Chhagan Bhujbal : छावाच्या कार्यकर्त्यांनी केलं ते चुकीचं..; लातूर घटनेवर भुजबळांची मोठी प्रतिक्रिया
लातूर येथे झालेल्या मारहाणीच्या घटनेवर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तटकरेंच्या अंगावर पत्ते फेकण्याचे कारण नाही. ते पत्ते खेळत होते का? अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी लातूर मधील घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधान भवनात पत्ते खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काल मंत्री सुनील तटकरे यांच्या लातूर दौऱ्यादरम्यान छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत तटकरे यांच्यावर पत्ते फेकून निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यकर्त्यांना जबर मारहाण केली होती. आज यावर राज्यभरात पडसाद उमटत असताना मंत्री छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत भुजबळ म्हणाले की, कुठल्याही पक्षाचा नेता जातो, त्यावेळी असे तरणेबांध कार्यकर्ते आपल्याबरोबर असतात. अशा वेळेला छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जी काय कृती केली ती चुकीची होती. त्यांनी तटकरेंना तोंडी सांगायचं लेखी निवेदन द्यायचे. तटकरेंच्या अंगावर पत्ते फेकण्याचे कारण नाही. त्याच्यामुळे ते प्रवृत्त झाले त्यामुळे घटना घडली. त्यांना आपलं म्हणणं मांडायचे एखाद्या आंदोलना संदर्भात बोलायचे. त्यांनी सुद्धा योग्य मार्गाने आपलं म्हणणं मांडलं पाहिजे. निवेदन द्यायला पाहिजे. त्यावर पक्षाचे प्रमुख ठरवतील. पत्ते फेकून मारणे गैरवर्तन. त्यामुळे त्याच्यातून क्रोध निर्माण होऊन. म्हणून तरुणांची बाचाबाची झाली, असं भुजबळ यांनी म्हंटलं आहे.
