Maharashtra Breaking News LIVE : …तोपर्यंत अजित पवार यांनी राजीनामा द्यावा – एकनाथ खडसे
Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

मनसेचे प्रमुख राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाखा अध्यक्षांची घेणार बैठक. पुण्यातील शहर कार्यालयाच्या शेजारील हॉलमध्ये घेणार बैठक. पुण्यातील सर्व शाखाध्यक्षांनी बैठकीला हजर राहण्याचे राज ठाकरेंचे आदेश. महापालिकेतील निवडणुकीच्या कामासाठी नेमलेले अधिकारी आणि कर्मचारी अचानक सुट्टीवर जात असल्याने कामामध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे निवडणुकीच्या कामाची जबाबदारी असणाऱ्यांना निवडणूक शाखेची परवानगी घेतल्याशिवाय रजा टाकू नये अन्यथा कारवाई केली जाईल, असे आदेश जारी करण्यात आले आहेत. पुणे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. राज्यातील वाढत्या बांधकाम क्रियाकलापांमुळे निर्माण होणाऱ्या हवेच्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) मोठे पाऊल उचलले आहे. आतापर्यंत फक्त मुंबई महानगर प्रदेशापुरती लागू असलेली रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांसाठीची अट आणि प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वे आता संपूर्ण राज्यभर लागू करण्यात आली आहेत. सध्या हवेतील प्रदूषणाचं प्रमाण वाढलं आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
जरांगे प्रकरणात पंकजा मुंडे यांची जालना अधिक्षकांशी चर्चा
मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचल्याची माहिती समोर आल्यानंतर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्यासोबत फोनवरून चर्चा केले आहे आणि जरांगे पाटलांच्या सुरक्षेची काळजी घ्या आणि त्यासंदर्भात जी काही सुरक्षा पुरवायची आहे ती पुरवा असे देखील पोलीस अधीक्षकांना सांगितलेलं आहे
-
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका ठाणे रेल्वे स्थानकाला देखील बसला आहे. मध्य रेल्वेची अप आणि डाऊन दोन्ही मार्गाची वाहतूक २५ मिनिटे उशीराने होत आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
-
-
…तोपर्यंत अजित पवार यांनी राजीनामा द्यावा – एकनाथ खडसे
मला भोसरी प्रकरणात नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा लागला. भोसरीची जमीन माझ्या परिवाराने खरेदी केली होती. अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी देखील जमिन खरेदी केली. त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत अजित पवार यांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
-
कल्पिता पिंपळे यांची संभाजीनगर पालिकेत बढती
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या कर्तव्यनिष्ठ उपायुक्त कल्पिता पिंपळे यांची पदोन्नती झाली आहे.कर्तव्य बजावत असताना झालेल्या हल्ल्यात त्यांनी दोन बोटं गमावली लागली होती, पण त्यांनी काम थांबवलं नाही. २०२२ पासून त्या मिरा-भाईंदरमध्ये उपायुक्त पदावर कार्यरत होत्या.शासनाच्या आदेशानुसार त्यांची अतिरिक्त आयुक्त म्हणून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत बढती झाली आहे.
-
जीआर रद्द करा, मत्स्य व्यवसाय संघटनेची मागणी
मत्स्य व्यवसाय संघटनेकडून 12 मे 2023 रोजी राज्य सरकारने काढलेला जीआर रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. 2019 मध्ये निघालेल्या जीआरनुसार एक तलाव एक संस्था अशी नियमावली होती. मात्र आता 2023 मध्ये निघालेल्या जीआर मध्ये बदल करून आता स्थानिकांचा समावेश करून 50 हेक्टरवर एक संस्था अशी तरतूद करण्यात आली आहे.
-
-
धाराशिव: जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांची थट्टा
धाराशिव जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांची थट्टा करण्यात येत आहे. अनुदानाच्या रकमेतून दोन हजार रुपये खात्यावर ठेवण्याची सक्ती करण्यात आली आहे. तुळजापूर तालुक्यातील काठी गावात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत हा प्रकार घडला आहे.
-
अकोला: वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांवरील आक्षेपार्ह पोस्टमूळे अकोल्यात वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले असून आरोपीला अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी मोठया संख्येने वंचित चे कार्यकर्ते उपस्तित होते.
