Pune Water Logging : हाताला लागेल ते सामान घेतलं अन् घर सोडलं, पुण्याच्या एकता नगरमध्ये अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू
पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहराचे जनजीवन विस्कळीत झाले असून, सिंहगड रस्त्यावरील एकता नगरला पुराचा मोठा फटका बसला आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे.
मुंबई, दादर, ठाण्यानंतर आता पुण्यातही मुसळधार पाऊस कोसळताना दिसतोय. या मुसळधार पावसाचा फटका पुण्यातील एकता नगरला बसल्याचे दिसून आले आहे. पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नुकतीच एकतानगर भागाची पाहणी केली होती. पुण्यात होणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असून,या भागातील नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेत असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली होती. मात्र रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे एकता नगर भागातील सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली. त्यामुळे एकता नगर भागातील सोसायट्यांमधील नागरिकांचे आता अग्निशमन दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येतय. दरम्यान, पुण्यातील खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात सध्या 35 हजार 500 क्यूसेक विसर्ग सुरु आहे. धरणातील विसर्ग वाढल्याने एकता नगर भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याचे पाहायला मिळतंय.
