10 हजार मतं वगळण्यासाठी… पण ते बरं नाही वाटलं…; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत गडबड झाल्याचा आरोप केला आहे. या दाव्यामुळे निवडणूक प्रक्रियेवर संशय निर्माण झाला आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, निवडणुकीपूर्वी त्यांना 10 हजार मतदारांची यादी मागितली गेली होती, आणि जे मतदार त्यांना मत देणार नाहीत, त्यांना यादीतून वगळून त्याऐवजी दुसरे 10 हजार मतदार समाविष्ट करण्याची ऑफर देण्यात आली होती. “माझ्याकडे याबाबत पुरावे आहेत, आणि योग्य वेळी मी त्या संभाषणाची रेकॉर्डिंग, दिलेली नावे आणि सर्व माहिती प्रसारमाध्यमांसमोर आणणार आहे, असे कडू यांनी पत्रकारांशी बोलताना जाहीर केले.
यापूर्वी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीत मत चोरी झाल्याचा गंभीर आरोप करत निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता बच्चू कडू यांच्या या नव्या दाव्याने निवडणूक प्रक्रियेवर पुन्हा एकदा संशय निर्माण झाला आहे. कडू पुढे म्हणाले, “काही लोकांनी मला सांगितले की, तुम्हाला न मत देणाऱ्या मतदारांची यादी तयार करा, आम्ही त्यातील 10 हजार मतदार वगळून त्याजागी दुसरे 10 हजार मतदार घालू. मी याबाबत पुरावे देऊ शकतो.” विशेष म्हणजे, ही ऑफर सत्ताधारी पक्षातील व्यक्तींकडूनच आल्याचा दावा कडू यांनी केला आहे.