-
माझा या प्रकरणाशी दुरान्वये देखील संबंध नाही – अजित पवार
पार्थ पवारांवर होणाऱ्या आरोपांवर बोलताना अजित पवारांनी म्हटले की, ‘माझा या प्रकरणाशी दुरान्वये देखील संबंध नाही. अशा चुकीच्या गोष्टी कोणीही करू नये अशा सूचना दिल्या होत्या. आता काही बातम्या येत आहेत. याची सगळी माहिती घेतो आणि नंतर बोलेल. मी आजपर्यंत कधीही नातेवाईकांना फायदा व्हावा यासाठी एकही अधिकाऱ्याला फोन केला नाही. माझ्या नावाचा वापर करून कोणी चुकीच काही करत असेल तर माझा पाठिंबा नसेल.’
-
अजित पवार यांना भस्म्या नावाचा आजार झालाय, सपकाळ यांची टीका
अजित पवार यांना भस्म्या नावाचा आजार झाला आहे, भस्म या नावाचा आजार झाल्यावर किती खाल्लं तरी अधिक खावच वाटते, पहिलंच एवढं खाल्लेल आहे, की अजून किती खाणार, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे, असा टोला हर्षवर्धन सपकाळ यांनी अजित पवार यांना लगावला आहे, ते पार्थ पवार यांच्यावर झालेल्या जमीन घोटाळ्याचा आरोपांवर प्रतिक्रिया देताना बोलत होते.
-
पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप, खडसेंकडून अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी
पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप
एकनाथ खडसेंकडून अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी
राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे शक्य नाही – खडसे
भोसरी प्रकरणात आरोप झाल्यावर मी राजीनामा दिला होता – एकनाथ खडसे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नैतिकता असेल तर राजीनामा द्यावा – खडसे
-
बिबट्याच्या हल्ल्यातून विद्यार्थी थोडक्यात बचावला
जुन्नर तालुक्यातल्या राजुरी या गावातील धनेश बाळू औटी हा विद्यार्थी बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला आहे. शाळेतून घरी जाताना धनेशच्या सोबत कुत्रे चालले होते. अडचणीच्या ठिकाणाहून जात असताना शेजारच्या शेतातून बिबट्याने अचानक कुत्र्यावर झेप घेतली. हे पाहून बचावासाठी धनेशने तेथून पळ काढला. बाजूला काम करणाऱ्या लोकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने आपली शिकार सोडून पळ काढला.
-
उद्धव ठाकरेंचा नांदेड दौरा, पारडीमध्ये शेतकऱ्यांशी साधणार संवाद
उद्धव ठाकरे नांदेडच्या लोहा तालुक्यातील पारडी गावात दाखल
पारडी येथील शेतकऱ्यांशी साधणार उद्धव ठाकरे संवाद
अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचा शेतकरी संवाद दौरा
अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची ही उपस्थिती
-
खूप मोठ्या व्यक्तीने कट रचला आहे, जरांगे पाटलांचा आरोप
कट रचणाऱ्याने खूप मोठी चूक केली आहे. खूप मोठ्या व्यक्तीने हा कट रचल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. शत्रूच्या छावण्या कशा उधळायच्या हे आम्हाला माहिती आहे, असंही त्यांनी सांगितलं. या प्रकरणात पोलीस अधीक्षक स्वत: लक्ष घालून आहेत. इतकंच काय चुकीच्या ठिकाणी हात घातल्याचा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.
-
नितीश कुमार यांचं रिमोट कंट्रोल पंतप्रधान मोदींच्या हातात आहे: राहुल
बिहारमधील पूर्णिया येथे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, बिहारने पुन्हा एकदा प्रगती केली पाहिजे. जगातील सर्वोत्तम महाविद्यालये आणि विद्यापीठे येथे बांधली पाहिजेत. सर्वोत्तम रुग्णालये बांधली पाहिजेत. बिहार हे जागतिक पर्यटन केंद्र, अन्न प्रक्रिया केंद्र आणि उद्योगाचे केंद्र बनले पाहिजे. हे नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या शक्तीपलीकडे आहे. नितीश कुमार काहीही करू शकत नाहीत, त्यांचा रिमोट कंट्रोल पंतप्रधान मोदींच्या हातात आहे.
