Maharashtra Breaking News in Marathi : काँग्रेस पक्षाकडून 43 उमेदवारांची यादी जाहीर, कुणाला मिळालं तिकीट?

| Updated on: Mar 13, 2024 | 7:19 AM

Maharashtra Breaking News in Marathi : आज 12 मार्च 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News in Marathi : काँग्रेस पक्षाकडून 43 उमेदवारांची यादी जाहीर, कुणाला मिळालं तिकीट?

मुंबई | दि. 12 मार्च 2024 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी नंदुरबारमार्गे महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. नंदुरबारमधील सीबी मैदानावर गांधी यांची जाहीर सभा होणार आहे. शासकीय कागदपत्रांवर उमेदवाराचे नाव त्यानंतर आईचे नाव, वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव असा क्रम नोंदविण्याचे बंधनकारक करणारा निर्णय राज्य शासनाने घेतला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 2024 – 25 चा 605 कोटी 16 हजार रुपयांचा अर्थसंकल्प अधीसभेत सादर करण्यात आला. धारावीतील रहिवाशांकडून माहिती गोळा करण्यासाठी १८ मार्चपासून सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 12 Mar 2024 07:48 PM (IST)

    ठाण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी

    ठाणे | काँग्रेस नेते राहुल गांधी 16 मार्चला ठाण्यात येणार आहेत. त्यांचा भारत जोडो न्याय यात्रेचा हा दुसरा टप्पा असणार आहे. त्याआधी मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात आणि त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर ‘भारताचा ठाण्या वाघ ठाण्यात’ अशा आशयाचे बॅनर सर्वांचे लक्ष वेधत आहे. भारत जोडो न्याय यात्राचा दुसरा टप्पा पार पडत आहे. अनेक महाविकास आघाडीतील नेते या यात्रेशी जोडले जाणार आहेत. ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने विविध ठिकाणी राहुल गांधी यांची बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरकडे सर्वांचे लक्ष वेधत आहे.

  • 12 Mar 2024 07:22 PM (IST)

    नाशिकमध्ये कार्यकर्ता मेळावा, श्रीकांत शिंदेंकडून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

    नाशिक : शिवसेनेच्यावतीने नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार श्रीकांत शिंदे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सार्वजनिक बांधकाम तथा नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, सचिव भाऊसाहेब चौधरी, आमदार सुहास कांदे, प्रवक्त्या ज्योती वाघमारे आणि इतर स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

  • 12 Mar 2024 06:45 PM (IST)

    माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे चिरंजीव वैभव गेहलोत यांना उमेदवारी

    नवी दिल्ली | काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 43 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 5 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसच्या यादीत आसाम, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थान या 5 राज्य आणि दमणदीव या 1 केंद्रशासित प्रदेशातील उमेदवारांची नावं आहेत.

    काँग्रेसने राजस्थान मधून माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे चिरंजीव वैभव गेहलोत यांना उमेदवारी दिली आहे. तर आसाम मधून जोऱ्हाट मधून गौरव गोगई यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. मध्यप्रदेशमधून चिंदवाडा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथ यांना तिकीट मिळालं आहे.

  • 12 Mar 2024 06:09 PM (IST)

    पीयूष गोयल यांच्यासाठी गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कट!

    नवी दिल्ली | राज्यसभा सदस्य आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल मुंबईतून लोकसभा निवडणूक लढण्याचे निश्चित झाले आहे, सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. केंद्रीय निवडणूक समिती लवकरच करणार उमेदवारी घोषित करणार आहे. गोपाळ शेट्टी यांच्या जागेवर पीयूष गोयल यांची उमेदवारी घोषित होणार आहे. राज्यसभेतील अनेक मंत्री लोकसभा निवडणूक लढत आहे म्हणून पीयूष गोयल यांना लोकसभा उमेदवारी देण्यात येणार आहे.

