. माझे कुटुंब माझी जबाबदारी, माझे कुटुंब माझे घर इथून रस्त्यावर तरी मुंबईकरांना ते दिसू लागले. सगळी अव्यवस्था आणि बेबनाव असे दोन्ही भावांचे पक्ष आहेत मनसेच्या सर्व पदाधिकारी यांनी राजीनामा दिला आहे.संतोष धुरी, राऊळ भाजपात आले. पाटणकर एकनाथ शिंदेकडे गेले. दोन्ही पक्ष मोडकळीस आलेले आहेत, असा टोलाही आशिष शेलार यांनी लगावला.