-
वसईत सामाजिक कार्यकर्त्याच्या घरावर गोळीबार झाल्याचा संशय, पोलिसांचा मात्र नकार
वसईच्या पापडी येथील सामाजिक कार्यकर्ते सलमान उर्फ बाबू मिसाळ यांच्या घरावर गोळीबार झाला असल्याचा दावा करण्यात आला आहे. वसई पश्चिमेच्या पापडी गावात जामा मशिदीजवळ सामाजिक कार्यकर्ते सलमान उर्फ बाबू मिसाळ आपल्या संयुक्त कुटुंबासह राहतात. बुधवारी रात्री 10 च्या सुमारास अज्ञात व्यक्तीने गोळीबार करून फरार झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नसून, घराच्या काचेवर एक छिद्र पडल्याने हा गोळीबार असल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे. वसई पोलीस, फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावर भेट देऊन, याचा सविस्तर तपास सुरू केला आहे. मात्र हा गोळीबार नसून इतर कोणत्या तरी वस्तूने काचेवर मारले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
-
अनिल अंबानींना ईडीने समन्स बजावले
अनिल अंबानी यांना ईडीने समन्स बजावले आहे. तसेच 14 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील ईडी मुख्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
-
भाजप कार्यकर्त्याने दिल्ली आणि नंतर बिहारमध्ये मतदान केले, ‘आप’चा गंभीर आरोप
आम आदमी पक्षाने आरोप केला की, एसआयआर असूनही एका तरुणाने यापूर्वी दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदान केले होते. आता, त्याने आज बिहार निवडणुकीतही मतदान केले आहे. आज बिहारमध्ये मतदान करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांमधून आलेले किती भाजप कार्यकर्ते आहेत? असा प्रश्नही उपस्थित केला.
-
पुण्यातील पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण जास्तच तहसीलदारावर कारवाई
पुण्यातील पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण जास्तच तहसीलदारावर कारवाई करण्यात आली आहे. पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे.
-
कर्जमाफी होत नाही तोवर आम्ही तुमच्यासोबत राहणार; उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना आश्वासन
उद्धव ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. ते आता लातूरच्या भूसणी गावात असून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजवर निशाणा साधत शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलं आहे. “कर्जमाफी होत नाही तोवर आम्ही तुमच्यासोबत राहणार” असा विश्वास उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिला आहे.
-
उद्धव ठाकरे लातूरच्या भूसणी गावात, पूरग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
उद्धव ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. ते आता लातूरच्या भूसणी गावात असून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारवर तोफ डागली. “लोकशाही मार्गाने नाही तर मतचोरी करून सरकार आलं आहे. मतदार यादीतील घोळ दाखवला तर भाजपवाले मध्ये धर्म आणतात” असं म्हणत त्यांनी भाजपावर निशाणा साधला.
-
जरांगेंना मारण्यासाठी कट रचल्याची कार्यकर्त्याकडून पोलिसांत तक्रार
जरांगेंना जीवे मारण्याची धमकी आणि मारण्यासाठी कट रचल्याची एका कार्यकर्त्याकडून तक्रार करण्यात आली आहे आहे. बीड कार्यकर्त्याकडून जालना पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.
-
मिरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीची रंगत वाढली
मिरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीची रंगत वाढली ११ नोव्हेंबरला प्रभाग आरक्षण सोडत, इच्छुक उमेदवारांची धाकधूक शिगेला पोहचली आहे. मिरा-भाईंदर महापालिकेच्या आगामी काळात निवडणुका पार पडणार आहेत. त्या अनुषंगाने पुढील आठवड्यात ११ नोव्हेंबरला प्रभाग आरक्षण सोडती कार्यक्रम पार पडणार आहे. त्यामुळे आरक्षण सोडतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे
-
वाहन तोडफोड प्रकरणात तिघांना अटक
नाशिकच्या शरणपूर रोडवरील गाड्यांची तोडफोड आणि गोळीबार प्रकरणातील टोळी दोन दिवसांत गजाआड झाले. पोलिसांच्या अचूक कारवाईत तीन मुख्य आरोपींना अटक केली. न्यायालयात हजर करताना आरोपींच्या ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ अशा घोषणा दिल्या. उर्वरित संशयित आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
-
मनोज जरांगेंना जीवे मारण्याचा प्रयत्न, जालन्यात तक्रार
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट केल्याची तक्रार जालना पोलिसांकडे करण्यात आली आहे. बीड येथील कार्यकर्त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत तपास सुरू केला आहे. दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
-
शासनाची जागा पार्थ पवार यांच्या कंपनीने घेतली कशी? -विजय कुंभार
हा व्यवहार अजित पवारांच्या दबावाखाली झाला आहे? याची चौकशी झाली पाहिजे.कोरेगाव परिसरातील मुंढवातील जागा आहे. प्रतिष्ठित आणि मोक्याची जागा आहे.इथली 40 एकर जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने घेतली.जिल्हाधिकारी यांच म्हणणं आहे की ती जागा शासनाची आहे. मग, ती जागा शासनाची आहे तर पार्थ पवार यांच्या कंपनीने घेतली कशी? असा सवाल विजय कुंभार यांनी केला.