  • 12 Mar 2024 05:50 PM (IST)

    भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात दाखल

    काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, आजपासून महाराष्ट्रातील नंदुरबार येथून राहुल गांधींचा न्याय यात्रा सुरू होत आहे. न्याय यात्रा पुढील 5 दिवस नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई असा प्रवास करणार आहे.

  • 12 Mar 2024 05:35 PM (IST)

    आसाममध्ये भूकंपाचा जोरदार धक्का

    आसाममध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 4.7 वर्तवण्यात आली आहे. भूकंपाचे केंद्र मेघालय असल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपामुळे जीवित किंवा वित्तहानी झाल्याची अद्याप कोणतीही माहिती नाही.

  • 12 Mar 2024 05:25 PM (IST)

    पोरबंदरमध्ये 480 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, 6 पाकिस्तानी नागरिकांना अटक

    गुजरात एटीएस, भारतीय तटरक्षक दल आणि एनसीबीच्या संयुक्त कारवाईत सहा पाकिस्तानींना मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांसह पकडण्यात आले. त्यांच्याकडून 480 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. तटरक्षक दल, एटीएस आणि एनसीबीने मिळून आतापर्यंत 3135 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत.

  • 12 Mar 2024 05:12 PM (IST)

    नाराज अनिल विज यांना शांत करण्यासाठी भाजप खासदार संजय भाटिया अंबाला कॅन्टला रवाना

    अनिल विज यांची मनधरणी करण्यासाठी कर्नालचे भाजप खासदार संजय भाटिया यांना पाठवण्यात आले आहे. हरियाणातील राजकीय गोंधळ आणि मुख्यमंत्री न झाल्याने विज नाराज असल्याचे बोलले जात आहे. अनिल विज हे त्यांच्या अंबाला कॅन्ट येथील निवासस्थानी गेले आहेत. संजय भाटिया हे संघटनेशी संबंधित असून माजी मनोहर लाल यांचे विश्वासू आहेत.

  • 12 Mar 2024 04:30 PM (IST)

    आदिवासी देशाचे खरे मालक आहेत- राहुल गांधी

    देशात फक्त 22 लोकांसाठी काम केलं जात आहे. आदिवासी देशाचे खरे मालक आहेत. आमचं सरकार आल्यास मी आपल्या जमिनी परत करेल- राहुल गांधी

  • 12 Mar 2024 04:10 PM (IST)

    आदिवासी बांधवांवर अन्याय होत असून त्यांच्या जमिनी हडपल्या जातायेत- राहुल गांधी

    आदिवासी बांधवांवर अन्याय होत असून त्यांच्या जमिनी हडपल्या जात आहेत. देशात नक्की कोणता विकास होत आहे.  मोदी सरकारमध्ये फक्त एक आदिवासी सचिव आहे. जंगल उद्योगपतींना देण्याचा घाट घातला जात आहे. देशात जातीनिहाय जनगणना व्हावी, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

  • 12 Mar 2024 03:56 PM (IST)

    आदिवासी या देशाचे खरे मालक आहेत - राहुल गांधी

    नंदुरबार : नंदुरबार येथे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत न्याय यात्रा पोहोचली आहे. राहुल गांधी यांचे सभास्थळी आगमन झाले आहे. आदिवासी परंपरेत महत्त्वाचे असलेल्या होळीचे पूजन करून त्याला राहुल गांधी यांनी वंदन केले. यावेळी सभेत बोलताना त्यांनी आदिवासी या देशाचे खरे मालक आहेत असे सांगितले.

  • 12 Mar 2024 03:55 PM (IST)

    शिवसेना शिंदे गटात गृहकलह; खासदाराविरोधात पक्षातच नाराजी

    शिर्डी : शिर्डी लोकसभा शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात पक्षातच नाराजी असल्याचं समोर आलंय. शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. गेल्या दहा वर्षात कोणतंही काम न करणारा खासदार पुन्हा नको अशी भुमिका या पदाधिकाऱ्यांनी घेतलीय.

