Shinde vs Thackeray : ‘धुरंधर’वरून एकनाथ शिंदे अन् ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी

Shinde vs Thackeray : ‘धुरंधर’वरून एकनाथ शिंदे अन् ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी

| Updated on: Dec 15, 2025 | 5:45 PM

आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या धुरंदर विधानावर उपरोधिक टीका केली. शिंदेंनी स्वतःला धुरंदर म्हणत उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. ठाकरेंनी भाजपला बिल्डर जनता पार्टी संबोधले, तसेच पागडी धोरण मुंबईकरांना शहराबाहेर काढण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईला लुटणाऱ्या रहमान डकैतला पाणी पाजणारी महायुतीच धुरंधर असल्याचे विधान करत उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. शिंदेंच्या या विधानावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरेंनी शिंदेंना टोला लगावत म्हटले की, “उपमुख्यमंत्र्यांनी भाषणात धुरंधर चित्रपटाचा उल्लेख करताना स्वतःला धुरंधर म्हटलेय. कुठे धूर गेला माहित नाही मला पण जाऊदेत.”

आदित्य ठाकरेंनी यावेळी भाजप सरकारवरही सडकून टीका केली. त्यांनी भाजपचा उल्लेख बिल्डर जनता पार्टी असा करत, हे भारतीय जनता पार्टी नसून बिल्डरांसाठी काम करणारे सरकार असल्याची टीका केली. आदित्य ठाकरेंच्या मते, सरकार ज्या घोषणा करत आहे त्या सर्व बिल्डरांच्या हितासाठी आहेत. विशेषतः, मुंबईतील पागडी धोरणावरून त्यांनी सरकारला घेरले. हे धोरण फसवे असून मुंबईकरांनी याला बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले. ठाकरेंनी म्हटले की, “तुम्हाला मुंबईतून बाहेर काढून टाकायचे आहे ही खरी गोष्ट आहे आणि खरी परिस्थिती आहे.” ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फेकनाथ मिंधे असे संबोधत म्हणाले की, “सगळ्या गोष्टी तर फेक आहेतच, पण ही घोषणा देखील अशी फेक आहे त्यांची.”

Published on: Dec 15, 2025 05:45 PM