-
लाडक्या बहिणीच्या पैशामुळे घरात नवरा बायकोचा घटस्फोट होण्याची वेळ
उद्धव ठाकरे यांच्या करजखेडा येथील संवाद दौऱ्यानंतर महिला शेतकऱ्यांशी बातचीत केली. त्यावेळी या सरकारने फसवे पॅकेज जाहीर केले आहे. आम्हाला तुमच्या मदतीची गरज नाही फक्त आमच्या मालाला हमीभाव द्या. आम्हाला तुमची भीक नकोय हक्काचा भाव हवाय. लाडक्या बहिणीच्या पैशामुळे घरात नवरा बायकोचा घटस्फोट होण्याची वेळ आली असा आरोप महिलांनी केला. हिम्मत असेल तर सरकारने खात्यात रक्कम जमा करून येथे येऊन दाखववावे असे आवाहन महिलांनी केले.
-
ही खोटी, निर्दयी माणसं
यावेळी उद्धव ठाकरे यांनी अजित दादांची क्लिप ऐकवली. 31 तारखेच्या आत मध्ये पीक कर्जाचे पैसे भरा अजित पवारांची क्लिप ऐकवली. ही खोटी निर्दयी माणसं यांना पाझर फुटणार नाही. आता जूनचा मुहूर्त काढला आहे. जोपर्यंत कर्ज माफ होत नाही तोपर्यंत महायुतीला मत नाहीय हेक्टरी 50 हजार पिक विमा मिळत नाही तोपर्यंत महायुती ला मत नाही असा निर्धार करा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी शेतकऱ्यांना केले.
-
शेतकरी तुमच्यावर का चिडला?
मला म्हणतात उद्धव ठाकरेंनी आता घर सोडले यांनी स्वतःच्या घराकडे लक्ष द्यावे.दिल्लीत यांना मुजरा करावा लागतो. होय मी घरी बसून माझा महाराष्ट्र वाचवला. मी घरी बसून कर्जमुक्ती केली. तुम्ही फिरून सुद्धा शेतकरी तुमच्याविरुद्ध चिडला आहे. तुम्हाला का शिव्या घालत आहे, असा सवाल त्यांनी केला. हे बाजार बुणगे तुम्हाला सुख देणार नाही. आनंदाचा शिधा, शिव भोजन बंद आणि यांची दुकान चालू आहे. जे मी बोललो ते करून दाखवतो असा टोला त्यांनी फडणवीस आणि अजितादादांना लगावला.
-
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मुलावर आरोप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया समोर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर अंबादास दानवे यांनी जमीन घोटाळ्याचे आरोप केले आहेत. त्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
उपमुख्यमंत्रीही असा कोणताही प्रकार पाठिशी घालणार नाहीत. यासंदर्भात आमच्या सरकारचं एकमत आहे, कुठेही अनियमितता झाली असेल तर त्यावर कारवाई झाली पाहिजे. यासंदर्भात योग्य ती पडताळणी केली जाईल. अनियमितता असेल तर त्यावर कडक कारवाई केलीच जाईल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
उद्धव ठाकरेंनी साधला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असून ते शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. मी शेतकऱ्यांसाठी मागणी करतोय यात टोमणे कुठे आले, असा सवाल त्यांनी विचारला. लाडक्या बहिणींना आश्वासनाप्रमाणे 2100 रुपये द्या अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
-
रोहा नगरपरिषदेची निवडणूक – तटकरे विरुद्ध शिंदे गटात चुरशीची लढत
रायगड जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, रोहा नगरपरिषदेचाही त्यात समावेश आहे. रोहा ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला मानली जाते. मात्र, यावेळी शिवसेना शिंदे गटाने रोहा शहरात मोठ्या प्रमाणावर शिरकाव केला असून, आमदार महेंद्र दळवी आणि मंत्री भरत गोगावले वारंवार पक्षप्रवेश कार्यक्रमांच्या माध्यमातून ताकद दाखवत आहेत. तटकरे यांच्या विरोधात टीकेची झोड उठवत आहेत. त्यामुळे यावेळीची निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हं आहेत.