  • 12 Mar 2024 03:46 PM (IST)

    मुंबईतील बोरिवली परिसरात भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू

    मुंबई : मुंबईतील बोरिवली परिसरात 16 मजली इमारतीच्या बांधकामादरम्यान बसवलेला बांबू बीम कोसळला. या अपघातात तीन मजुरांचा मृत्यू झाला तर एक मजूर गंभीर जखमी आहे. जखमींना कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बोरीवली पोलीस घटनास्थळी पोहोचले असून संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

  • 12 Mar 2024 03:35 PM (IST)

    महाराष्ट्रामध्ये गद्दार पैद्दा झाले, जितेंद्र आव्हाड यांची टीका

    ठाणे : यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती आहे. महाराष्ट्र काँग्रेसने आजपर्यंत कुठलेही फोडा फोडीचे राजकारण केले नाही. मात्र, काही वर्षापासून भाजपला फोडाफोडी करावी लागत आहे. तुम्हाला तुमचे उमेदवार मिळत नाही. महाराष्ट्रामध्ये गद्दार पैद्दा झाले. त्याचे नाव सूर्याजी पिसाळ. ही सूर्याजी पिसाळ यांची अवलाद जिथे जाते तिथे त्यांना काळे झेंडे दाखवले जातात अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली.

  • 12 Mar 2024 03:24 PM (IST)

    लुटण्याचं कॅाग्रेसला नाही जमलं ते भाजपने केलं, उद्धव ठाकरे यांची टीका

    यवतमाळ : भाजपने 2014 मध्ये दिलेल्या आश्वासनाचं काय झालं? शेतकऱ्यांच उत्पन्न दुप्पट करु, झालं का? हमीभाव दिलं का? कर्ज घरी येऊन मिळते का? उलट बॅंका जप्तीची नोटीस लावतात. आता सर्वोच्च न्यायालयात भाजप ज्याला मी भाडोत्री जनता पक्ष म्हणतो. निवडणुक रोखे बाबत गेलाय. निवडणुकीत रोख्यात भाजपच्या खात्यात ७००० कोटी आणि कॅाग्रेसच्या खात्यात ६०० कोटी आलेत. कॅाग्रेसने देश लुटला नाही यांनी तो 10 वर्षांत लुटला अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

  • 12 Mar 2024 03:07 PM (IST)

    राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाच्या विमानाला अपघात

    राजस्थान : राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाच्या एलसीए तेजस विमानाला अपघात झाला आहे. जैसलमेरमध्ये हा अपघात झालाय. या अपघातात सुदैवाने पायलट सुरक्षित आहेत. कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेचे हवाई दलाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली यात विमान जळून खाक झाले.

  • 12 Mar 2024 03:02 PM (IST)

    कान पकडून सांगावं की चुकलं - आमदार रवी राणा

    अमरावती : प्रकाश आंबेडकर हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी मला निवडणुकीत पाठिंबा दिला होता. मी देखील त्यांना पाठिंबा दिला होता. आम्ही अनेकदा सोबत निवडणुका लढलो आहे. प्रकाश आंबेडकर साहेबांनी नेहमी मला आशीर्वाद दिला. त्यांचा आदर आहे सन्मान आहे. प्रकाश आंबेडकर आमच्याबद्दल बोलत असतील तर त्याचा आदर करतो.. आमच्याकडून जर काही चुका झाल्या असेल त्यांनी आमचे कान पकडून आम्हाला सांगावं की चुकलं आहे, असे आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे.

  • 12 Mar 2024 01:58 PM (IST)

    सहकारी कारखान्यांना एनसीडीसी मार्फत थकहमी कर्ज देणे प्रकरण, मंत्रालयात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या दालनात पार पडली बैठक

    सहकारी कारखान्यांना एनसीडीसी मार्फत थकहमी कर्ज देणे प्रकरण,  मंत्रालयात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या दालनात विविध कारखान्यांचा चेअरमन सोबत बैठक पार पडली .

    सहकार विभागाकडून कोणत्या कारखान्यांना थकहमी कर्ज उपलब्ध करुन द्यायचे याची यादी तयार.

    एकूण 21 कारखान्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारचे प्रयत्न

    नुकतेच भाजपवासी झालेले औसाचे माजी आमदार बसवराज पाटील यांच्या विठ्ठल साई सहकारी साखरकारखान्याला कर्ज मिळण्याची शक्यता.

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अशोक पवार यांच्या कारखान्याला देखील कर्ज मिळण्याची शक्यता.

    मात्र भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्याला थकहमी करून मिळणार का याकडे राजकीय वर्तुळचे लक्ष लागले आहे.

  • 12 Mar 2024 01:50 PM (IST)

    यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी अजित दादा गट व शिवसेना शिंदे गटाने केले अभिवादन...

    यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करून राष्ट्रवादी अजित दादा गट व शिवसेना शिंदे गटाने अभिवादन केले .  दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन.

    राष्ट्रवादी दादा गटाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे व शिवसेना शिंदे गटाचे संजय भोईर देवराम भोईर यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन...

  • 12 Mar 2024 01:40 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवतारे यांना समज देतील - संजय शिरसाट

    शिवतारे यांच्या वक्तव्याचा फार विपर्यास करण्याची गरज नाही.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवतारे यांना समज देतील, त्यांना वर्षावर या दोन दिवसांत बोलावून घेतलं जाईल अशी माझी माहिती आहे... संजय शिरसाट

    परांजपे यांनी धमक्या देणं बंद करावं , युती धर्माचं पालन करावं, त्यांनी पालन केलं नाही तर मग आम्ही धमक्या देऊ का ? आम्हालाही येतात.. पण युतीचा धर्म सगळ्यांनी पाळला पाहीजे , काल तुमचेच प्रवक्ते अमोल मिटकरी हे शिवतारेंना नालायक म्हणाले .. ही कोणती संस्कृती आहे ?

  • 12 Mar 2024 01:25 PM (IST)

    पुढील २-३ दिवसांत भूमिका स्पष्ट करणार - वसंत मोरे

    साहेब मला माफ करा.. अखेरचा जय महाराष्ट्र असं म्हणत वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडली.

    काम करताना पक्षांतर्गत अडचणी येत होत्या. पुढील २-३ दिवसांत भूमिका स्पष्ट करणार, असे वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं.

  • 12 Mar 2024 01:22 PM (IST)

    वसंत मोरेची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी  

    सकाळी फेसबूक पोस्ट करून मनातील खदखद व्यक्त केल्यानंतर दुपारी वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे.

  • 12 Mar 2024 01:05 PM (IST)

    राहुल गांधी 16 मार्च रोजी ठाण्यात येणार

    काँग्रेस नेते राहुल गांधी 16 मार्च रोजी ठाण्यात येणार आहे. त्यांच्या आगमनापूर्वी भारताचा ढाण्या वाघ ठाण्यात अशा आशयाचे बॅनर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात, लागले असून सर्वांचे लक्ष वेधले आहे.

    ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध ठिकाणी राहुल गांधी यांची बॅनरबाजी करण्यात आली आहे..

  • 12 Mar 2024 12:50 PM (IST)

    मी उपोषण करताना काय बोललो माहीत नाही, पण दिलगिरी व्यक्त केली- मनोज जरांगे

    "मी उपोषण करताना काय बोललो माहीत नाही. पण दिलगिरी व्यक्त केली होती. उपोषण सोपी गोष्ट नाही. आठ दिवस माझ्यासोबत बसा, तुमची ढेरी कमी होईल, वजन कमी होईल. मी आई बहिणीवर बोललो तेव्हा तुम्हाला इतकं लागलं. अर्थसंकल्प अधिवेशनात माझी चर्चा झाली आणि एसआयटी नेमली गेली. सग्यासोयऱ्याची चर्चा नाही केली," असं मनोज जरांगे म्हणाले.