-
परभणीत शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन, रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाविरोधात तीव्र संताप
सार्वजनिक रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे परभणी तालुक्यातील सावंगी येथील ग्रामस्थांनी थेट जलसमाधी आंदोलन केले आहे. ‘रस्ता द्या, नाहीतर जीव द्या’ असा निर्वाणीचा इशारा देत शेतीत जाण्याच्या रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाविरोधात ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. गावकरी पाण्यात उतरल्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. आता तहसीलदार या गंभीर प्रकरणावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
सातारा प्रतापगडावरील भवानी माता मंदिरात पार पडला दीपोत्सव
साताऱ्यातील किल्ले प्रतापगडावरील भवानी माता मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त विशेष पूजा, आरती आणि दीपदान आयोजित करण्यात आले होते. यावेळी मंदिरात आकर्षक अशी हजारो दिव्यांची आरास करण्यात आली. या दीपोत्सवामुळे हजारो दिव्यांच्या प्रकाशाने संपूर्ण मंदिर उजळून निघाले होते. श्री भवानी देवी संस्थान आणि सेवेकरी ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
-
कल्याण-शीळ प्रवाशांसाठी मोठी बातमी, उद्यापासून तीन दिवस रस्ता बंद
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरवरील डबल डेकर कंटेनर माल वाहतुकीसाठी निळजे रेल्वे उड्डाणपुलाची पुनर्बाधणी केली जाणार आहे. रेल्वेच्या या कामासाठी शुक्रवार, ७ नोव्हेंबरपासून पुढील तीन दिवस (तीन दिवस) कल्याण-शीळ मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली असली तरी, शीळ-कल्याण पट्ट्यात मोठी वाहतूककोंडी होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.
-
राष्ट्रवादीला बळ, सुनील तटकरेंच्या उपस्थितीत बाळासाहेब मुरकुटेंचा पक्षप्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आज पक्षाच्या विस्ताराला वेग आला. अहिल्यानगर जिल्ह्याच्या नेवासा येथील भाजपचे नेते बाळासाहेब दामोदर मुरकुटे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामुळे अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली असून भाजपला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. या भव्य मेळाव्यानंतर, सुनील तटकरे यांनी सांगितले की दुपारपर्यंत एका माजी आमदाराचा देखील पक्षप्रवेश होण्याची शक्यता असून, त्याबाबत अंतिम निर्णय लवकरच होईल.
-
पंतप्रधानांकडून विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाचे कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाचे कौतुक केले आहे. नुकतंच पंतप्रधान मोदींनी विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाला भेट दिली. यावेळी त्यांनी त्यांच्यासोबत मनमोकळेपणाने संवाद साधला.
-
पिंपरी चिंचवडमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं पहिलं पाऊल टाकलं
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पवार काका-पुतणे एकत्र येतील.असे संकेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी दिलेत. त्यानंतर पिंपरी चिंचवडचा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं एक पाऊल पुढं टाकलंय. भ्रष्टाचारी भाजपला त्यांना सत्तेतून पाय उतार करण्यासाठी आम्ही एक पाऊल मागे घेऊ. जागांच्या वाटाघाटीत आमचा वाद होणार नाही.