  • 12 Mar 2024 12:40 PM (IST)

    हरियाणातील नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी संध्याकाळी पाच वाजता होणार

    हरियाणातील नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी संध्याकाळी पाच वाजता होणार आहे. मनोहरलाल खट्टर यांनी राजीनामा दिल्यानंतर हरियाणामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.

  • 12 Mar 2024 12:27 PM (IST)

    मराठा समाजाची ही लढाई अंतिम- मनोज जरांगे पाटील

    "मराठा समाजाची ही लढाई अंतिम आहे. मराठ्यांनी संघर्ष केला म्हणून नोंदी सापडल्या आहेत. ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना आरक्षण देण्यासाठी सगेसोयरे विषयावर चर्चा झाली. ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत, त्यानुसार त्यांच्या सग्यासोयऱ्यांना आरक्षण द्यायचं ठरलं आहे", असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

  • 12 Mar 2024 12:10 PM (IST)

    मावळ खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून 'विकास पर्व' पुस्तिका वाटून प्रचाराला सुरुवात

    लोणावळ्यात मावळ खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून 'विकास पर्व' पुस्तिका वाटून प्रचाराला सुरुवात झाली आहे. लोणावळा रेल्वे स्थानकावर खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारच्या कार्यक्रमात 'विकास पर्व' नावाच्या पुस्तिका वाटून आपल्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. श्रीरंग बारणे हे सध्या शिंदे गटात आहेत. श्रीरंग बारणे यांनी आत्तापर्यंत 2014 आणि 2019 च्या मावळ लोकसभेवर दोन वेळा विजय मिळविला असून ते शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार असून आत्ता हॅटट्रिक करण्याच्या तयारीत आहेत. परंतु महायुतीमध्ये बारणे यांना विरोध होऊ लागला आहे.

  • 12 Mar 2024 11:55 AM (IST)

    Live Update | भोरच्या शेतकरी मेळाव्यानंतर आता शरद पवारांचा आता मोर्चा पुणे जिल्ह्यातील इंदापूरात..

    उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ज्या ठिकाणी घेतला शेतकरी मेळावा,त्याच ठिकाणी 23 मार्चला शरद पवार घेणार भव्य शेतकरी मेळावा... या मेळाव्याला शिवसेना नेते संजय राऊत,काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे,आमदार संजय जगताप राहणार उपस्थित... या मेळाव्यात शरद पवार यांच्या विरोधात असणाऱ्या माजी मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर तोफ डागणार का ? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष...

  • 12 Mar 2024 11:40 AM (IST)

    Live Update | टिकेनंतर विजय शिवतारे यांना महायुतीच्या वरिष्ठांकडून सूचना

    कालच्या टिकेनंतर विजय शिवतारे यांना महायुतीच्या वरिष्ठांकडून सूचना... महायुतीत असल्यामुळे वादग्रस्त वक्तव्य टाळा... माजी मंत्री विजय शिवतारे यांना देण्यात आल्या सूचना... विजय शिवतारे यांनी बारामतीत दोन्ही पवारांना पाडा अशी केली होती टीका... शिवाय बारामतीत अपक्ष निवडणूक लढवण्याचे दिले होते संकेत...

  • 12 Mar 2024 11:25 AM (IST)

    Live Update | देशात सीएए कायदा लागू झाल्याबद्दल धुळ्यात भाजपाचा जल्लोष...

    शहरातील झाशी राणी पुतळा चौकात भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला जल्लोष... भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून कायदा लागू केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे करण्यात आले अभिनंदन... जल्लोषात महिला पदाधिकारी देखील झाला सहभागी..

  • 12 Mar 2024 11:08 AM (IST)

    Live Update | संजय राऊत माध्यमांसमोर खोटं बोलतात - प्रकाश आंबेडकर

    संजय राऊत माध्यमांसमोर खोटं बोलतात... जागावाटपाचा वाद मविआतल्या तिन्ही पक्षात.. जागावाटप होत नाही याचं कारण वंचित आघाडी नाही... मविआनं आधी त्यांच्यातला वाद मिटवावा हीच आमची मागणी... असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

  • 12 Mar 2024 11:00 AM (IST)

    70 वर्षे आदिवासींची आठवण नाही आली

    राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेमुळे महाराष्ट्रात कुठलाही फरक जाणवणार नसल्याचा दावा हिना गावित यांनी केला.आदिवासींसाठी भारत जोडो यात्रा काढत आहेत मात्र ७० वर्ष देशात काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस का आदिवासी ची आठवण आली नाही, असा टोला ही त्यांनी लगावला.

  • 12 Mar 2024 10:50 AM (IST)

    एकता मॉलचे लोकार्पण

    गुजरात आणि महाराष्ट्र मध्ये एकता मॉल चे लोकार्पण करण्यात आले. लोकल फॉर वोकल मिशन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही योजना आहे. मी तरुणांना सांगेन आज जे लोकार्पण झाले हे तुमच्या भविष्य साठी आणि उज्वल भविष्यासाठी करण्यात आले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

  • 12 Mar 2024 10:40 AM (IST)

    प्रकाश आंबडेकर अमरावतीत

    अमरावतीच्या पांढरी खानमपूर गावातील प्रवेशद्वाराप्रकरणात वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर हे अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. काल अमरावतीत झालेल्या दगडफेक संदर्भात माहिती घेतील.प्रकाश आंबेडकर यांची जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांच्या सोबत बैठक होत आहे.

  • 12 Mar 2024 10:30 AM (IST)

    हा तर इतिहास घडला

    रेल्वेच्या इतिहासात एवढा मोठा कार्यक्रम कधीच झाला नसेल. 100 वर्षात पहिल्यांदा असा कार्यक्रम झाला असेल.देशातील कानाकोपऱ्यात योजनांचे लोकार्पण केलं जातं आहे. नवीन योजना सुरू करण्यात येत आहे. 2024 मध्ये 75 दिवस झाले आहेत. या दिवसात 11 लाख करोड रुपयांची परियोजनाचे लोकार्पण झाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

  • 12 Mar 2024 10:20 AM (IST)

    मोदींची ट्रेन सूसाट

    विरोधी पक्षाची रेल्वेगाडी पटरी वर नीट उभी राहत नाही आणि मोदीची ट्रेन मोठ्या वेगाने धावत असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. एक गाडी रुळावर उभी नाही तर दुसरी वेगात सुरू आहे, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

  • 12 Mar 2024 10:10 AM (IST)

    आजपासून दहा वंदे भारत धावणार

    आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. या दहा वंदे भारतसह देशात या ट्रेनची हाफ सेंच्युरी पूर्ण होईल. अर्धशतकी खेळीमुळे भारतीय रेल्वे प्रवाशांना आरामदायक आणि गतीने प्रवास करणे शक्य होणार आहे. सध्या या 40 वंदे भारत ट्रेन धावत आहेत.

  • 12 Mar 2024 10:00 AM (IST)

    सोने आणि चांदीचा ग्राहकांना दिलासा

    मार्च महिन्यातील भयावह तेजीला अखेर पहिल्यांदा ब्रेक लागला. गेल्या 10 दिवसांपासून सोन्यापाठापाठ चांदीने पण रेकॉर्ड ब्रेक केले. किंमती एकदम भडकल्या. सोन्याने 66,000 चा टप्पा ओलांडला. तर चांदीने पण 75 हजारांचा टप्पा ओलांडला. या दरवाढीला ब्रेक लागला आहे.

  • 12 Mar 2024 09:57 AM (IST)

    आंध्र प्रदेशात टीडीपी आणि भाजपचं जागावाटप जाहीर

    आंध्र प्रदेशातील सत्ताधारी तेलगू देसम पक्ष (टीडीपी) आणि भाजप यांच्यातील जागावाटप जाहीर झालं आहे.  भाजप लोकसभेच्या सहा आणि विधानसभेच्या १० जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर TDP लोकसभेच्या 17 आणि विधानसभेच्या 144 राज्यांच्या जागांवर निवडणूक लढवणार आहेत.  पवन कल्याण यांची जनसेना लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या २१ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी ही घोषणा केली आहे. आंध्र प्रदेशात लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्र निवडणुका होणार आहेत.