-
भाजपची नाशिक महापालिका निवडणुकीची जबाबदारी आमदार राहुल ढिकलेंवर
नाशिक शहर निवडणूक प्रमुख म्हणून ढिकले यांची नियुक्ती. देवयानी फरांदे आणि सीमा हिरे या दोन सिनिअर आमदारांना डावलून ढिकलेंवर जबाबदारी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा. नाशिक पूर्व मतदारसंघाचे आमदार आहेत राहुल ढिकले
-
मोहोळ मधील शरद पवार पक्षाच्या बैठकीत गटबाजी चव्हाट्यावर
कोणतीही लायकी आणि अस्तित्व नसलेला माणूस शरद पवारांच्या नावावर आमदार म्हणून निवडून दिला. मोहोळचे माजी आमदार रमेश कदमांची विद्यमान आमदार राजू खरे यांच्यावर सडकून टीका. मोहोळ शहरात नगरपरिषदेच्या अनुषंगाने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बैठकीत रमेश कदम यांची आमदार राजू खरे यांच्यावर टीका
-
दिव्यातील सात बेकायदा इमारती रिकाम्या केल्या
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिव्यातील सात बेकायदा इमारती पालिका प्रशासनाने रिकाम्या केल्या आहेत. जवळपास २७५ कुटुंबे आणि १ हजार ६०० रहिवासी रस्त्यावर आले आहेत. या बेकायदा इमारतींवर पालिकेच्या अतिक्रमण पथकाने हातोडा चालवण्यास सुरुवात केली आहे.
-
मुक्ताईनगर जवळ इंदोर हैदराबाद महामार्ग ट्रक आणि ट्रॅव्हल्स भीषण अपघात
दोन्ही वाहने एकमेकाला समोरून धडकले…1जण ठार तर 3जण गंभीर जखमी असल्याची पोलिसांची माहिती. किरकोळ सात ते आठ जण जखमी असल्याची माहिती. स्थानिक नागरिकांनी बचाव करत जखमींना रुग्णालयात दाखल केले
-
इंस्टाग्रामवरून मैत्री,डॉक्टर महिलेवर हॉटेलमध्ये अत्याचार
सोशल मीडियावर ओळख वाढवून एका डॉक्टर महिलेला लक्ष्य करत ब्लॅकमेल करणाऱ्या घटनेने शहर हादरले आहे. तेलंगणातील संशयित सी. अमरनाथ याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, न्यायालयानं त्याला दोन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे. माहितीनुसार, संशयितानं इंस्टाग्रामवरून पीडित महिलेशी संपर्क साधला आणि भेटीसाठी छत्रपती संभाजीनगरात आला. यावेळी हॉटेलमध्ये तिच्यावर जबरदस्ती करून छायाचित्रे व व्हिडिओ तयार केले.
-
दीपक केसरकर यांच्या अडचणी वाढणार?
रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणी माजी मंत्री दीपक केसरकर यांची चौकशी होणार असल्याचे समजते. गुन्हे शाखेकडून एपीआय अमोल वाघमारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सोनवणे आणि स्टुडिओ मालक मनीष अग्रवाल यांचे जबाब नोंदण्यात आले आहेत.
-
बिहारमध्ये आज पहिल्या टप्प्याच मतदान
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्याच मतदान होत आहे. या टप्प्यात एकूण 3.75 कोटी वोटर्स असून 1,314 उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यात 121 जागांवर मतदान होत आहे.
-
पवार काका-पुतणे एकत्र येतील, असे संकेत
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पवार काका-पुतणे एकत्र येतील, असे संकेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी दिलेत. त्यानंतर पिंपरी चिंचवडचा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं एक पाऊल पुढं टाकलंय.
-
नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी
येत्या शनिवारी निम्म्या नाशिक शहराचा पाणी पुरवठा राहणार बंद. दुरुस्तीच्या कामासाठी शनिवारी निम्म्या शहराचा पाणी पुरवठा राहणार बंद. रविवारी देखील येणार कमी दाबाने पाणी. महापालिकेच्या विल्होळी जलशुद्धीकरण केंद्रावर तांत्रिक दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार. शहरातील नवीन नाशिक, सिडको, नाशिकरोड आणि नाशिक पूर्व विभागातील परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार. नागरिकांनी जपून पाणी वापरण्याचं पालिका प्रशासनाचं आवाहन.
-
भाजपकडून निवडणुकीला सुरुवात, निवडणूक प्रभारी यांच्या नियुक्त्या
पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे ग्रामीण दक्षिण (बारामती), पुणे ग्रामीण उत्तर (मावळ) या भागांसाठी निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे जबाबदारी. निवडणूक प्रमुख म्हणून माजी सभागृह नेते गणेश बिडकर, आमदार महेश लांडगे, राहुल कुल आणि शंकर जगताप यांची नियुक्ती. येत्या तीन महिन्यांमध्ये राज्यभरात नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुका पार पडणार.
Published On - Nov 06,2025 8:21 AM