  • 12 Mar 2024 09:45 AM (IST)

    प्रणिती शिंदे यांच्या गाव भेटीला मराठा बांधवांचा विरोध

    मंगळवेढा पाठोपाठ मोहोळ तालुक्यात आमदार प्रणिती शिंदे यांच्या गाव भेटीला मराठा बांधवांचा विरोध पाहायला मिळाला. आमदार प्रणिती शिंदे यांनी मराठा आंदोलक आल्यानंतर दिल्या एक मराठा एक लाखच्या घोषणा देण्यात आल्या.  मोहोळ तालुक्यात आमदार प्रणिती शिंदे यांच्या गाव भेटी दरम्यान मराठा बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  आमदार प्रणिती शिंदे यांनी घोषणा देऊन आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मराठा समाजाला सगेसोयरेचा कायदा आरक्षण देण्याची मराठा बांधवांनी मागणी केली. आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडून मराठा बांधवांना समजवण्याचा प्रयत्न केला.

  • 12 Mar 2024 09:30 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला...  लोकार्पण या ठिकाणी होत आहे.  भारतीय रेल ही दुनियामध्ये एक आश्चर्य मानलं जातं.  विरोधी पक्षाची गाडी पटरीवर नीट उभी राहत नाही आणि मोदींची गाडी मोठ्या स्पीडने चालते, असं शिंदे म्हणाले.

  • 12 Mar 2024 09:16 AM (IST)

    राहुल गांधी 13 मार्चला धुळ्यात

    13 मार्च रोजी राहुल गांधी धुळ्यात येणार आहेत.  राहुल गांधी यांच्या आगमनानिमित्त मेळाव्याची तयारी करण्यात आली आहे.  भारत जोडो न्याय यात्रा शहरात येणार आहे.  मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल महिला न्याय परिषद होणार आहे. या महिला न्याय परिषदेला राहुल गांधी संबोधित करणार आहेत.  या मेळाव्यालाधुळे, जळगाव, नंदुरबार येथून मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहणार आहेत.

  • 12 Mar 2024 08:55 AM (IST)

    Maharashtra News | निलेश लंके शरद पवार गटात जाणार या चर्चेत तथ्य नाही

    निलेश लंके शरद पवार गटात जाणार नाहीत. या चर्चेत तथ्य नाही. सीटिंग जागा ज्याच्या त्याला सोडायच्या ही प्राथमिक चर्चा झाली आहे. तिन्ही पक्षांचा मान सन्मान राखला जाईल असं जागा वाटप होईल असं अजित पवार म्हणाले.

  • 12 Mar 2024 08:44 AM (IST)

    National News | भाजप आणि महायुतीची बोलणी जवळपास 80 टक्के निष्कर्षापर्यंत

    भाजप आणि महायुतीची बोलणी जवळपास 80 टक्के निष्कर्षापर्यंत पोहोचली आहेत. भाजप गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा लढवणार आहे. युतीबाबत निर्णय आणि येत्या 3 ते 4 दिवसांत भाजपच्या वरिष्ठांशी बैठक. भाजपच्या विद्यमान खासदारांच्या यादीत फारसे बदल केले जाणार नाहीत. आघाडीतील पक्षांकडून करण्यात येत असलेल्या मागणीवर योग्य पद्धतीने कार्यवाही केली जाईल. अजित पवार गटातील पक्षांची मागणी अवाजवी नाही. भाजप सूत्रांची माहिती.

  • 12 Mar 2024 08:22 AM (IST)

    Maharashtra News | गणपत गायकवाड यांच्या पत्नीची राजकारणात एन्ट्री

    कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा यांनी राजकारणात एन्ट्री घेतली आहे. त्यांची राजकीय व्यासपीठावरील उपस्थिती चर्चेचा विषय ठरली असून त्या आमदारकीची निवडणूक लढविणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

  • 12 Mar 2024 08:10 AM (IST)

    Maharashtra News | मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत

    मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत. लांब पल्ल्याच्या गाडी व तांत्रिक अडचणीमुळे कल्याणपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या सर्वच लोकल गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावात आहेत. पहाटे रेल्वे विस्कळीत झाल्याने कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल.

  • 12 Mar 2024 07:57 AM (IST)

    Marathi News | पाणीचोरांवर गुन्हे दाखल होणार

    ठाणे शहरात २०२३-२४ या अर्थिक वर्षात पाणी देयकांच्या वसुलीत मोठी घट झाल्याने पालिका प्रशासनाने नव्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून या महिन्यात थकबाकीदारांसह पाणीचोरांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये चोरून घेतलेल्या नळजोडण्या खंडीत करण्याबरोबरच अशा पाणी चोरांविरोधात गुन्हे दाखल करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली.

  • 12 Mar 2024 07:45 AM (IST)

    Marathi News | तृतीयपंथींसाठी आवाज बदलण्याची सुविधा

    मुंबईतील जी.टी. रुग्णालयामध्ये तृतीयपंथी रुग्णांकरीता स्वतंत्र कक्ष तयार करणात आला होता. त्या कक्षामार्फत उपचाराबरोबरच विविध सेवासुविधाही देण्यात येत असून आता जी.टी. रुग्णालयात तृतीयपंथी व्यक्तींसाठी (ट्रान्सजेंडर) आवाज बदलण्याची शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

  • 12 Mar 2024 07:28 AM (IST)

    Marathi News | बच्चू कडू यांच्यासाठी सरकारचा अध्यादेश

    महायुती सरकारचा घटक पक्ष असलेल्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचे अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेतीत अध्यक्षपद वाचविण्यासाठी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहकार कायद्यातील सुधारणेचे विधेयक संमत करून घेण्यात अपयश आले. आता सरकारने अध्यादेश काढून कडू यांच्याविरोधात दोन वर्ष अविश्वास ठराव आणता येणार नाही, अशी तरतूद केली आहे.

  • 12 Mar 2024 07:20 AM (IST)

    Marathi News | धारावीत सोमवारपासून झोपड्यांचे सर्वेक्षण

    धारावी पुनर्विकास प्रकल्प राज्य सरकारने अदानीच्या घशात घातल्यानंतर आता धारावीत सर्वेक्षणाच्या हालचालींना वेग आला आहे. धारावीतील रहिवाशांकडून माहिती गोळा करण्यासाठी १८ मार्चपासून सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे. माटुंगा पूर्व रेल्वेलगतच्या भागातील कमला रमण नगर येथून सर्वेक्षणाला सुरुवात होईल, अशी माहिती धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडतर्फे सोमवारी देण्यात आली आहे.

Published On - Mar 12,2024 7:19 AM

Follow us
दादांना शून्य जागा, सुनेत्रा पवार हरणार? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा काय
दादांना शून्य जागा, सुनेत्रा पवार हरणार? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा काय.
अंधारेंचा पलटवार, व्हिडीओचा सपाटा लावत राज ठाकरेंच्या भूमिकेची चिरफाड
अंधारेंचा पलटवार, व्हिडीओचा सपाटा लावत राज ठाकरेंच्या भूमिकेची चिरफाड.
'मविआ'ला 35 जागा तर 'इंडिया'ला बहुमत, शरद पवारांनंतर बाबांचा मोठा दावा
'मविआ'ला 35 जागा तर 'इंडिया'ला बहुमत, शरद पवारांनंतर बाबांचा मोठा दावा.
14 जीव गेलं पण अनधिकृत होर्डिंग लावणारा भावेश भिंडे कुठं लपला?
14 जीव गेलं पण अनधिकृत होर्डिंग लावणारा भावेश भिंडे कुठं लपला?.
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.